माझी शाळा मराठी निबंध | My School Essay in Marathi

| |

शाळा हि प्रत्येकाच्या आयुष्यातील एक सुंदर आणि अविस्मरणीय गोष्ट असते. आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण शाळेतच जगले जातात. शाळेतूनच संस्कारांची शिदोरी प्रत्येकाला दिली जाते जी आयुष्य जगण्यासाठी नेहमी उपयोगी पडते. म्हणूच या लेखात आपण माझी शाळा मराठी निबंध (My School Essay in Marathi) पाहणार आहोत. पहिली ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी उपयोगी पडतील असे वेगवेगळ्या शब्दांत माझी शाळा मराठी निबंध (Mazi Shala Marathi Nibandh) लिहिले आहेत. 

दहा ओळींमध्ये माझी शाळा मराठी निबंध (My School Essay in Marathi in 10 Lines)

१. माझ्या शाळेचे नाव जिल्हा पब्लिक स्कूल आहे.

२. माझ्या शाळेत सुमारे तीस शिक्षक आहेत.

३. माझ्या शाळेमध्ये दररोज हजारो विद्यार्थी शिक्षण घेतात.

४. शाळेच्या मध्यभागी सर्व विद्यार्थ्यांचा शारीरिक विकास होण्यासाठी एक मोठे असे मैदान आहे, जेथे विद्यार्थी अनेक मैदानी खेळाचा आनंद लुटतात.

५. शाळेतील सर्व शिक्षक मेहनती, प्रामाणिक आणि दयाळू आहेत.

६. आमची शाळा नृत्य, संगीत, खेळ, योग इत्यादि सारख्या इतर कार्यक्रमांसाठी देखील प्रसिद्ध आहे.

७. माझी शाळा केवळ शैक्षणिक कामगिरीवर लक्ष केंद्रित करत नाही तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावरही लक्ष केंद्रित करते.

८. माझ्या शाळेत एक मोठा असेंब्ली हॉल आहे जिथे सर्व महत्वाची कार्ये होतात.

९. माझ्या शाळेत संगणक प्रयोगशाळा, विज्ञान प्रयोगशाळा आणि वाचनालय आहे.

१०. माझ्या शाळेचा परिसर अतिशय नीटनेटका आणि स्वच्छ आहे.

आणखी वाचा : वेळेचे महत्व मराठी निबंध

तीनशे शब्दांमध्ये माझी शाळा मराठी निबंध (Essay on My School in Marathi in 300 Words)

ज्या संस्थेत शिक्षण दिले जाते तिला सामान्यतः शाळा, असे म्हणले जाते. मात्र शाळेची व्याप्ती एका इमारतीपर्यंतच मर्यादित नाहीय, माझ्यासारख्या अनेकांचे शाळेशी एक अतूट नाते आहे. बहुतेक देशांमध्ये औपचारिक शिक्षणाची व्यवस्था आहे, जी बऱ्याचदा अनिवार्य असते. या पद्धतीमध्ये, विद्यार्थी शाळांच्या एकेक इयत्तेमधून पुढे जातात. सामान्यत: लहान मुलांसाठी प्राथमिक शाळा आणि प्राथमिक शिक्षण पूर्ण केलेल्या किशोरवयीन मुलांसाठी माध्यमिक शाळा असतात.

माझी प्रिय शाळा ही अशी जागा आहे जिथे मी फक्त शिक्षण घेत नाही तर खेळ, संगीत आणि नृत्य यासारख्या इतर स्पर्धात्मक कौशल्यांचे प्रशिक्षण देखील घेतो. आमच्या शाळेने आम्हाला एक मोठे क्रीडांगण, मध्यवर्ती वाचनालय, एक मोठे सभागृह, एक विज्ञान प्रयोगशाळा आणि एक चांगली संगणक प्रयोगशाळा यासारख्या सर्व मूलभूत सुविधा पुरवल्या आहेत म्हणून मला माझ्या शाळेचा अभिमान आहे. यामुळेच माझ्या शाळेला आमच्या जिल्ह्यातील सर्वोत्तम शाळांपैकी एक म्हणून गणले जाते. माझ्या शाळेने माझ्या देशात अनेक महान लोक निर्माण केले आहेत.

आणखी वाचा : माझा आवडता ऋतू (पावसाळा) मराठी निबंध

माझ्या शाळेला लांबून चकाचक दिसणारी मोठी आणि सुंदर इमारत आहे. मी रोज वेळेवर शाळेत जातो आणि रोजचा अभ्यास नित्यनियमाने करतो, माझ्या या सवयीचे श्रेय माझ्या शालेलाच जाते. मी माझ्या इतर मित्रांसह शाळेत जातो. आम्ही मोठ्या आनंदाने शाळेमध्ये एकमेकांशी मजा-मस्ती करतो तसेच शाळेच्या संमेलनात भाग घेतो, तसेच एकमेकांशी गुण्यागोविंदाने नांदत अभ्यासही करतो.

आम्हा सर्व विद्यार्थ्यांना शिस्त लावण्याचे कार्य माझ्या शाळेतील अत्यंत कार्यक्षम आणि प्रशिक्षित शिक्षक वृंदाने केले आहे. सर्वोत्कृष्ट शाळा म्हणजे माझ्या मतानुसार ज्या विद्यार्थ्यांना सर्वोत्तम बनवतात आणि  सर्वोत्तम शिक्षकांनी बनलेल्या असतात. आम्ही सर्व विद्यार्थी उत्तम शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली शिकलो आहोत. माझ्या शाळेत सर्व विषयांसाठी तसेच संगीत आणि क्रीडा यांसारख्या अतिरिक्त विषयांसाठी अनेक शिक्षक आहेत. मी माझ्या शाळेला सर्वोत्कृष्ट शाळा मानतो. कारण ती प्रत्येक विद्यार्थ्याला सर्वोत्कृष्ट बनवण्यात आणि प्रगती करण्यास बळ देते आणि प्रोत्साहित करते. 

आमचे वर्गशिक्षक आम्हाला दररोज सकाळी आमच्याबद्दल विचारतात. ते खूप छान आणि दयाळू माणूस आहेत. ते आपला विषय शिकवण्याबरोबरच आमचे मनोरंजन सुद्धा करतात. शिस्त, आत्म-मदत, आत्मविश्वास आणि सहकार्य अशा अनेक गोष्टी आम्ही  इथे शिकलो. अशी ही प्राणप्रिय शाळा मला खूप आवडते.

धन्यवाद…!

आणखी वाचा : माझी आई मराठी निबंध

पाचशे शब्दांमध्ये माझी शाळा मराठी निबंध (Mazi Shala Marathi Nibandh in 500 Words)

ज्या ठिकाणी उद्याचे भविष्य असणारी मुले अभ्यास करतात आणि जिथे राष्ट्राचे भवितव्य घडते त्याला शाळा असे म्हणतात. शिक्षण हे उज्वल भवितव्याचे अत्यावश्यक असे शस्त्र आहे, ज्यामुळे आजच्या चांगल्या शाळा राष्ट्राच्या उत्तम भविष्यासाठी नेहमीच फायदेशीर ठरतात. शाळा हे शिक्षणाचे महत्वाचे आणि प्रथम केंद्र आहे, जिथे आपण विविध विषयांवरील ज्ञानाचे धडे गिरवतो, शिक्षकांशी हितगुज करतो, आणि बालमनाला पडणाऱ्या असंख्य शंकांचे निरसन करून घेतो.

आपण शाळेत अनेक धडे शिकतो, त्याचा अभ्यास करतो, परीक्षा आली की त्याची उजळणी करून पेपर मध्ये योग्य उत्तरे लिहितो. मात्र, हे केवळ आणि केवळ शाळा आणि त्यातील दर्जेदार शिक्षक यांच्यामुळेच साध्य होते.

माझी शाळा ही शहराच्या सुरुवातीलाच असलेली शासकीय प्राथमिक शाळा आहे. तिचे नाव सावित्रीबाई फुले विद्यालय, राहुरी असे आहे. सामान्यतः, जेव्हा लोक सरकारी शाळेबद्दल ऐकतात किंवा बोलतात तेव्हा त्यांची तोंडे बघण्यासारखी असतात, त्यांच्यामते सरकारी शाळा म्हणजे केवळ हेलपाटे मारणे, तसेच या शाळांत अगदी मुलभूत सुविधा आणि शिकवण्याच्या सोयी सुद्धा नसतील. पण, सरकारी शाळा असूनही, माझी शाळा अशा सर्व गोष्टींना खोडून काढते. माझ्या शाळेतील शिक्षक केवळ ते शिकवत असलेल्या विषयांमध्येच निपुण आहेत असे नाही तर ते अभ्यासेतर उपक्रमांद्वारे आणि प्रयोगाद्वारे शिकवण्यासाठी सुद्धा खूप कुशल आहेत. उदाहरणार्थ, आमचे विज्ञान विषयाचे शिक्षक वास्तविक जीवनातील उदाहरणे सांगून प्रत्येक संकल्पना स्पष्ट करतात ज्यांचा आपण विविध संकल्पना लक्षात ठेवण्यासाठी करू शकतो. अशा प्रकारे आपल्याला केवळ विषय अधिक चांगल्या प्रकारे समजतो असे नाही, तर आपली विचार करण्याची क्षमता देखील मोठ्या प्रमाणावर वाढते. शिवाय, मला एकही दिवस आठवत नाही, जेव्हा कोणत्याही शिक्षकाने कोणत्याही विद्यार्थ्याला प्रश्न/शंका विचारली म्हणून शिक्षा केली. ते नेहमी संयमाने ऐकतात आणि त्यांना विचारलेल्या सर्व प्रश्नांची जाणीवपूर्वक उत्तरे देतात.

माझ्या आयुष्यात मला माझी शाळा खूप महत्त्वाची आहे, एक प्रकारे माझ्या कुटुंबापेक्षाही माझे नाते शाळेशी जास्त घट्ट आहे असे म्हणले तरी वावगे ठरायला नको. माझे कुटुंब मला प्रेम, काळजी आणि आपुलकी देते आणि माझ्या इतर सर्व आवश्यक गरजा पुरवते. पण, मला एक चांगला माणूस बनवण्यासाठी आणि आयुष्यात यशस्वी होण्यासाठी हे सर्व पुरेसे नाही. त्यासाठी मला माझ्या प्रिय शाळेचीच गरज आहे.

आणखी वाचा : स्वच्छतेचे महत्व मराठी निबंध

माझी शाळा आमच्या भागातील एक प्रतिष्ठीत शाळा आहे, आणि या शाळेत नाव नोंदवण्याइतपत मी  भाग्यवान आहे. या शाळेतील अद्भुत दर्जाचे शिक्षण मिळवून, एक दिवस मी माझी स्वप्ने साकार करण्यासाठी उत्सुक आहे. जीवनात यशस्वी होण्यासाठी सर्वात आवश्यक शिक्षण असते आणि ते फक्त माझी प्रिय शाळा मला पुरवते. माझ्या शाळेशिवाय आणि त्यातून मिळालेल्या शिक्षणाशिवाय, मी एक वाट चुकलेल्या जनावराप्रमाणे असेल, माझे जीवन जवळजवळ ध्येयहीन असेल.

माझ्या व्यक्तिमत्व विकासात मी माझ्या शाळेच्या भूमिकेला पहिले स्थान देतो. शाळा मला केवळ शिक्षणच देत नाही तर मला स्वतःचे आचरण कसे ठेवावे, सभ्य आणि योग्यरित्या कसे वागावे, बोलावे किंवा समाजात कसे वावरावे हे देखील शिकवते. शाळेने जणू मला जीवनातील इतर सर्व आवश्यक कौशल्यांचे प्रशिक्षणच दिलेले आहे. जसे की कितीही आव्हानात्मक किंवा संघर्षमय परिस्थिती आली तरीदेखील शांत कसे राहावे, याउपर यावेळी इतरांनाही मदत कशी करावी. 

माझ्या शाळेने मला एक चांगला आणि विकसित माणूस बनायला शिकवले, त्याचबरोबर इतरांच्या मदतीसाठी नेहमीच तयार राहायला सुद्धा शिकवले. ज्यामुळे आज मी इतरांप्रती दयाळू आणि उदार व्हायला तसेच जात, धर्म, वंश किंवा इतर गोष्टींवर आधारित भेदाभेद न करण्यासही शिकलो. 

मुलांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी काही अत्यंत आवश्यक व्यक्तिमत्त्व वैशिष्ट्ये गरजेची असतात, आणि ती केवळ शाळाच विद्यार्थ्यांना देऊ शकते. आणि यासाठी मी नेहमीच शाळेचा ऋणी राहीन.

प्रत्येक वेळी जेव्हा मला माझ्या शाळेची आठवण येते तेव्हा तेव्हा जेथे असेल तेथून त्या शिक्षण मंदिराला मी मनोमन हात जोडतो. होय माझ्यासाठी ते शिक्षणाचे मंदिरच आहे. असे मंदिर, जिथे माझा आत्मा शिक्षणाला भेटतो, माझ्या जुन्या आठवणींना उजाळा देतो, आणि शाळेच्या आठवणीत माझ्या मनाला रमवते. माझे जीवन अधिक अर्थपूर्ण आणि समाज आणि राष्ट्रासाठी उपयुक्त बनवणे याचे संपूर्ण श्रेय माझ्या शाळेला जाते. शाळा ही अशी जागा आहे जिथे माझ्या इच्छा-आकांक्षांना आणि स्वप्नांना पंख मिळतात, आणि मला ती साकार करण्यासाठी आत्मविश्वास आणि बळ मिळते. माझ्या शाळेची माझ्या आयुष्यात जी भूमिका आहे त्याची जागा संपूर्ण जगात इतर कोणतीही जागा घेऊ शकत नाही. शाळेमधील माझे मित्र, शिक्षक आणि माझ्या शाळेतील कर्मचार्‍यांचा मी सदैव आभारी राहीन, त्यांनी हे शिक्षणाचे एक भगीरथ आणि महान कार्य चालवले आहे.

अशी माझी ही शाळा मला सर्वात प्रिय आहे.

आणखी वाचा : झाडांचे महत्त्व मराठी निबंध

एक हजार शब्दांमध्ये माझी शाळा मराठी निबंध (Essay on My School in Marathi in 1000 words)

आवडते मज मनापासुनी शाळा।

लावते लळा ही जशी माऊली बाळा।।

माझी शाळा महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील एक नामांकित शाळा आहे, आणि तिचे नाव “सावित्रीबाई फुले विद्यालय” आहे.

माझी शाळा ही विविध उपक्रमांमधून विद्यार्थ्यांची शिकण्याची आवड वाढवते, ज्यामुळे माझी शाळा इतर शाळेपेक्षा  स्पष्टपणे वेगळी दिसून येते. माझ्या शाळेचे वैशिष्ट्य म्हणजे सुंदर अशा निसर्गरम्य टेकडीवर वसलेली आमची ही शाळा झाडाझुडपांनी अगदीच गुरफटून गेलेली आहे ज्यामुळे शाळेचा परिसर अतिशय अल्हाददायक वाटतो.

कॅम्पसच्या आत,  क्रीडांगणांच्या  बॉर्डरवर तसेच  इमारतीच्या कडेने अनेक सावली देणारी झाडे आणि त्यांच्यामध्ये बदामाची आणि अन्य फळांचीही झाडे विपुल प्रमाणात आहेत.

आमचे प्राचार्य आणि हरित सेनेचे विद्यार्थी यांनी निरोगी आणि प्रसन्न वातावरण बनवणे हे त्यांचे ध्येय बनवले आहे, आणि त्यासाठी ते नेहमीच झाडे लावत असतात आणि लावलेली झाडे जगवतही असतात.

आणखी वाचा : स्वातंत्र्यदिन मराठी निबंध

माझ्या शाळेचा परिसर

माझ्या शाळेची इमारत ही प्रदूषणमुक्त जागेत असल्याने तेथे शांत आणि प्रसन्न वाटते. इमारतीच्या दोन्ही टोकांना दोन जिने आहेत ज्यामुळे आम्हाला प्रत्येक मजल्यावर पोहोचता येते.

आमची शाळा सर्व सोयी सुविधांनी सुसज्ज अशी आहे ज्यामध्ये एक उत्तम उपकरणे असलेली विज्ञान प्रयोगशाळा, एक भव्य ग्रंथालय, तसेच संगणक प्रयोगशाळा इत्यादींचा समावेश आहे.

शाळेच्या तळ मजल्यावर फॅकल्टी लेक्चर हॉल आहे जेथे वर्षभर महत्त्वाचे समारंभ पार पडतात तसेच वार्षिक स्नेहसंमेलन देखील पार पडते.

माझ्या शाळेची रचना

माझ्या शाळेच्या तळमजल्यावर मुख्याध्यापकांची कार्यालय, परीक्षा कार्यालय, शिक्षक कक्ष, लिपिक कक्ष आणि काही वर्गखोल्या आहे. शिवाय, तळ मजल्यावर स्टेशनरीचे दुकान, शाळेचे कॅन्टीन, स्केटिंग हॉल आणि बुद्धिबळाची खोली इत्यादीही सुविधा आहे.

माझ्या शाळेमध्ये मुख्याध्यापकांच्या कार्यालयासमोर दोन मोठे काँक्रिट केलेले बास्केटबॉल कोर्ट आहेत, तर त्याच्या बाजूलाच फुटबॉलचे मैदान आहे. तसेच शाळेचा आवारासमोर एक छोटीशी हिरवीगार बाग आहे. ती शोभिवंत फुलांनी आणि सुंदर रोपांनी गच्च भरलेली आहे या बागेमुळे संपूर्ण शाळेचे सौंदर्य वाढले. माझ्या शाळेत सुमारे 1600 विद्यार्थी शिक्षण घेतात. माझ्या शाळेचे विद्यार्थी अभ्यासाबरोबरच कोणत्याही आंतरशालेय खेळ स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करतात.

माझ्या शाळेतील शिक्षक

माझ्या शाळेमध्ये प्रत्येक विषयासाठी निपुण असे शिक्षक वृंद आहेत. त्या शिक्षकांना ते शिकवत असलेल्या विषयावर खूप प्रेम आहे आणि आपल्या शिकवण्याच्या पद्धतीने विद्यार्थ्यांनाही त्या विषयाच्या प्रेमात पाडतात.

एखाद्या विशिष्ट विषयाचा तिरस्कार करणारा विद्यार्थीही त्यांच्या शिकवण्याच्या पद्धतीने त्या विषयाचा चाहता होतो. माझ्या शाळेतील शिक्षक अतिशय मनमिळावू स्वभावाचे आहेत. ते  मैत्रीपूर्ण  आणि दयाळू मनाने वागतात आणि जेव्हा विद्यार्थ्यांना कोणत्याही विषयाबाबत अडचण येतील त्यावेळी त्याबाबतीत मदत करायला ते नेहमी तत्पर असतात.

असे असले तरी देखील मनमिळाऊ स्वभावाचे हे शिक्षक तेवढेच शिस्तप्रिय आणि कठोर देखील आहेत. खोडकरपणा करणाऱ्या विद्यार्थ्यांना ते शिक्षा देखील करतात, मात्र यामागील त्यांचा उद्देश त्या विद्यार्थ्यांना चांगले वळण लागावे हाच असतो. एकूणच काय तर आमच्या शाळेचे हे शिक्षक शाळेचा खरा आत्मा आहेत.

आणखी वाचा : राजमाता जिजाऊ मराठी निबंध

आमच्या शाळेचे विद्यार्थी

जिथे शाळेवर मनापासून प्रेम करणारी मुले नाहीत ती शाळाच नाही. एखाद्या शाळेत कितीही अद्ययावत यंत्रणा असो, कितीही अनुभवी आणि विख्यात शिक्षक वर्ग असो, मात्र चांगले विद्यार्थी नसतील तर त्या शाळेच्या प्रगतीत कधीच सुधारणा होत नाही.माझ्या शाळेत उत्साही विद्यार्थी मोठ्या प्रमाणात आढळतात, ज्यामुळे माझ्या शाळेच्या प्रगतीचा आलेख उत्तरोत्तर उंचच जात आहे.

माझ्या शाळेतील विद्यार्थी शिक्षकांचे काम सोपे करतात. ते शाळेत लक्ष देतात, शिक्षकांचे शिकवणे बारकाईने ऐकतात, आणि शिक्षकांनी दिलेला अभ्यासक्रम वेळेत पूर्ण करून परीक्षेत उत्तम यशदेखील संपादन करतात.

माझ्या शाळेत विद्यार्थ्याचे वागणे अगदीच वाखाणण्याजोगे आहे. विद्यार्थी एकमेकांशी आणि शिक्षकांशी देखील नम्रतेने वागतात. तसेच, ते वर्गात आणि वर्गाबाहेरही शिस्तीचे काटेकोर पालन करतात.

वाईट वातावरणात कधीच शिक्षण घेणे साध्य होत नाही मग ते प्रदूषणाबद्दल असो की आजूबाजूंच्या व्यक्तींबद्दल. माझी शाळा मात्र अशा वातावरणात आहे देते विद्यार्थ्यांना कसले व्यसन लागले तरी ते फक्त अभ्यासाचेच असेल.

लहान वयात विद्यार्थ्यांना शाळेची गोडी लागण्यासाठी शाळांनी बरेच प्रयत्न करावे लागतात. आमच्या शाळेने लहान विद्यार्थ्यांकरता वर्ग खोल्यांच्या भिंती आणि बाहेरील आवार विविध चित्रांनी सजवून अभ्यासक्रमाला चित्ररूप दिलेले आहे. त्यामुळे लहानांपासून थोरांपर्यंत प्रत्येक जण शाळेच्या आवारात रमतोच.

याव्यतिरिक्त सुद्धा विद्यार्थ्यांना शाळेची ओढ निर्माण करण्याकरिता आमची शाळा अनेक संस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करत असते.

आणखी वाचा : माझी सहल मराठी निबंध

विद्यार्थ्यांची मानसिक, शारीरिक आणि बौद्धिक प्रगती होण्याकरिता विविध प्रकार अवलंब करावे लागतात. विद्यार्थ्याला मानसिकदृष्ट्या खंबीर करण्यासाठी आमची शाळा विविध बौद्धिक खेळांचे आयोजन करते. तसेच शारीरिक विकासासाठी अनेक मैदानी खेळांचेही आयोजन करते.

शाळा म्हणजे माझ्यासाठी घरापासून दूर असलेले दुसरे घर आहे, एक इमारत असण्यापेक्षा भावनांचे सुंदर मंदिर आहे. शाळेतल्या अगदी क्षुल्लक गोष्टीही माझ्या आयुष्याचा भाग बनल्या. शाळेच्या प्रत्येक गोष्टीची माझ्या मनावर अगदी खोलवर छाप उमटली आहे. ज्यामध्ये किड्स पार्कमधील देखावा, आमचे वर्ग, सामूहिक प्रार्थना, शारीरिक प्रशिक्षण वर्ग, जेवणाची सुट्टी, मित्रांसोबत मारलेल्या गप्पा, कला स्पर्धा, क्रीडा स्पर्धा, मित्रांसोबत केलेली अल्लड भांडणे, शाळेच्या वर्धापन दिन, स्नेहसंमेलन, शिक्षकांचे शिकवणे, प्रयोगशाळा, परीक्षा या सर्वांचा समावेश होतो.

माझ्या शाळेतील सर्वात मौल्यवान ठेवा म्हणजे माझ्यासाठी माझे शिक्षक आहेत. ते जणू माझ्या आई-वडीलांचेच अवतार आहेत. ते ज्ञानाच्या तेजस्वी प्रकाशाने आमचे जीवन अगदी उजळून टाकतात, आणि आम्हाला शिक्षणासोबतच जीवनात जगण्यासाठी उपयोगी पडणारी मूल्ये शिकवतात.

शाळेच्या भरभराटीत शिक्षकांच्या योगदानाकडे आपण दुर्लक्ष करू शकत नाही, कारण त्यांनी विद्यार्थ्यांच्या जीवनात मोलाची भूमिका बजावत त्यांना यशस्वी केलेले असते.

सुरुवातीला, विद्यार्थी शिक्षकाचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करतात आणि हळूहळू त्यांनाच आपले आदर्श बनवतात. आज समाजात मोठमोठया पदावर कार्यरत असणाऱ्या दिग्गजांना मार्गदर्शन करण्यात शिक्षकाची भूमिका महत्त्वाची असते. शालेय जीवनामध्ये शिक्षकांकडून मिळालेली जीवनाची मूल्ये माणसालाआयुष्यभर पुरतात.

शिक्षक ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांना ज्ञानमय करतात आणि त्यांच्यावर संस्कार करतात त्यामुळे विद्यार्थ्यांना ते आपल्या मात्यपित्यासम दिसतात. विद्यार्थी आपल्या शंका आणि समस्या शिक्षकांजवळ अगदी मोकळेपणाने व्यक्त करतात त्यामुळे बहुतेक शिक्षक विद्यार्थ्यांचे चांगले मित्र आहेत.

आम्ही दरवर्षी शिक्षक दिन अतिशय आनंदी पद्धतीने साजरा करतो. आमचे प्रिय शिक्षक नेहमी आमच्यासाठी तत्पर असतात, आमच्यासाठी दिवसरात्र एक करतात, त्यांच्या गौरवाचा खरेतर हा दिवस असतो. त्यादिवशी सर्व शिक्षक आम्हा विद्यार्थ्यांना शुभाशीर्वाद देतात, त्यांच्या आशीर्वादाचा कोणाच्याही जीवनावर मोठा प्रभाव पडतो.

या व्यतिरिक्त, शाळेची आणखी एक गोष्ट म्हणजे आमचे मित्र. शाळा ही अशी जागा आहे जिथे कोणताही माणूस सामाजिक बनू लागतो. आणि त्यातून तुमचे अनेक मित्र बनतात अन पुढे आयुष्यात बनलेले मित्र शाळेतल्या मित्रांची कधीच बरोबरी करू शकत नाहीत.

आणखी वाचा : राष्ट्रीय एकात्मता मराठी निबंध

शहरी जीवनाच्या गजबजाटामुळे सर्वत्र जीवन हातघाईचे झाले असले तरी, माझी शाळा आजही जगात शिकण्यासाठीचे एक सुंदर ठिकाण आहे. माझी शाळा शिक्षण आणि निसर्ग यांचे सुंदर असे मिश्रण आहे.

अशी ही सर्व गुणसंपन्न शाळा कोणाला आवडणार नाही?, त्यामुळे माझी शाळा माझ्यासह माझ्या सर्व वर्गमित्रांची आवडती शाळा आहे.

धन्यवाद…!

मित्रांनो आज आपण माझी शाळा या विषयावर विविध निबंध पाहिले, ते तुम्हाला कसे वाटले याबाबत कमेंट सेक्शन मध्ये आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया वाचायला नक्कीच आवडतील.

Previous

मराठी लेखक आणि त्यांची टोपणनावे | Marathi Writers and Their Nicknames

डोहाळे जेवण गाणी | Dohale Jevan Songs in Marathi

Next

Leave a Comment