महाराष्ट्रातील नांदेड येथील एका गुरुद्वाऱ्यामध्ये काही शीखांची काल पोलिसांवर हल्ला केला.
जवळपास ३०० ते ४०० लोकांच्या जमावाने हातात तलवारी घेऊन गुरुद्वाऱ्यामध्ये तैनात असलेल्या पोलिसांवर हल्ला केला. (Nanded Gurudwara Attack)
या हल्ल्यामध्ये ४ पोलीस जखमी झाल्याचे वृत्त हाती आले आहे.
त्यापैकी एकाची स्थिती गंभीर आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर धार्मिक कार्यक्रम करण्यास महाराष्ट्र सरकारने मज्जाव केल्यामुळे हा हल्ला करण्यात आल्याचे म्हटले जात आहे.
हल्ला मोहल्ला कार्यक्रमाला परवानगी नाकारली
शीख धर्मियांमध्ये दरवर्षी रंगपंचमीच्या दिवशी हल्ला मोहल्ला हा कार्यक्रम घेण्यात येतो.
या कार्यक्रमाला शीख धर्मामध्ये विशेष महत्व आहे.
दरवर्षी दूरदूर वरून हजारो शीख बांधव एकत्र येऊन या कार्यक्रमामध्ये सहभागी होतात.
परंतु यावर्षी कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव लक्षात घेता महाराष्ट्र सरकारने लोकांच्या एकत्र जमा होण्यावर निर्बंध घातले आहेत.
त्यामुळे नांदेड येथे होणाऱ्या शीख धर्मियांच्या या हल्ला मोहल्ला कार्यक्रमाला प्रशासनाने परवानगी नाकारली होती.
त्यामुळे जमावाला गुरुद्वारामध्ये प्रवेश करण्यास मनाई करण्यात आल्यामुळे संतप्त जमावाने हातात तलवारी घेऊन, बॅरिकेट तोडून तिथे असलेल्या सुरक्षा रक्षकांवर हल्ला केला.
यामध्ये ४ सुरक्षाकर्मी जखमी झाले आहेत तर एकाची स्थिती गंभीर आहे. या घटनेचा एक व्हिडीओ वायरल होत आहे.
नांदेड चे डीआयजी (DIG) निसार तांबोळी यांनी सांगितले की, “कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हल्ला मोहल्ला कार्यक्रमासाठी परवानगी नाकारण्यात आली होती.
यासंबंधीची सूचना गुरुद्वारा समितीला देण्यात आली होती. परंतु जेव्हा निशाण साहिब ध्वज साधारणतः ४ वाजता गेट जवळ आला तेव्हा काही लोकांनी सुरक्षा रक्षकांसोबत वाद घालण्यास सुरुवात केली.
यानंतर साधारणतः ३०० लोकांच्या जमावाने बॅरिकेट तोडून तलवारीने सुरक्षा रक्षकांवर हल्ला केला.
जवळपास २०० लोकांवर भारतीय दंड संहिता कलम ३०७, ३२४, १८८, २६९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीना अटक केली जात आहे.”
या हल्ल्यामध्ये ४ सुरक्षाकर्मी जखमी झाले असून काही वाहनांचे देखील नुकसान झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.