या लेखात आपण मंगळागौर खेळताना गायली जाणारी गाणी पाहणार आहोत. (Mangalagaur Songs in Marathi) मंगळागौर हे हिंदू धर्मातील एक पवित्र व्रत आहे. श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी हे व्रत ठेवले जाते. नवविवाहित स्त्रियांनी साधारण पणे पहिली पाच वर्षे हे व्रत करावयाचे असते.
या दिवशी सकाळी स्त्रिया नऊवारी साडी, नाकात नथ , आणि पारंपरिक दागिने घालतात. त्यानंतर मंगळागौरीची (Mangalagaurichi Gani) म्हणजेच देवी पार्वतीची पूजा केली जाते. या पूजेमध्ये वेगवेगळ्या झाडांची पाने व फुलांचा वापर केला जातो. अर्जुनसादडा, आघाडा, कण्हेर, चमेली, जाई, डाळिंब, डोरली, तुळस, दुर्वा, धोत्रा, बेल, बोर, माका, मोगरा, रुई, विष्णूक्रांता, शमी, शेवंती अशा एकूण १६ प्रकारच्या झाडांची पाने पूजेसाठी वापरली जातात. षोडषोपचारपूजा आटोपल्यानंतर प्रसाद वाटला जातो. त्यानंतर पूजेसाठी आलेल्या सवाष्णींचे भोजन होते.
या दिवशी रात्री जागरण केले जाते. यामध्ये विविध खेळ खेळण्याची परंपरा आहे. वटवाघूळ फुगडी, बस फुगडी, तवा फुगडी, फिंगरी फुगडी, वाकडी फुगडी, आगोटापागोटा, साळुंकी, गाठोडे, लाटा बाई लाटा, घोडा हाट, करवंटी झिम्मा, टिपऱ्या, गोफ, सासू-सून भांडण, अडवळ घुम पडवळ घुम, सवतीचे भांडण, दिंड, घोडा यांसारख्या पारंपरिक खेळांचा यात समावेश असतो. मंगळागौरीच्या जाग्रणामध्ये साधारणपणे ११० प्रकारचे खेळ खेळले जातात. यात तब्बल २१ प्रकारच्या फुगड्या आणि ६ प्रकार आगोटा पागोट्याचे असतात.
हे खेळ शांतपणे खेळले जात नाहीत तर त्यांच्यासोबत पारंपरिक गाणीदेखील गायली जातात. (Marathi Mangalagaur Songs) अशीच काही मंगळागौरीची गाणी आपण या लेखात पाहणार आहोत.
मंगळागौरीची गाणी (Mangalagaur Songs in Marathi)
१. पोरी पिंगा ग पोरी पिंगा Pori Pinga ga Lyrics
पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा !
तुझ्या पिंग्यानं मला बोलिवली, रात जागवली पोरी पिंगा !
फेटा बांधल्याला भाऊ माझा ग जावई तुझा ग पोरी पिंगा
तुझ्या पिंग्यानं मला बोलिवली, झोप चाळिवली पोरी पिंगा !
शालू नेसल्याली भैन माझी ग सून तुझी ग पोरी पिंगा
तुझ्या पिंग्यानं मला बोलिवली, मागं घालिवली पोरी पिंगा !
भाऊ माझा ग, तो ब राजा ग, अग जा जा ग पोरी पिंगा
तुझ्या पिंग्यानं मला बोलिवली, मला बोलिवली पोरी पिंगा !
तुझ्या भावाचं डोळं चकणं ग, रूप हेकणं ग पोरी पिंगा
भैन माझी ग लेक इंद्राची कोर चंद्राची पोरी पिंगा !
तुझ्या भैनीचं नाक नकटं ग त्वांड चपटं ग पोरी पिंगा
माझ्या भावाचा भारी दरारा पळती थरारा सारे पिंगा !
भाऊ तुझा ग भितो झुरळाला, काळ्या उंदराला पोरी पिंगा
भैन माझी ग जशी कोकिळा गाते मंजुळा पोरी पिंगा !
तुझ्या भैनीचं काय नरडं ग कावळं वरडं ग पोरी पिंगा
अशा भैनीला कोण आणणार कशी नांदणार पोरी पिंगा !
भैन माझी ग जाई बावरून घेई सावरून पोरी पिंगा
तुझ्या पिंग्यानं मला बोलिवलं, लुगडं नेशिवलं पोरी पिंगा !
२. नाच ग घुमा, कशी मी नाचू ? Nach ga Ghuma Marathi Mangalagaur Song Lyrics
नाच ग घुमा, कशी मी नाचू ?
ह्या गावचा, त्या गावचा सोनार नाही आला
जोडवी न्हाई मला कशी मी नाचू ?
नाच ग घुमा !
ह्या गावचा, त्या गावचा शिंपी न्हाई आला
चोळी न्हाई मला कशी मी नाचू ?
नाच ग घुमा !
ह्या गावचा, त्या गावचा कासार न्हाई आला
बांगडी न्हाई मला कशी मी नाचू ?
नाच ग घुमा !
फू बाई फू फुगडी चमचम् करतीया बुगडी !
पाट बाई पाट चंदनाचा पाट
पतीदेव बघत्यात माडीवर वाट
बारा घरच्या बायका एक जागी मिळू या
चला झिम्मा खेळू या ग चला झिम्मा खेळू या !
लेक बोलते लाडकी घरी गोकूळ साजणी
वसुदेव देवकीचा कान्हा खेळतो अंगणी
बाळ नवसाचा माझा त्याची दृष्ट काढू या
चला झिम्मा खेळू या ग चला झिम्मा खेळू या !
घुमु दे घागर घुमु दे खेळात जीव ह्यो रमु दे
गडनी घागर फुकतीया, मागं नि म्होरं झुकतीया
नाचून बाई माझी दमू दे, खेळात जीव ह्यो रमू दे
घुमु दे घागर घुमु दे !
३. आंबा पिकतो रस गळतो Aamba Pikato Ras Galato Lyrics
आंबा पिकतो रस गळतो
कोकणचा राजा झिम्मा खेळतो.
झिम पोरी झिम कपाळाचा भीम
भीम गेला फुटून पोरी आल्या उठून
सरसर गोविंदा येतो.
मजवरी गुलाल फेकीतो
या या झिम्मा खेळाया
आमच्या वेण्या घालाया.
एक वेणी मोकळी
सोनाराची साखळी.
घडव घढव रे सोनारा.
माणिकमोत्यांचा लोणारा.
लोणाराशी काढ त्या
आम्ही बहिणी लाडक्या.
४. एक लिंबू झेलू बाई Ek Limbu Zelu Baai Lyrics
एक लिंबू झेलू बाई दोन लिंब झेलू
दोन लिंब झेलू बाई तीन लिंब झेलू
तीन लिंब झेलू बाई चार लिंब झेलू
चार लिंब झेलू बाई पाच लिंब झेलू
पाचा लिंबाचा पानोठा
माळ घालू हनुमंता
हनुमंताची निळी घोडी
येता जाता कमळे तोडी
कमळाच्या पाठीमागे लागली राणी
अग अग राणी इथे कुठे पाणी
पाणी नव्हे यमुना जमुना
यमुना जमुनाची बारीक वाळू
तेथे खेळे चिल्लार बाळू
चिल्लार बाळाला भूक लागली
निज रे निजरे चिलार बाळा
मी तर जाते सोनार वाडा
सोनार दादा सोनार दादा
गौरीचे मोती झाले का नाही
गौरीच्या घरी तांब्याच्या चुली
भोजन घातले आवळीखाली
उष्ट्या पत्रावळी चिंचेखाली
पान सुपारी उद्या दुपारी
वाचकहो तुम्हांला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कंमेंट द्वारे जरूर कळवा. जेणेकरून अशीच नवनवीन माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. आशा करतो ही माहिती तुम्हाला आवडली असेल. आपल्या मित्र मैत्रिणींबरोबर नक्की शेअर करा.