Road Safety World Series 2021 । अंतिम सामन्यात भारताचा दणदणीत विजय, युवराज आणि युसूफ पठाण जुन्या अवतारात

| | ,

काल रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजचा अंतिम सामना (Road Safety World Series 2021 Final) छत्तीसगड रायपूर येथील शहीद वीर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर पार पडला.

या सामन्यात इंडिया लेजंड्स संघाने श्रीलंका लेजंड्सचा पराभव करत चषकावर आपले नाव कोरले आहे.

इंडिया लेजंड्सने श्रीलंका लेजंड्सचा १४ धावांनी पराभव केला.

युसूफ पठाण आणि युवराज सिंह भारताच्या विजयाचे शिल्पकार ठरले.

फलंदाजीसाठी अनुकूल असलेल्या धावपट्टीवर श्रीलंका लेजंड्स चा कर्णधार तिलकरत्ने दिलशान याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

त्याच्या या निर्णयाला योग्य ठरवत श्रीलंकन गोलंदाजांनी सुरुवातीलाच सेहवागला बाद करत भारताला पहिला धक्का दिला.

यानंतर बद्रीनाथ ७(५)आणि सचिन तेंडुलकर ३० (२३) याना म्हणावे तसे यश आले नाही.

१०.३ षटकांच्या समाप्तीनंतर इंडिया लेजंड्सने ३ गडी बाद ७८ धावा जमवल्या होत्या.

युवी-युसुफची आतिषबाजी

यानंतर मात्र मैदानात उतरलेल्या युवराज सिंह आणि युसूफ पठाण यांनी श्रीलंकन गोलंदाजांचा खरपूस समाचार घेण्यास सुरुवात केली.

युवराज सिंहने ४ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ४१ चेंडूत ६० धाव केल्या तर युसूफ पठाणने ३६ चेंडूंचा सामना करत ४ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने ६२ धावा कुटल्या.

त्यांच्या या आतिषबाजीमुळे भारतीय संघाला निर्धारित २० षटकांमध्ये १८१ धावा धावफलकावर लावण्यात यश आले.

कडवा प्रतिकार

१८२ धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या श्रीलंका लेजंड्स संघाची सुरुवात दमदार झाली.

दिलशान आणि जयसूर्या यांनी ५ षटकातच ५० धावा संघाच्या धावफलकावर लावल्या.

आठव्या षटकात युसूफ पठाणने दिलशानला बाद करत श्रीलंकेला पहिला धक्का दिला.

यानंतर जयसूर्या, थरंगा, चमारा सिल्वा याना ठराविक अंतराने बाद करत भारताने सामना आपल्या बाजूने झुकवला.

परंतु जयसिंगे ४० (३०) आणि वीररत्ने ३८ (१५) यांनी आकर्षक फटकेबाजी करत श्रीलंकेला सामन्यामध्ये टिकवून ठेवले.

हे दोघे बाद झाल्यानंतर भारताचा विजय निश्चित झाला.

श्रीलंका लेजंड्स २० षटकांमध्ये फक्त १६७ धावांपर्यंत मजल मारू शकला आणि भारताने हा सामना १४ धावांनी जिंकला.

भारतातर्फे युसूफ पठाण आणि इरफान पठाण यांनी प्रत्येकी २-२ तर मनप्रीत गोनी आणि मुनाफ पटेल यांनी प्रत्येकी १-१ बळी मिळवले.

युसूफ पठाण याला सामनावीर तर अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या तिलकरत्ने दिल्शानला मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

Previous

Road Safety World Series 2021। इंडिया लेजंड्स आणि श्रीलंका लेजंड्स यांच्यात रंगणार अंतिम सामना

मराठी वाक्प्रचार आणि वाक्यात उपयोग

Next

Leave a Comment