माझा आवडता ऋतू (पावसाळा) मराठी निबंध | My Favorite Season Essay in Marathi

| |

या लेखात आपण माझा आवडता ऋतू (My Favorite Season Essay in Marathi) या विषयावर मराठी निबंध पाहणार आहोत. प्रत्येकाचा आवडता ऋतू वेगवेगळा असू शकतो. याठिकाणी आपण पावसाळ्यावर निबंध (Essay on Rainy Season in Marathi) लिहिला आहे. पहिली ते दहावीतील विद्यार्थ्यांना उपयोगी पडेल असे वेगवेगळ्या टप्प्यात निबंधलेखन केले आहे. शाळा सुरु झाल्यानंतर शिक्षक माझा आवडता ऋतू किंवा पावसाळ्यावर निबंध लिहायला सांगतात. त्यावेळी हि माहिती तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल.

दहा ओळींमध्ये माझा आवडता ऋतू मराठी निबंध (My Favorite Season Marathi Essay in 10 Lines)

१. पावसाळा हा ऋतू उन्हाळ्यानंतर येतो.

२. पावसाळा ऋतू जून मध्ये सुरू होऊन सप्टेंबरमध्ये संपतो.

३. उन्हाळी सुट्टीनंतर पावसाळा ऋतूमध्ये आमची शाळा सुरू होते.

४. पावसाळ्यामध्ये आकाशात निळेभोर ढग दाटून येतात, त्यामुळे सर्वत्र अंधार पडल्यासारखे वाटते.

५. या ऋतूमध्ये रस्ते आणि जमीन सगळीकडे पाणी असते त्यामुळे चिखल होतो.

६. मला पावसात भिजत-भिजत खेळायला खूप आवडते.

७. पावसामुळे आपल्याला शेतीसाठी व पिण्यासाठी पाणी मिळते.

८. पावसाळ्यामध्ये मला माझ्या आवडीचे इंद्रधनुष्य दिसते.

९. शेतकऱ्यांसाठी पावसाळा अतिशय मेहनतीचा ऋतू असतो, या काळात शेतकरी खूप मेहनत करून आपल्या सर्वांसाठी अन्न तयार करतात.

१०. सर्व ऋतूंमध्ये पावसाळा हा माझा सर्वात आवडीचा ऋतू आहे.

धन्यवाद…!

आणखी वाचा : स्वातंत्र्यदिन मराठी निबंध

तीनशे शब्दांमध्ये माझा आवडता ऋतू मराठी निबंध (My Favorite Season Essay in Marathi in 300 Words)

पावसाळा हा माझा सर्वात आवडीचा ऋतू आहे, कारण यामध्ये माझा जीव की प्राण असलेला पाऊस पडतो. पावसाळ्यामध्ये जवळपास सतत पाऊसधार बरसतच असते. तसेच पाऊस पडो किंवा न पडो  आकाश नेहमी काळ्या ढगांनी दाटलेलेच असते.

पावसाळा ऋतू हा वर्षातील सर्वोत्तम आणि सर्वात आल्हाददायी हंगाम आहे. प्रदीर्घ मोठ्या कडक उन्हाळ्यानंतर तो जमीन, मानव आणि प्राण्यांसाठी खऱ्या अर्थाने सुख-समाधान घेऊन येतो. पाऊस सर्वांनाच आवडतो, निसर्ग स्वतः त्याच्या आगमनाने सुखावून जातो असे दिसते.

कोरड्या जमिनीवर पहिला पाऊस पडताच, एक कस्तुरीहूनही सुंदर मनमोहक सुवास सर्वदूर पसरतो, हवा आणि जमीन स्वच्छ आणि ताजी दिसते. कोरड्या आणि निर्जीव पडलेल्या जमिनीवर नवीन लहान-लहान झाडे आणि गवत उगवते. निसर्ग पुन्हा त्याच्या मूळ रुपात येतो.  उन्हाळ्यात मलूल पडलेले त्याचे वैभव पुन्हा नव्याने प्रकट करतो. कीटक, सरपटणारे प्राणी, उभयचर इत्यादींसह पृथ्वीवरील सर्वच प्राणी सुप्तावस्थेतून बाहेर पडतात आणि दीर्घ विश्रांतीनंतर पुन्हा पर्यावरणाच्या समतोलात स्वतःला झोकून देतात.

आणखी वाचा : माझी सहल मराठी निबंध

पावसाळ्यात पडणाऱ्या पावसाच्या प्रमाणावर अनेक पिके अवलंबून असल्याने पावसाळा शेतकऱ्यांसाठी सुद्धा वरदानच ठरतो. मान्सूनच्या आगमनानंतर पेरलेल्या पिकांना खरीप पिके म्हणतात आणि त्यात तांदूळ, मका, कडधान्ये, बाजरी इ. यांचा समावेश होतो. या पिकांना ठराविक प्रमाणात पाणी लागते, जे केवळ पावसाने मिळू शकते. भारत, बांगलादेश आणि यांसारखे अनेक विकसनशील देश पिकांच्या उत्पादनासाठी मोठ्या प्रमाणात पावसावर अवलंबून असतात.

मला पावसाळा हा ऋतू त्यामध्ये चाखायला मिळणाऱ्या विविध फळांमुळे सुद्धा फार आवडतो. पावसाळ्याच्या तोंडापर्यंत आपल्याला फळांचा राजा असणाऱ्या आंब्याचा आस्वाद घेता येतो. तसेच पावसाळ्यातील सर्वात जास्त पसंतीचे फळ म्हणजे जांभूळ किंवा जामुन होय. मी जांभूळ फळ खाण्यासाठी म्हणून पावसाळ्याची अगदी चातकासारखी वाट बघत असतो. याशिवाय मनुका, लिची, पीच, डाळिंब, सफरचंद इत्यादी फळांचे उत्पादन सुद्धा पावसाळ्यात होते.

पावसाळा हा वर्षातील सर्वोत्तम ऋतू आहे यात कुठलीही शंका नाही. हिवाळा आणि उन्हाळ्यापेक्षा पावसाळ्यातील हवामान आरामदायक आणि अतिशय आनंददायी आहे. असे असले तरी, आर्थिक दृष्टिकोनातून बघतानासुद्धा शेतकरी आणि कृषी व्यापारी यांच्यासाठी हा ऋतू खूप महत्त्वाचा ठरतो. 

धन्यवाद…!

आणखी वाचा : वेळेचे महत्व मराठी निबंध

पाचशे शब्दांमध्ये माझा आवडता ऋतू मराठी निबंध (My Favorite Season Marathi Essay in 500 Words)

मित्रानो, अनेक लोकांना पावसाळा आवडतो. लहानपणापासून पाऊस सुरू झाला की माझ्याही अंगात एक वेगळाच आनंद संचारतो. नवीन शाळेची सुरुवात, नव्या वह्यापुस्तकांचा छान वास जोडीला मातीचा सुगंध, निसर्गाचा ताजेपणा, शेतीची कामे करताना शेतकऱ्यांची उडालेली  धांदल आणि वरून बरसणारा वरुणराजा हे दृश्य बघणं अगदी मनोहर असते. आम्हा विद्यार्थ्यांना पावसाचे महत्त्व सांगणाऱ्या कविता आणि पावसाची प्रक्रिया आणि त्याची वेळ शिकवणारे भूगोल आणि विज्ञानातील धडे अभ्यासाची अनावर गोडी लावतात.

पावसाचे कितीही सुंदर वर्णन केले तरी ते कमीच पडते. कधी कधी असं वाटतं की निसर्ग आपले संपूर्ण सौंदर्य फक्त पावसातच व्यक्त करत असेल. कविता आपल्या शब्दात अनेक प्रकारे पाऊस साठवते. पावसाचे पाणी, त्याचा आवाज, मातीचा सुगंध, संपूर्ण जंगल आणि हिरवाईने नटलेलं शेत पाहणाऱ्याला मंत्रमुग्ध करते.

पाऊस सुरू होण्यापूर्वी अनेक गूढ घडामोडी सुरू होतात. पक्षी, प्राणी, वनस्पती सजग होतात. ढगांची शंखासारखी गर्जना सुरू होते, आणि मग हळूहळू पावसाचे थेंब जमिनीवर पडतात. 

त्यांना स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव होते. पावसाळा हा ऋतू जून ते सप्टेंबर पर्यंत असतो. शाळा सुरू होणे आणि पावसाचे आगमन एकाच वेळी होत असते. शाळेचा नवा वर्ग आणि पावसाची रिमझिम एकाच वेळी सुरू होते. त्यामुळे पावसाचे अन माझे नाते फार जुने आहे.

आणखी वाचा : झाडांचे महत्त्व मराठी निबंध

२१ वे शतक अनेक बदलांचे साक्षीदार बनले आहे. हे बदल प्रामुख्याने राहणीमानाबाबतचे बदल आहेत. त्यामुळे भारत हा कृषीप्रधान देश असूनही शहरी भागात आता पावसात फारसा रस उरलेला दिसत नाही. असे असले तरीही ग्रामीण आणि निमशहरी भागात मात्र पावसाची सुरुवात ही नव्या जीवनाची सुरुवात झाल्यासारखे वाटते.

निसर्गाचे चक्र नेहमी एका विशिष्ट पद्धतीने चालू असते. हिवाळा आणि उन्हाळा हे ऋतू वेगवेगळ्या पद्धतीने पृथ्वीच्या सर्व परिस्थितीची काळजी घेतात तर पावसाळा पृथ्वीला पाण्याचे दान देतो. उन्हाळ्यात पाण्याचे बाष्पीभवन होऊन वातावरणातील बदलामुळे ढग तयार होतात आणि चार महिन्यांच्या कालावधीत पाण्याच्या रूपात जमिनीवर पुन्हा बरसतात. याला जलचक्र असे देखील म्हणले जाते, कारण हे चक्र दरवर्षी पुन्हा पुन्हा घडत असते.

मला पावसाळा हा ऋतू आवडण्याचे मुख्य कारण म्हणजे विश्वातील प्रत्येक गोष्ट सजीव रूपात कार्यरत असते. हवा, पाणी आणि झाडं आपल्या आयुष्यात नवे रंग भरतात, आपल्या मनाला नवी उभारी देतात.  मस्त गारवा आणि सुगंधी, हिरवागार, आल्हादादयक निसर्ग  या दृश्यामुळे मला पाऊस खूप आवडतो. दरवर्षी पहिल्या पावसात भिजणे हे माझे जणू नित्य कर्तव्यच झाले आहे.

पावसाळ्यात पक्षी सुद्धा आनंदून जातात कोकिळ पक्षी तल्लीन होऊन गाणे गातो तर पोपट आणि मोर पावसात बेभान होऊन नाच करण्याचा आनंद लुटतात. पावसात नाचणारा मोर हे एक आकर्षक आणि मनमोहक सौंदर्याचे उदाहरण आहे. शेतीची सर्व कामे पावसाळ्यात केली जातात. शेतकरी उभ्या जगाच्या वर्षभराच्या अन्नाची सोय करण्यासाठी पावसाळ्यात धान्याचे उत्पादन घेतो. त्यामुळे वर्षभरातील पाळीव प्राणी आणि माणसांचे जनजीवन सुखकर होण्यास मदत मिळते, तसेच देशाच्या अर्थव्यवस्थेतही भर पडते.

मित्रानो आपण पावसाचे कितीही मोठे चाहते असलो तरी सध्या मात्र पाऊस अनियमित होऊ लागला आहे. प्रदूषण, वाढती लोकसंख्या, नैसर्गिक साधनसंपत्तीचा प्रचंड प्रमाणात झालेला ऱ्हास यामुळे निसर्गाची मोठ्या प्रमाणात हानी होत आहे. जंगलतोड हा देखील एक पावसाच्या अनियमित होण्यास कारणीभूत असलेला घटक आहे. वृक्षतोड व बेसुमार जंगलतोड यामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण होत असल्याचे चित्र दिसते. शिवाय, पावसामुळे शहरातील पिण्याच्या पाण्यात कपात केली जाते, त्यामुळे शहरी लोक केवळ न पडणाऱ्या पावसाचा तिरस्कार करतात, मात्र पाऊस न पडण्यात कारणीभूत असणाऱ्या वृक्षतोड आणि प्रदूषणासारख्या गोष्टींवर आळा घालताना दिसत नाहीत.

आपण आपली जाणीव आणि निसर्गाविषयी असणारी संवेदनशीलता कुठेतरी वाढवली पाहिजे. पाऊस आपल्यासाठी जीवन आहे. निसर्ग काहीही न मागता आपल्या खाण्यापिण्याच्या मूलभूत गरजा पूर्ण करतो. त्यामुळे मानवाला पावसाचे खूप उपकार आहेत असे म्हणता येईल.

आणखी वाचा : माझी आई मराठी निबंध

एक हजार शब्दांमध्ये माझा आवडता ऋतू- पावसाळा मराठी निबंध (My Favorite Season- Rainy Season Marathi Essay in 1000 Words)

पावसाचे आघात झेलूनच

माती बनते सुगंधी…

तिचा गोडवा पसरताच 

वातावरण होते आनंदी…

मित्रहो, आपल्या भारत देशात वर्षभरात तीन ऋतू बघायला मिळतात.  ज्यामध्ये उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा ह्या ऋतूंचा समावेश होतो. मात्र उप-ऋतू विचारात घेतल्यास आपल्या देशात उन्हाळा, पाऊस, हिवाळा, हिवाळापूर्व, शरद आणि वसंत ऋतु असे एकूण सहा ऋतू पडतात जे दर दोन महिन्यांनी बदलतात.

ऋतूंच्या नावानुसार पृथ्वीचे वातावरण सुद्धा बदलते, त्यातील एक म्हणजे पावसाळा, जो संपूर्ण वर्षभरातील सर्वात आल्हाददायक ऋतू आहे.

पावसाळ्यात, खूप जोरदार आणि मुसळधार पाऊस पडतो, अनेक वेळा आठवडे-आठवडे सतत पाऊस पडतो.  जुलैमध्ये सुरू होणारा पाऊस ऑगस्टमध्ये थांबतो.

पावसाळ्याचे आगमन झाले की, सगळीकडे आनंद आणि हिरवळ यांना उधाण येते, उकाड्याने आणि उष्माघाताने त्रासलेले जनजीवन पावसाने काहीसे सुखावते.

पावसाळ्यात लहान मुले खूप खेळतात आणि पावसाच्या पाण्यात त्यांच्या कागदी होड्या सोडतात,  त्याचप्रमाणे शेतकरी देखील त्याचे पीक बहरत असल्याने खूप आनंदी होतो. 

जंगलातील वाळलेल्या  झाडांची नवीन अंकुरलेली फुटवे पावसाळ्यात पुन्हा उगवली जातात. कोरड्या, काळ्या, उजाड टेकड्यांवर हिरवाईची चादर पसरलेली आहे, सगळीकडे रंगीबेरंगी फुले दिसत आहेत असे दृश्य केवळ पावसाळ्यातच बघायला मिळते.

आणखी वाचा : राष्ट्रीय एकात्मता मराठी निबंध

नद्या, तलाव, सरोवरे, बंधारे आदी सर्वच पाण्याने तुडुंब भरले जातात, संपूर्ण वातावरण थंडगार आणि आल्हाददायक होऊन जाते. प्राणी हिरवे गवत आणि लहान सहान झुडपे खाण्याचा मनमुराद आनंद लुटतात. असा पावसाळा सर्वांनाच आवडतो यात काही नवल नसावे. पावसाळ्याचे आगमन ही पृथ्वीवरील सर्व सजीवांसाठी जणू आनंदाची गुरुकिल्लीच आहे.

पावसाळा हा सर्व ऋतूंमध्ये सर्वोत्तम ऋतू मानला जातो, जेव्हा जेव्हा पाऊस येतो तेव्हा तेव्हा पृथ्वीचा कण अन कण आवेशाने अगदी फुलून जातो.

उन्हाळ्यानंतर पृथ्वीवर जेव्हा मान्सूनचा पहिला पाऊस पडतो, तेव्हा जमिनीतून एक मंद असा सुवासिक वास येतो, ज्याच्या पुढे जगातील सर्वात महाग सुवासिक अत्तर देखील फिके पडते.

आपला देश उष्ण कटिबंधीय क्षेत्रात येतो, त्यामुळे आपल्याकडे उष्णता अधिक असते, तसेच नद्यांमध्ये सुद्धा पाण्याची बारा महिने उपलब्धता नसते, त्यामुळे आपल्याकडे पाण्याची कमतरता असते. ह्याच कारणामुळे आपल्या देशात पावसाळ्याचे महत्त्व अधिकच वाढते, पावसाळा आला की सर्वांच्याच मनाला आनंद होतो.

पाऊस चांगल्या प्रमाणात झाला की, देशाच्या प्रत्येक भागातील पिके चहूबाजूंनी हिरवाईने नटतात जणू पृथ्वीने हिरवी शालच पांघरली आहे.

पावसाळ्यात सर्व नदी नाले आणि तलाव पाण्याने काठोकाठ भरले जातात, त्यामुळे पृथ्वीवरील सर्व सजीवांना पिण्याचे गोड पाणी मिळते.

पावसामुळे पृथ्वीच्या भूजल पातळीतही वाढ होते त्यामुळे उष्णतेचा त्रास कमी होतो आणि थंडगार वारे सगळीकडे फिरत वातावरणाला अगदी प्रफुल्लित करतात. पाऊस चांगला झाला तर देशाची प्रगतीही वेगाने होते.  बहुतांश पाणीटंचाई मान्सूनच्या पावसाने पूर्ण होत असल्याने पावसाचे महत्त्व आपल्या जीवनात अतुलनीय आहे.

पावसाळ्याचा लाभ संपूर्ण पर्यावरणाला मिळतो.

शेतकऱ्यांसाठी पावसाळा हा एखाद्या वरदानापेक्षा कमी नसतो कारण पावसाळ्यापूर्वी शेतकरी आपल्या शेतात मशागत करून व खत टाकून शेत तयार करतात.

कडाक्याच्या उन्हात शेतकरी दिवसभर काबाडकष्ट करतो आणि मग ढग कधी दाटून येतात आणि पाऊस कधी पडतो हे पाहण्यासाठी आकाशाकडे टक लावून बसतो.

 आपल्या देशातील बहुतांश शेतकरी मान्सूनवर आधारित पावसावरच आपली पिके पेरतात. 

आणखी वाचा : स्वच्छतेचे महत्व मराठी निबंध

आपल्या पृथ्वीच्या पर्यावरणाचे चक्र सुरळीतपणे चालवण्यासाठी पावसाळ्याचे खूप महत्त्व आहे, जर पाऊसच अस्तित्वात नसेल तर संपूर्ण पर्यावरण व्यवस्था बिघडेल.

सर्वत्र पाण्यासाठी मारामार होईल, मग पृथ्वीवर जीवन जगणे कठीण होऊन जाईल.कारण पाऊस आला की जनावरांसाठी चारा आणि इतर पिकांनाही पाणी उपलब्ध होते तसेच संपूर्ण जीवसृष्टी साठी पिण्याच्या पाण्याची सोय होते.

पृथ्वीचे जन-जीवन पुन्हा एकदा पूर्वपदावर येते. म्हणूनच असा हा आपल्या पर्यावरणासाठी अतिशय महत्त्वाचा असणारा पावसाळा मला मनापासून आवडतो.

कडक उन्हामुळे सर्व झाडे, झुडपे, गवत सुकून जाते, तसेच पाण्याचे तळे, नद्या कोरड्या पडतात, त्यामुळे जनावरांना सुद्धा खायला काहीच मिळत नाही आणि पिण्यासाठी पाणीही उरत नाही. मात्र पावसाळा आला की पुन्हा पाणी आणि अन्नाची टंचाई दूर होते, त्यामुळे पावसाळा जनावरांसाठी सुद्धा अमृतसारखं काम करतो.

उष्णतेमुळे आणि अति तापमानामुळे पृथ्वीवरील पाणी वाफ होऊन उडून जाते आणि मानवाकडून भूजलाच्या अतिशोषणामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी कमी होते त्यामुळे पृथ्वी तापते परिणामी आपल्याला शुद्ध पाणीही प्यायला मिळत नाही.

पावसाळा आला की पावसामुळे भूजल पातळी वाढते, त्यामुळे पृथ्वीचे तापमानही कमी होते आणि आपल्याला शुद्ध पाण्याची उपलब्धता पुन्हा होते.

आपला भारत हा कृषिप्रधान देश आहे, त्यामुळे येथील बहुतांश उत्पन्न हे शेतीतूनच येते, त्यामुळे ज्या वर्षी चांगला पाऊस पडत नाही, त्या वर्षी सर्व वस्तूंचे भाव वाढतात आणि व्यवसाय संथ गतीने चालतो. मात्र पाऊस जर चांगला झाला तर शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळते आणि ते बाजारात येऊन नवीन वस्तू खरेदी करतात, त्यामुळे व्यवसायात झपाट्याने वाढ होते.

आजही आपल्या देशाच्या उत्पन्नापैकी 70% पेक्षा जास्त उत्पन्न हे शेतीतून होते, त्यामुळे आपल्या देशातील बहुतांश लोक अजूनही शेतकरी आहेत.

त्यामुळे जेव्हा जेव्हा जास्त पाऊस पडतो आणि पीक चांगले येते तेव्हा शेतीसह प्रत्येक प्रकारच्या व्यवसायात तेजी येते.

मित्रहो, ज्यापद्धतीने पावसाळ्याचे फायदे आहेत त्याचप्रमाणे पावसाळ्यामुळे काही प्रमाणात नुकसान सुद्धा होते, मात्र हे नुकसान बऱ्याचदा मानवनिर्मित कारणांमुळे असल्याचे दिसून येते. 

आणखी वाचा : माझी शाळा मराठी निबंध

अतिवृष्टीमुळे किंवा नदी-नाल्यांमध्ये पावसाचे पाणी सामावू न शकल्याने पूरपरिस्थिती निर्माण होते ज्यामुळे पीके,  सार्वजनिक संपत्ती, जनावरे, घरे इत्यादीचे मोठे नुकसान होते. हा पूर देखील मानवाने केलेल्या चुकांमुळेच येतो, कारण मानवाने जंगले कापली आहेत, गटारांमध्ये कचरा टाकून त्यांना अडवले ज्यामुळे पाणी पारंपरिक जलप्रवाहांमध्ये बसत नाही, आणि हे पाणी मानव-वसाहतींमध्ये शिरून पूर निर्माण होण्यास कारणीभूत ठरते.

पुरामुळे होणाऱ्या जीवितहानिस मानवच कारणीभूत आहे, कारण मानवाने नद्यांच्या जवळ आपले राहण्याचे ठिकाण बनविले आहे आणि त्यांचे प्रवाह अडवले आहेत त्यामुळे पूर परिस्थिती उद्भवली जाते.

मानवाने आपल्या मर्यादेत राहिल्यास पूरपरिस्थिती एवढे भयंकर स्वरूप धारण करू शकत नाही.

पावसाळ्यात कॉलरा, मलेरिया, त्वचारोग, खोकला, सर्दी इत्यादी मोसमी आजारांचे प्रमाण खूप जास्त असते, परंतु यातील बहुतांश आजार हे मानवाकडून होणाऱ्या प्रदूषणामुळे होतात हे सुद्धा तितकेच महत्वाचे आहे.

मानवाने पर्यावरणाची काळजी घेतली तर पावसाळ्यात कोणतेही आजार होणार नाहीत.

अतिवृष्टीमुळे जमिनीची धूप सुरू होते, ज्यामुळे बारीक, सुपीक माती वाहून जाते. जे पर्यावरण आणि पिकांसाठी चांगले नसते.

जमिनीची धूप होण्याची परिस्थिती सध्या खूप दिसून येत आहे कारण मानवाकडून जास्त प्रमाणात झाडे कापली जात आहेत, म्हणूनच जमिनीची धूप होत आहे, त्यामुळे आपल्याला अधिकाधिक झाडे लावावी लागतील आणि धूप थांबवावी लागेल.

मला पावसाळा ऋतू आवडण्याचे आणखी एक कारण म्हणजे पावसाळ्याच्या आगमनानंतर भारतात सणांची रेलचेल सुरू होते, भारतात पावसामुळे आणि त्यात येणाऱ्या सणांमुळे सर्वांना दुहेरी आनंद मिळतो आणि संपूर्ण वातावरण थंड, चैतन्यमय आणि मंत्रमुग्ध होऊन जाते.

पावसाळ्यात आणि पावसाळ्यानंतर साजरे होणारे महत्वाच्या सणांमध्ये तीज, रक्षाबंधन आणि दिवाळी यांचा समावेश होतो.

पावसाळ्यामुळे, लोकांच्या संपूर्ण आयुष्यात आनंदाची लाट आलेली असते, म्हणून पावसाळा हा पृथ्वीवरील सर्व सजीवांच्या जीवनासाठी जणू अमृत म्हणूनच काम करतो.

पावसाळ्यात शेतात वाढणाऱ्या हिरव्यागार पिकाचे सुंदर दृश्य अतिशय आल्हाददायक असते, आजूबाजूला हिरवळ पाहून प्रत्येकालाच मनःशांती मिळत असते.

प्राणी, पक्षी आपली मरगळ झटकून नवी सुरुवात करतात आणि पावसाळ्यामुळे सर्व प्राणीमात्रांना मिळणारा उष्णतेपासूनचा दिलासा याची काही कल्पनाच करता येत नाही.

पावसाळ्यात सर्व प्राणीमात्रांना आनंदी करण्याची ताकत आहे पण पावसाळ्याला सुद्धा आपण आनंदी करायला हवे, कसे? दुसरे काही केलं नाही तरी चालेल फक्त पावसाळ्यात पाणी साठवून तर इतर ऋतूमध्ये पाणी वाचवून आपण पावसाळ्याचा सन्मान केला पाहिजे.

धन्यवाद…!

आणखी वाचा : राजमाता जिजाऊ मराठी निबंध

मित्रांनो आजच्या लेखामधील विविध प्रकारातील पावसाळा या ऋतू वरील निबंध (Essay on Rainy Season in marathi) तुम्हाला कसे वाटले ते आम्हाला कळविण्यास विसरू नका,  तसेच आपल्या पाल्यांना, किंवा इतर विद्यार्थ्यांना मार्गदर्शक म्हणून हे निबंध जरूर शेअर करा.

Previous

स्वातंत्र्यदिन मराठी निबंध । Independence Day Essay in Marathi

मराठी महिन्यांची नावे | Marathi Months Name

Next

Leave a Comment