माझी सहल मराठी निबंध | Mazi Sahal Essay in Marathi

| |

या लेखात सहलीचे वर्णन करण्यात आले आहे. आपण वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जातो काही वेळा मित्र मैत्रिणींसोबत तर काही वेळा आपल्या कुटुंबासोबत. अशाच सहलीचे वर्णन माझी सहल मराठी निबंध (Mazi Sahal Essay in Marathi) म्हणून करण्यात आले आहे. या लेखातील वर्णन हे आम्ही ज्या ठिकाणी फिरायला गेलो होतो त्या ठिकाणचे आहे. या लेखाचा आधार घेऊन तुम्ही तुमच्या सहलीचे वर्णन माझी सहल मराठी निबंध (Mazi Sahal Marathi Nibandh) म्हणून करू शकता. 

दहा ओळींमध्ये माझी सहल मराठी निबंध (10 lines Mazi Sahal Essay in Marathi)

१. आमची शिवनेरी किल्यावर गेलेली सहल माझी सर्वात आवडीची सहल आहे.

२. इयत्ता पहिलीत असताना आमची ही सहल शाळेने आयोजित केली होती.

३. सहलीला जाण्यासाठी आम्ही सर्व विद्यार्थी पहाटे पाच वाजताच शाळेमध्ये जमलो होतो.

४. आमच्या शिंदे सरांनी सर्वांची हजेरी घेतली आणि आमचा प्रवास सुरु झाला.

५. सकाळी साधारण ९ वाजता आमची गाडी नाश्त्यासाठी थांबली, सर्वांनी घरून नाश्त्याचे पदार्थ आणले होते, तसेच फडणवीस सरांनी आम्हाला पॉपकॉर्न सुद्धा वाटले.

६. आम्ही साधारणतः १० वाजेला शिवनेरीवर पोहोचलो, इतिहासाच्या पवार सरांनी आम्हाला शिवनेरी किल्याबद्दल आणि त्याच्या इतिहासाबद्दल सविस्तर माहिती सांगितली.

७. दुपारी आम्ही किल्ल्यावरच जेवण केले आणि थोडावेळ सावलीत आराम केला.

८. ठाकरे सरांच्या “छत्रपती शिवाजी महाराज की” या घोषणेला मोठ्याने “जय” असा प्रतिसाद देत आम्ही संध्याकाळपर्यंत उरलेला किल्ला बघितला आणि परतीच्या प्रवासाला सुरुवात केली.

९. संध्याकाळी ८ वाजेपर्यंत आम्ही पुन्हा शाळेमध्ये पोहोचलो, तेव्हा माझे बाबा मला न्यायला आले होते.

१०. मला माझी शिवनेरीवर गेलेली ही सहल फार आवडते.

धन्यवाद…!

आणखी वाचा : राजमाता जिजाऊ मराठी निबंध

तीनशे शब्दांमध्ये माझी सहल मराठी निबंध (Mazi Sahal Marathi Nibandh in 300 Words)

माझी सहल… निबंधाचा विषय पाहिला अन लगेच माझ्या डोक्यात माझ्या आवडीच्या सहलीचे विचार दाटू लागले, अगदी काय लिहू अन काय नको असे मला झाले. मला नवनवीन ठिकाणी फिरायला फार आवडते. या वर्षीच्या हिवाळ्याच्या सुट्ट्यांचा कालावधी मी सहलीच्या रूपाने खर्च केला. माझे वडील, आई, माझी छोटी बहीण अन्नू आणि मी असे आम्ही चार सदस्य सहलीला गेलो होतो. या सहलीमध्ये रोजच्या शाळेचं व्यस्त वेळापत्रक आणि अभ्यासाचं टेन्शन मी विसरलो तसेच बाबा ऑफिसचं अन आई घराचं रोजचं टेन्शन विसरून अगदी मनमुराद सहलीचा आनंद लुटत होतो. खरंतर या हिवाळी सुट्टीमध्ये बाबा सहलीचा प्लॅन करतील याबद्दल मला खात्री नव्हती. मात्र जेव्हा मला आमच्या सहलीच्या प्लॅन बद्दल कळले तेव्हा मला खरोखरच आश्चर्य वाटले.

आम्ही राजस्थानमधील महत्वाची पर्यटन स्थळे भेट देण्यासाठी निवडले. कारण आम्ही भारतातील इतर महत्त्वाच्या ठिकाणांना आधीच भेटी दिलेल्या आहेत पण राजस्थानच्या रॉयल स्टेटचे जादूई रूप कधीच बघितले नव्हते. राजस्थानमध्ये हिवाळ्याच्या हंगामात उर्वरित भारतीय राज्यांप्रमाणेच थंड हवामानाचा अनुभव घेता येतो. नैसर्गिक सौंदर्याने भरलेले आणि समृद्ध इतिहासाने परिपूर्ण राजस्थान हे राजवाडे, ऐतिहासिक किल्ले आणि संस्कृतीसाठी प्रत्येक पर्यटकांना आकर्षित करणारे प्रसिद्ध पर्यटन ठिकाण म्हणून ओळखले जाते.

आणखी वाचा : राष्ट्रीय एकात्मता मराठी निबंध

जयपूर ही राजस्थानची राजधानी आहे. जयपूरचे राजवाडे, उदयपूरचे तलाव आणि जोधपूर, बिकानेर आणि जैसलमेरचे वाळवंटी किल्ले अनेक पर्यटकांच्या पसंतीचे ठिकाण आहेत. जोधपूरमधील मेहरानगड किल्ला हा राजस्थानमधील सर्वोत्तम किल्ला म्हणून ओळखला जातो. हा किल्ला खास पाहण्यासारखा आहे. उदयपूर, जयपूर आणि जैसलमेर बघून व्हावे म्हणून आम्ही जोधपूरमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. आम्ही अगदी सुरुवातीपासूनच येथे भेट देण्याचे ठरवले होते. जयपूरमध्ये आम्ही जसवंत थडा, उम्मेद भवन पॅलेस आणि मंडोरच्या जुन्या राजधानीतील उद्यानांना भेट दिली. त्यानंतर आम्ही गाव सफारीला गेलो आणि वाळवंटातील जनजीवन पाहिले. 

जयपूरला भेट देऊन आम्ही कारने जैसलमेरला गेलो. गाडीतून प्रवास करताना खूपच मजा आली. गाडीच्या खिडकीतून आम्ही वाळवंटाची अनेक छान दृष्ये पाहिली. जैसलमेरला पोहोचायला आम्हाला साडेचार तास लागले.  जैसलमेर किल्ला, खाबा किल्ला, पटवॉन-की-हवेली, कुलधारा भन्नाट गाव, बडा बाग, सलीम सिंग-की हवेली इ. ठिकाणांना आम्ही तेथे भेट दिली. आम्ही जैसलमेरमध्ये २ रात्री अन ३ दिवस राहिलो आणि आसपासची सर्व ठिकाणे पाहिली. त्यानंतर आम्ही जोधपूरला परतलो आणि जोधपूरला रात्रीची विश्रांती घेतली.

आम्ही जोधपूरला परतलो आणि तेथून आमच्या आग्रा शहरात परत आलो. एकूणच ही सहल माझ्यासाठी खूप छान होती. या सहलीच्या आठवणी अजूनही माझ्या मनात ताज्या आहेत अन त्या मी कधीच विसरू शकत नाही.

धन्यवाद…!

आणखी वाचा : वेळेचे महत्व मराठी निबंध

पाचशे शब्दांमध्ये माझी सहल मराठी निबंध (Mazi Sahal Essay in Marathi in 500 Words)

२०१८ मध्ये मी माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम सहलीला गेलो होतो. तो एक अविस्मरणीय प्रवास होता. या प्रवासाला मी कधीही विसरू शकत नाही, कारण हा प्रवास मी विमानातून केला होता.  ही आमची उन्हाळी सुट्ट्यातील घरघुती सहल होती. या सहलीमुळे मला खूप आनंद झाला कारण मी अशा राज्यांमध्ये/देशांमध्ये गेलो होतो जिथे मी यापूर्वी कधीच गेलो नव्हतो. सहलीत मला नवीन लोक भेटले आणि नवीन ठिकाणी जाऊन मी नवीन गोष्टी पाहिल्या. मी कधीही अशी अपेक्षा केली नव्हती की ही सहल इतकी छान असेल, परंतु ती माझ्या आयुष्यातली आतापर्यंतची सर्वोत्तम सहल ठरली. मी कधीही विसरू शकत नाही असा हा प्रवास का होता? हे मी आजच्या निबंधात तुम्हाला सांगणार आहे.

सर्वप्रथम मी ज्या सहलीबद्दल बोलत आहे ती माझ्या कुटुंबासह केलेली अमेरिकेची सहल होती. मी, माझे आई-वडील आणि माझी भावंडे असे आम्ही 5 लोक गेलो होतो. मला ही सहल खूप आवडली याचे एक कारण म्हणजे, मी अमेरिकेत येण्यापूर्वी या सहलीतच, मी आणि माझे कुटुंब फ्रान्समध्ये सुद्धा थांबलो होतो. फ्रान्सला जाण्याची सुद्धा माझी पहिलीच वेळ होती. म्हणून, मला हा प्रवास खरोखरच मनोरंजक वाटला. माझे कुटुंब आणि मी फ्रान्समध्ये थांबण्याचे मुख्य कारण म्हणजे आम्ही प्रवासासाठी एअर फ्रान्स ही एअरलाइन वापरली, जी माझ्यासाठीही पहिलीच होती आणि तसेही आम्हाला फ्रान्सला जायचेच होते. या सहलीत मी खूप आनंद उपभोगला, भावंडांसोबत खूप मज्जा मस्ती केली, मात्र असे असले तरी विमानातील जेवन मात्र मला बिलकुल आवडले नाही.

आणखी वाचा : झाडांचे महत्त्व मराठी निबंध

दुसरे म्हणजे, मी अमेरिकेत आलो तेव्हा मी आणि माझे कुटुंब सर्वप्रथम न्यूयॉर्कमध्ये उतरलो. न्यूयॉर्कला जाण्याची सुद्धा माझी ही पहिलीच वेळ होती. मला नेहमीच न्यूयॉर्कला जावे असे वाटत होते आणि माझं हे स्वप्न अखेरीस साकार झाले होते. मी न्यूयॉर्क मध्ये घालवलेले दिवस हा माझ्यासाठी एक छान अनुभव होता. न्यूयॉर्कमध्ये माझे चांगले 2 आठवडे तरी गेले असतील. आम्ही या सहलीत प्रसिद्ध स्टॅच्यू ऑफ लिबर्टी सुद्धा पाहिला. मी आणि माझे कुटुंब न्यूयॉर्क शहर फिरायला सुद्धा गेलो होतो. तो एक मजेदार अनुभव होता. न्यूयॉर्कहून पुढे आम्ही अटलांटा येथे गेलो. अटलांटाला गेल्यावर मला खूपच आनंद झाला कारण आम्ही एका कुटुंबाला भेटायला जाणार होतो. आणि मी त्या कुटुंबाला भेटायला खास उत्सुक होतो कारण मी त्यांना गेल्या एका वर्षात पाहिलेही नव्हते. ते कुटुंब दुसरे तिसरे कोणी नसून माझ्या काकांचे अर्थात वडिलांच्या भावाचे कुटुंब होते. आणि मला तिथे माझे भावंडं भेटणार होते.

पुढे आम्ही सर्वजण म्हणजे आमचे अन काकांचे कुटुंब एकत्रच फ्लोरिडाला गेलो होतो. फ्लोरिडाची आमची सहल अधिकच मजेदार आणि मनोरंजक झाली, कारण मज्जा करायला आता आम्ही पाच भावंडं झालो होतो. फ्लोरिडात आल्यावर आम्ही ऑर्लॅंडोमध्ये राहिलो. आम्ही ज्या अपार्टमेंटमध्ये राहिलो ते मला खूप आवडले. जेव्हा आम्ही फ्लोरिडामध्ये होतो तेव्हा आम्ही तेथील अनेक प्रसिद्ध ठिकाणांना भेटी दिल्या आणि फोटोही काढले. आम्ही अनेक ठिकाणी खरेदीला सुद्धा गेलो. मग एके दिवशी आम्ही तेथील प्रसिद्ध अश्या डिस्ने वर्ल्डला गेलो. डिस्ने वर्ल्डमध्ये मला माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम क्षण अनुभवायला मिळाले. मी अनेक राइड्स सुद्धा खेळलो. माझ्यासाठी तरी ते खरोखरच एक मजेदार आणि आकर्षक असे ठिकाण होते.

शेवटी, सर्व ठिकाणांना भेटी देऊन झाल्यावर आम्ही पुन्हा परतीच्या विमानाने भारतात आलो. या सहलीत कितीही मज्जा केली असली तरी भारतात उतरल्यावर मला एक वेगळाच आनंद झाला. माझी ही अमेरिका सहल माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम सहल होती. हा प्रवास मी कधीच विसरू शकत नाही.

धन्यवाद…!

एक हजार शब्दांमध्ये माझी सहल मराठी निबंध (Mazi Sahal Marathi Nibandh in 1000 Words)

सहल करूया निसर्गाची|

शोभा पाहू हिरवाईची||

डोंगरदरीतून वाहणाऱ्या|

शोभाच निराळी पाण्याची||

                ~ सौ. सविता काळे.

‘सहल’ किती छान शब्द ना हा…! हा शब्द ऐकला की थकलं भागलेलं मन क्षणाचाही विलंब न करता प्रफुल्लित होतं. दैनंदिन आयुष्यातून थोडीशी फुरसत काढून स्वतःला वेळ देणे, आणि रोजच्या चिंताग्रस्त जीवनातून मनाला देखील थोडासा विसावा देणे हेच सहलीचे खरे उद्देश म्हणता येईल. शाळेत असताना प्रत्येक जणच सहलीसाठी नादावलेला असायचा.

 मला देखील सहलीला जायला फार आवडतं. मी लहानपणापासून आजपर्यंत अनेक सहलींना गेलो आहे, मात्र माझ्या सर्वात लक्षात राहिलेली आणि आवडीची सहल म्हणजे इयत्ता नववीला असताना शाळेने घेऊन गेलेली सहल होय.

तेव्हा असंच नेहमीप्रमाणे राणे सरांचा गणिताचा तास सुरू होता, आणि राऊत काका जे आमच्या शाळेचे शिपाई होते, ते हातात एक कागद घेऊन वर्गात आले. राणे सरांनी तो कागद घेतला आणि आम्हाला वाचून दाखवला. क्षणभरातच गणिताच्या तासामुळे सर्वांनाच आलेली मरगळ नाहीशी झाली, पूर्ण वर्गभर कुजबुज कुजबुज चालू झाली. सगळी मुलं एका वेगळ्याच स्वप्नात बुडून गेली. काय होतं त्या कागदात?, का अचानक मुलांचे चेहरे बदलले?, आणि का वर्गभर उत्साहाचे वातावरण निर्माण झाले???  अहो दुसरं-तिसरं काही नाही ती पुढच्या महिन्यात कुलू मनाली ला जाणाऱ्या सहलीची सूचना होती. आणि सहलीची सूचना म्हटली की आपोआपच उत्साह हा निर्माण होणारच.

आणखी वाचा : स्वच्छतेचे महत्व मराठी निबंध

इतरांप्रमाणेच मलाही सहलीला जाण्याचे आता वेध लागू लागले होते. तो दिवस सहलीची स्वप्न रंगवण्यात कसा निघून गेला हे मलाही समजले नाही. घरी येताना देखील संपूर्ण वाटभर मी सहलीबाबतच विचार करत होतो. सहलीने जणू माझ्या मनाचा ताबा घेतला होता असेच म्हणा ना.

घरी गेल्यावर देखील मी पटकन बॅग ठेवून हातपाय धुतले आणि नाष्टा करून आईच्या मागे मागे लोंढा घोळायला लागलो. माझे हे बटर मक्खन लावणे आईच्या लगेचच लक्षात आले, पण माझी मज्जा घेण्यासाठी तिने मला काही एक विचारले नाही. कधी नव्हे तो मी आईला शाळेत काय शिकवले, आज कसला अभ्यास केला याबाबत सांगायला लागलो. जेणेकरून आई मला काय हवय असे विचारेल, मात्र आईच्या संयमापेक्षा मी जिंकलो आणि शेवटी न राहून आईने मला लाडाची चापट मारत विचारले, काय कसली मागणी आहे मग आज बाळराजा? मी देखील सांगायला अधिरच झालो होतो, आणि मी आईला म्हटलं आई आमची सहल कुलु मनालीला चालली आहे. आणि मला त्या सहलीला जायचेय. आई हलकेच स्मित हास्य करून म्हणाली, अरे मग मला काय सांगतोस तुझ्या बाबांना विचार आणि जा. आता मात्र मी बाबांच्या येण्याची वाट बघत राहिलो, आणि बाबा आल्या आल्या बाबांची बॅग घेतली आणि बाबांना पाणी दिले. त्यांचे पाणी पिऊन होते नव्हे तोच मी म्हटलं “बाबा बाबा, मला की नाही कुलुमनालीच्या सहलीला जायचं आहे.” बाबा हलकेच हसले आणि काहीही बोलले नाहीत. आता मात्र माझा चेहरा पडला. पुन्हा बाबांना विचारण्याची मला हिम्मत होत नव्हती. त्या दिवशी मी नेहमीपेक्षा थोडेसे कमीच जेवलो, आणि काहीही न बोलता झोपी गेलो. दुसऱ्या दिवशी सकाळी देखील बाबांच्या उत्तराची वाट पाहत होतो, मात्र सकाळी देखील बाबा काहीच बोलले नाहीत. मी तसंच नेहमीप्रमाणे शाळेत गेलो. मात्र पहिल्याच तासाला शिपाई काकांनी मला बोलाविले. खाली स्टाफ रूम मध्ये जाऊन बघतो तर काय माझे बाबा शाळेत आलेले होते. त्यांनी मला बरोबर घेतले आणि आम्ही दोघे सहल प्रमुख श्री साबळे सरांकडे गेलो. बाबांनी माझे सहलीचे पैसे भरले आणि नाव नोंदविले. या अनपेक्षित गोष्टीमुळे माझा आनंद गगनात मावेनासा झाला, आणि मी क्षणाचाही विलंब न करता शाळेतच बाबांना मिठी मारली. माझ्या जवळच्या सर्वच मित्रांनी सुद्धा सहलीला नाव नोंदविले होते.

आणखी वाचा : स्वातंत्र्यदिन मराठी निबंध

सहलीला नाव नोंदविल्यानंतर आम्ही मधल्या सुट्टीत डब्बा खाताना, शाळा भरण्यापूर्वी आणि शाळा सुटल्यानंतर देखील केवळ आणि केवळ सहलीच्या बाबतीतच गप्पा मारत असायचो. कधी एकदाचा महिना लोटतोय आणि आम्ही सहलीला जातो असे आम्हाला झाले होते. दिवसा मागून दिवस पटापट जात होते. आणि आमच्या मनामध्ये सहली बद्दल अजूनच जिज्ञासा निर्माण होत होती.

आणि अखेर सहलीला अवघे दोनच दिवस उरले होते. आईने सहलीसाठी मला अनेक प्रकारचा खाऊ बनवून दिला होता. त्यामध्ये गुळ शेंगदाण्याचे लाडू, खजुराचे लाडू, चिवडा, शंकरपाळी इत्यादी होते. बाबांनी माझ्यासाठी नवीन स्वेटर आणि बॅग आणली होती. मी सर्वसामान बॅगेत भरून देखील काही राहिले तर नाही ना याची सारखीच चाचपणी करत होतो. मित्रांना फोन करून तू काय घेतले मी काही घेऊ असं सारखं विचारत होतो. आणि अखेर तो दिवस उजाडला. 

आम्ही सर्वजण सकाळीच लवकर शाळेत जमलो होतो. प्रत्येक जण एक वेगळ्याच आनंदात दिसत होता. माझे सर्व जवळचे मित्र आणि मी सोबतच असणार होतो, त्यामुळे आम्ही घोळका करूनच उभे होतो. सहल प्रमुख साबळे सर आणि श्री शिंदे सर यांनी सर्व विद्यार्थ्यांची हजेरी घेतली, आणि बस आल्या. आम्ही सर्वजण बसमध्ये बसलो आणि गणपती बाप्पा मोरया अशी जोरदार घोषणा देत आमची सहल निघाली. साधारणपणे दोन अडीच तासांचा प्रवास करून आम्ही मनमाड रेल्वे स्थानकावर पोहोचलो. तिथे गेल्यानंतर आमची रेल्वे एक वाजता आहे असे समजले. आमच्या हातात आणखी दोन तास होते, आम्ही सर्वांनी घरून आणलेला डबा खाल्ला, आणि सहलीचा आनंद इथपासूनच लुटायला सुरुवात केली. आम्ही स्टेशनवर मनसोक्त फेरफटका मारला, आणि साडेबारा वाजता सरांनी आम्हाला प्लॅटफॉर्मवर उभा राहण्यास सांगितले. रेल्वे आल्यानंतर आम्ही पटापट मिळेल त्या डब्यात चढलो. नंतर सरांनी आम्हा सर्वांना व्यवस्थित जागावाटप करून दिले. मस्त एकमेकांची खिल्ली उडवत, गाण्याच्या भेंड्या खेळत, रेल्वेतून इकडे तिकडे फिरत, आम्ही एन्जॉय करत होतो.

आणखी वाचा : माझी आई मराठी निबंध

साधारणपणे दोन दिवसानंतर आम्ही अंबाला केंट येथे उतरलो. तिथे सरांनी आधीच बुक केलेल्या बसेस आमचीच वाट बघत होत्या. सरांनी विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसाठी दोन वेगवेगळ्या बसेसचे आयोजन केले होते. आम्ही पटापट बसेस मध्ये बसलो आणि सरांनी आम्हाला हॉटेलवर नेले. तिथे आम्ही फ्रेश झालो आणि बॅगा हॉटेलवरच ठेवून आम्ही फिरायला निघालो. आम्ही अंबाला शहर फिरत फिरत संध्याकाळी येताना चौपाटीवर मनसोक्त खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला, आणि संध्याकाळी हॉटेलवर येऊन जेवण केले आणि झोपलो. दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा उठलो आणि आनंदमय सहलीचा आस्वाद घेण्यासाठी निघालो. दुसऱ्या दिवशी आम्ही आग्रा शहरात गेलो, तिथे सर्वप्रथम सकाळी आम्ही ताजमहल बघितला आणि दुपारी आग्रा चा किल्ला बघितला. दिवसभराच्या दंगमस्तीनंतर आम्ही हॉटेल वर आलो, आम्ही दर दिवसा-दोन दिवसाला हॉटेल बदलत होतो कारण आम्ही पुढील ठिकानांकडे आगेकूच करत होतो.

त्यानंतर पुढच्या दिवशी आम्ही दिल्ली शहर आणि दिल्लीमधील भारताचे संसद भवन बाहेरूनच पाहिले, त्यानंतर तेथिलच चोवीस तास ठेवत असणारी वीर जवानांची आठवण करून देणारी स्मारक ज्योत देखील पाहिली. पुढील काही दिवसात आम्ही अनेक ठिकाणांना भेटी दिल्या. पुढे जात जात आम्ही कुलु मनाली मध्ये पोहोचलो. मनाली मध्ये गेल्यानंतर आम्हाला अनेक डोंगरदऱ्यातून वाट काढत घाटातून प्रवास करावा लागला. आमच्या बस ड्रायव्हरने सहलीचा वेळ वाया जाऊ नये म्हणून हा प्रवास रात्रीचा केला आणि आम्हाला सकाळी मनाली मध्ये पोहोचविले.

मनालीत आम्ही रोपवे आणि बर्फाळ नदीमध्ये बोटिंग चा आनंद घेतला. तसेच तेथील गुरुद्वारामध्ये आम्ही नैसर्गिक गरम पाण्याच्या कुंडांमध्ये अंघोळी केल्या. आणि तेथेच महाप्रसादाचा देखील आस्वाद घेतला. येताना आम्ही भारताच्या अटारी वाघा बॉर्डरला देखील भेट दिली. आणि तिथून निघण्याच्या शेवटच्या दिवशी दुपारी अमृतसरला पोहोचलो. तेथील गुरुद्वारामध्ये दर्शन घेतल्यानंतर आम्ही तेथेच महाप्रसादाचा देखील आस्वाद घेतला. आणि तेथे शेवटचा मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी पहाटे आमची परतीची रेल्वे होती. अमृतसर स्टेशन वरून आम्ही परतीच्या प्रवासासाठी बसलो, आणि तब्बल दोन दिवसांच्या प्रवासानंतर अहमदनगरच्या स्टेशनवर उतरलो. तिथे आम्हाला घेण्यासाठी बसेस उभ्या होत्या. आम्ही बसमध्ये बसलो आणि घरी आलो. अशी ही माझी अविस्मरणीय सहल माझ्या नेहमीच लक्षात राहील.

आणखी वाचा : माझा आवडता ऋतू (पावसाळा) मराठी निबंध

 धन्यवाद…!

Previous

राजमाता जिजाऊ मराठी निबंध | Rajmata Jijau Essay in Marathi

हनुमान चालीसा । Hanuman Chalisa in Marathi

Next

Leave a Comment