शिमगा हा कोकणामध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जाणारा सण आहे.
फाल्गुन महिन्यामध्ये साजऱ्या केल्या जाणाऱ्या या सणाची रंगत काही न्यारीच!
ढोल ताशांचा नाद, गुलालाच्या उधळणीने न्हाऊन निघालेला आसमंत, नवस, गाऱ्हाणी, पालखी नृत्य अशा साऱ्या गोष्टींमुळे सारे वातावरण एकदम प्रसन्न असते.
असणारच! कारण या दिवसांमध्ये पालखीत बसून देवच आपल्या भक्तांच्या भेटीला येत असतो.
साक्षात देव भेटीला येतोय म्हटल्यावर उत्साह तर असणारच ना?
असं उत्साही वातावरण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जास्त पाहायला मिळतं कारण इतर ठिकाणांच्या तुलनेत रत्नागिरी जिल्ह्यामध्ये शिमगा हा सण अधिक उत्साहाने आणि मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो.
संकासुर, नमन, खेळे, गोमू याबद्दल तर विचारूच नका.
या गोष्टी शिमगा या सणाचं सौंदर्य अधिकच खुलवतात.
या गोष्टी नसतील तर शिमग्याचा खरा आनंद मिळणे कठीण आहे.
संकासुराचं लहान मुलांच्या पाठीमागे पळून त्यांना घाबरवणं, गोमूचं पारंपरिक लोकगीतांवर लयबद्ध ठेक्यात नृत्य करणं, खेळ्यांची मृदूंगावरील लयबद्ध थाप आणि नमनामधील पेंद्या, बॊबड्याचे अफलातून विनोद अशा कित्येक क्षणांना मनामध्ये साठवत कोकणी माणूस आपल्या आयुष्याच्या पुस्तकात आनंदाची आणि गोड आठवणींची पाने जोडत असतो.
असा हा शिमगा वेगवेगळ्या गावांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो.
रत्नागिरीतील श्रीदेव भैरीचा शिमगोत्सव हा रत्नागिरी जिल्ह्यातील शिमगोत्सवांपैकी एक मोठा शिमगोत्सव मानला जातो. (Shri Dev Bhairi Shimgotsav, Ratnagairi)
बारा वाड्यांचे ग्रामदैवत असलेल्या श्रीदेव भैरी बुवाच्या शिमगोत्सवाबद्दल थोडं जाणून घेऊया.
श्रीदेव भैरी मंदिराचा इतिहास (Shri Dev Bhairi Temple History)
प्रत्येक रत्नागिरीकराचं आराध्य दैवत मानलं जातं श्री देव भैरी.
समुद्रकिनाऱ्यापासून ते अगदी सड्यापर्यंत पसरलेल्या रत्नागिरी शहराचे ग्रामदैवत म्हणून श्रीदेव भैरीची पूजा केली जाते.
शंकराचं रूप असलेल्या श्रीदेव कालभैरवाचे हे मंदिर पुरातन हेमाडपंथी बांधणीचे आहे.
मंदिराच्या वैशिट्यपूर्ण बांधणीने आणि त्याच्या सभोवताली असलेल्या निसर्गरम्य परिसरामुळे हे मंदिर पाहताक्षणीच नजरेत भरते.
मंदिरावर असलेलं टुमदार कौलारू छप्पर मंदिराचं पुरातन पण टिकवून आहे.
या मंदिराला जवळपास ५०० वर्षांचा इतिहास लाभला आहे.
सन १७३१ मध्ये शिवाजी महाराजांच्या आरमारामध्ये महत्वाची भूमिका बजावणारे थोर आणि निष्ठावान दर्यावर्दी कान्होजी आंग्रे यांचे सुपुत्र सखोजी आंग्रे हे आरमारासह रत्नागिरी येथे आले होते.
त्यावेळी त्यांच्यासोबत पाच गुजर नामक कुटुंब होती.
यांनी शहरामध्ये ही मंदिरे उभारली.
सखोजी आंग्रे यांच्या हस्ते या मंदिराची स्थापना करण्यात आली.
या मंदिरामध्ये श्री देव भैरी, तृणबिंदूकेश्वर यांव्यतिरिक्त अन्य पाच मंदिरे आहेत.
मंदिरामध्ये प्रवेश करताच आपल्याला दुरूनच श्री देव भैरीचं दर्शन घडतं.
प्रथम तृणबिंदूकेश्वर आणि अन्य पाच मंदिरांचे दर्शन करून नंतरच श्री देव भैरीचं दर्शन घेण्याची प्रथा आहे.
भैरीच्या या मंदिरात सकाळपासून रात्री उशिरापर्यंत दर्शनासाठी रत्नागिरीकरांची गर्दी असते.
सकाळी कामधंद्याला बाहेर पडणारा प्रत्येक रत्नागिरीकर श्रीदेव भैरीचं दर्शन करूनच आपल्या दिवसाची सुरुवात करतो.
एखादा नवीन व्यवसाय सुरु करायचा असेल तर सगळ्यात आधी श्रीदेव भैरीचा आशीर्वाद घेतला जातो नंतरच व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली जाते.
श्रीदेव भैरीचं देवस्थान हे एक जागृत देवस्थान म्हणून ओळखलं जातं.
या मंदिरामध्ये कोणीही कधीही खोटं बोलत नाही. एखाद्या गोष्टीची सत्यता पटवण्यासाठी श्रीदेव भैरीची शपथ घेतली जाते.
इथल्या प्रत्येक गोष्टीचे मानपान वर्षानुवर्षे निश्चित आहेत.
श्रीदेव भैरी शिमगोत्सव रत्नागिरी
श्रीदेव भैरीच्या मंदिरामध्ये दरवर्षी विविध सण मोठ्या उत्साहात साजरे केले जातात.
परंतु या मंदिराला एक आगळेवेगळे स्वरूप प्राप्त होते ते शिमगोत्सवमध्ये.
शिमगोत्सवाच्या मुख्य कार्यक्रमाला फाल्गुन शुद्ध पौर्णिमेपासुन सुरुवात होते.
हा शिमगोत्सव रत्नागिरी जिल्ह्यातील मोठ्या शिमगोत्सवांपैकी एक मानला जातो.
हजारोंच्या संख्येने भाविक रत्नागिरी आणि रत्नागिरी बाहेरुन या शिमगोत्सवासाठी आवर्जून उपस्थित राहतात.
श्रीदेव भैरीच्या शिमगोत्सवातील विशेष लक्षणीय बाब म्हणजे पालखी भेटीचा सोहळा.
रत्नागिरी शहराच्या आजुबाजुच्या गावातील ग्रामदेवता वर्षातून एकदा पालखीत बसून वाजत गाजत भैरीच्या भेटीला येतात.
यावेळी मंदिरातच जवळच्या मिऱ्या गावातील पालख्यांची भेट होते.
दोन ग्रामदैवते एकमेकांना भेटतात हा अभूतपूर्व सोहळा आपल्या मनामध्ये साठवून ठेवण्यासाठी प्रत्येक रत्नागिरीकर हातातील सर्व कामे बाजूला ठेऊन श्रीदेव भैरीच्या मंदिरात गर्दी करतो.
जमलेल्या हजारो हातांनी या पालख्या उचलल्या जातात.
श्रीदेव भैरीच्या मंदिरात होणारी ही देवांची भेट उपस्थित असलेल्या प्रत्येकाला रोमांचित करते.
असा हा अभूतपूर्व सोहळा पाहण्यासाठी दूर दूर वरुन भाविक गर्दी करतात.
पालखी भेटीच्या या जल्लोषानंतर सर्व रत्नागिरीकरांना आतुरता असते ती श्रीदेव भैरीच्या दर्शनाची.
सर्व ग्रामस्थ मंदिराच्या आवारात जमा होतात आणि मंदिराचे गुरव गाऱ्हाणे घालतात.
यानंतर रात्री उशिरा ग्रामदैवत श्रीदेव भैरीची पालखी मंदिरातून बाहेर पडते आणि जमलेल्या हजारो हातांनी ती पालखी नाचवली जाते.
या पालखीला किमान एक हात लावून नतमस्तक होण्यासाठी प्रत्येकजण धडपडत असतो.
श्रीदेव भैरीचा हा शिमगोत्सव लोकांना सर्वधर्म समभाव आणि ऐक्याची शिकवण देतो.
बारा वाडयांतील बावीस जातिजमातींचे भाविक एकत्र येवून हा उत्सव साजरा करतात. अगदी आनंदाने!
यातील विशेष महत्त्वाची बाब म्हणजे रत्नागिरी शहरातील मुस्लिम बांधवही या उत्सवामध्ये सहभागी होतात.
इतकेच नाही तर श्रीदेव भैरीच्या शिमगोत्सवामध्ये मुस्लिम बांधवांचा विशेष मान आहे.
जवळपास पाचशे वर्षांपासून त्यांचा हा मान जपला जातो.
होळीच्या शेंडयाचा मान, बुंध्याचा मान असे प्रत्येक गोष्टीचे मान परंपरागत निश्चित झालेले आहेत.
फाल्गुन शुद्ध पंचमीच्या दुसऱ्या दिवशी सुरमाडाची होळी तोडली जाते.
आपले मान-पान, पदे, जाती-धर्म सर्व काही विसरून रत्नागिरीकर ही होळी आपल्या खांद्यावर उचलून तिच्या पारंपरिक स्थानावर घेऊन येतात.
सर्व रत्नागिरीकर जाती धर्माचा कोणताही अडसर न ठेवता एकत्र येवून आनंदाने आणि मोठ्या जल्लोषात होळी उभी करतात.
होळी उभी केल्यानंतर त्या ठिकाणी मानाचे विडे काढले जातात.
बारा वाडयातील बावीस मानकऱ्यांच्या नारळ आणि विडा देवून सन्मान केला जातो.
कितीही मोठे आव्हान असले तरी एकत्र आल्यास काहीही अशक्य नाही ही शिकवणच जणू या शिमगोत्सवानिमित्त ग्रामदेवता आपल्याला देत असते.
रत्नागिरीतील या अभूतपूर्व सोहळ्याचा अनुभव प्रत्येकाने एकदा तरी घ्यावा.