शिमगोत्सव । कोकणातील खेळे, नमन, पालखी आणि होळी

| |

“हाय रे हाय आणि … च्या जीवात काय नाय रे… होलियो!” संचारला ना अंगात उत्साह?

हे शब्द कानावर पडले की कोकणी माणसाच्या अंगात काही वेगळंच बळ संचारतं.

ढोल ताशांचे आवाज कानात घुमू लागतात.

डोळ्यांसमोर गुलालाच्या गुलाबी रंगात न्हावून गेलेला आसमंत दिसू लागतो.

आपले देव साक्षात आपल्या दारी येतायत ही भावना मनामध्ये एका विलक्षण ऊर्जेची निर्मिती करते.

देवाला घातलेल्या गाऱ्हाण्यांचे स्वर कानी रेंगाळू लागतात.

संकासुर, खेळे, गोमू, दशावतार, नमन आणि मृदूंगावर पडणारी लयबद्ध थाप सगळं काही क्षणात डोळ्यासमोर थैमान घालू लागतं.

Shimgotsavatil Sankasur, शिमगोत्सवातील संकासुरPin
शिमगोत्सवातील संकासुर

होळीला मारल्या जाणाऱ्या बोंबांचा थाट काही वेगळाच!

खरंच शिमगा म्हटलं एका उत्साहपूर्ण वातावरणाची, एका नव्या जल्लोषाची पाने प्रत्येक कोकणी माणसाच्या आयुष्याला जोडली जातात.

अशा अनेक अविस्मरणीय आठवणी प्रत्येक जण साठवून ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. 

तुम्ही म्हणाल फक्त कोकणी माणसाचाच उल्लेख का?

बरोबर आहे, कारण या उत्सवासाठी कोकणी माणूस जेवढा उत्साही असतो तेवढा क्वचितच दुसरा कोणी असेल. 

गणपती आणि शिमगा हे दोन सण कोकणी माणसाच्या आयुष्यातील हवेहवेसे वाटणारे सण आहेत. 

या सणांमध्ये कामधंद्यानिमित्त बाहेरगावी गेलेले चाकरमानी आवर्जून गावची वाट धरतात.

एक वेळ चार पैसे कमी भेटले तरी चालतील पण शिमग्याला गावी नक्की जायचं असं काहीसं असतं त्यांचं. असणारच कारण शिमगा म्हटलं की जे नवचैतन्य वातावरणात भरलेलं असतं त्याची ओढ प्रत्येक कोकणी माणसाला असते.  

तसं पहायला गेलं तर हा सण देशाच्या विविध भागात होळी म्हणून साजरा केला जातो.

देशभर एकच दिवस साजरा केल्या जाणाऱ्या या सणात होलिका दहन करून रंग उधळले जातात, एकमेकांना रंग लावले जातात.

परंतु कोकणात मात्र या सणाचा काही वेगळाच थाट आहे.

शेतीची कामे संपलेली असतात आणि पेरणीची कामे सुरु होण्यासाठी अजून बराच अवधी बाकी असतो.

बळीराजाला शेतीच्या कामांमधून थोडीशी विश्रांती मिळालेली असते. या पार्श्वभूमीवर सर्व थकवा दूर करून नवीन उत्साह भरण्याचे काम हा सण करतो. 

प्रथेप्रमाणे फाल्गुन शुद्ध पौर्णिमेला होळीचा मुख्य सण असतो.

विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यामध्ये हा सण मोठ्या थाटात उत्साहाने केला जातो.

हा उत्सव म्हणजे ग्रामदेवतांच्या उत्सव असतो.

पाच ते पंधरा दिवस चालणाऱ्या या सणाची सुरुवात होळीच्या मुख्य सणाच्या काही दिवस अगोदर होते.

सुरुवातीला देवाची रूपे रूपे लावली जातात. रूपे लागल्यानंतरच पालख्या गावोगावी नेण्यास परवानगी असते. पालखी हे या शिमगोत्सवात प्रमुख आकर्षण असते.

Palakhi Rupe Gramdevateche Mukhavate, पालखी रूपे ग्रामदेवतेचे मुखवटे  Pin
पालखी रूपे ग्रामदेवतेचे मुखवटे

पालखीत बसून आपले देव आपल्या दारी येतात अशी प्रत्येक कोकणवासीयांची श्रद्धा आहे.

काही गावांमध्ये वेगवेगळ्या गावांच्या पालख्या एकमेकांना भेटण्यासाठी एकत्र येतात.

दोन ग्रामदेवतांच्या भेटीचा हा अभूतपूर्व सोहळा ‘याचि देही याचि डोळा’ पाहण्यासाठी भाविक हजारोंच्या संख्येने उपस्थित राहतात. 

खेळे आणि गोमू (Kokanatil Khele Naman)

Shimagotsavatil Khele Aani Gomu, शिमगोत्सवात खेळे आणि गोमूPin
शिमगोत्सवात खेळे आणि गोमू

प्रत्येक गावांत वेगवेगळ्या प्रथेप्रमाणे हा सण साजरा केला जातो.

काही गावांमध्ये देवाची रूपे लागल्यानंतर गावातील मुख्य देवस्थानापाशी सर्व मंडळी जमा होतात.

काही ठिकाणी मुख्य देवस्थानाला मांड असे संबोधले जाते.

गावातील पुरुषमंडळी एकत्र येऊन वेगवेगळ्या आजूबाजूच्या गावांमध्ये जाऊन प्रत्येकाच्या घरी पारंपरिक नृत्य सादर करतात. त्यांना खेळे असे म्हणतात.

मुख्य देवस्थानावर म्हणजेच मांडावर देवाला गाऱ्हाणे घालून नंतरच खेळे गावाबाहेर पडण्याची प्रथा आहे.

गाऱ्हाणे घालण्याचा मान हा त्या गावचा गावकार किंवा मानकरी व्यक्तीला असतो.

खेळ्यांमध्ये  संकासुर, कोळीण आणि थेर अशी पात्र समोर नृत्य करतात तर बाकीची मंडळी त्यांच्या मागे उभे राहून पारंपरिक गाण्यांवर ठेका धरतात.

संकासुर, कोळीण आणि थेर यांची एक विशिष्ट वेशभूषा असते. तर मागे ठेका धरणाऱ्या मंडळींचीही वेगळी वेशभूषा असते.

यातील दुसरा प्रकार असतो तो म्हणजे गोमू. यामध्ये एका पुरुषाला स्त्रीची वेशभूषा केली जाते.

हा स्त्रीपात्र भूषवणारा पुरुष समोर नृत्य करतो तर बाकीची मंडळी त्याला मागे उभे राहून पारंपरिक लोकगीतांवर साथ देतात.

गोमूचा नाच पाहण्यासाठी अबालवृद्ध खूप उत्साहाने गर्दी करतात. 

नमन/दशावतार (Kokanatil Naman/Dashavatar)

Shimagotsav Konkanatil Naman, शिमगोत्सव कोकणातील नमनPin
शिमगोत्सव कोकणातील नमन

कोकणातील शिमग्याचे प्रमुख आकर्षण असते ते म्हणजे नमन किंवा दशावतार.

गावातील मंडळी एकत्र येऊन नाटक वजा कार्यक्रम सादर करतात, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये त्याला नमन तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये त्याला दशावतार म्हणतात.

यामध्ये वेगवेगळे देवी देवता, नारदमुनी, इंद्र देव, शंकर, श्रीकृष्ण आणि त्यांचे सवंगडी यांसारखी पौराणिक पात्रे मंचावर साकारली जातात.

यातील विशेष बाब म्हणजे श्रीकृष्णांच्या बाललीलांचे सादरीकरण करताना गवळणींची पात्रे ही साकारली जातात.

गवळणींची ही स्त्री पात्रे पुरुषच साकारतात आणि आपल्या अभिनयाने त्या पात्रांना न्याय देण्याचा प्रयत्न करतात.

श्रीकृष्णाचे सवंगडी पेंद्या, सुदामा आणि बोबड्या कॉमेडी पात्रे दाखवण्यात येतात. आपल्या निखळ विनोदाने आणि विनोदी अभिनयाने ते प्रेक्षकांना खळखळून हसवतात.

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये नमनाच्या सुरुवातीला श्रीकृष्णांच्या बाललीला, पेंद्या बॊबड्याची अफलातून कॉमेडी आणि कंस वध हे सादर करण्याची प्रथा आहे.

त्यानंतर पुराणातील एखाद्या कथेचं सादरीकरण करण्यात येते. त्याला वग असे म्हणतात.

हा वग साधारणपणे वाईटावर चांगल्याच विजय या संकल्पनेवर आधारित असतो.

Dashavtar Patre, दशावतार पात्रेPin
दशावतार पात्रे

या कार्यक्रमातील नृत्य, गाणी यामध्ये एक वेगळीच मजा असते.

साधारणपणे पाच ते पंधरा दिवस चालणाऱ्या शिमगोत्सवामध्ये हे कार्यक्रम होतच असतात.

वेगवेगळ्या गावातील मंडळी वेगवेगळ्या पद्धतीने नमन सादर करतात.

या नमनाची उत्सुकता लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच लागलेली असते. 

पालखी सोहळा 

Palakhi Nrutya, पालखी नृत्यPin
पालखी नृत्य

देवाची रूपे लागल्यानंतर पालखी बाहेर काढली जाते.

काही गावांमध्ये होळी झाल्यानंतर पालखी गावोगावी फिरते.

यावेळी ग्रामदेवतेचे मुखवटे पालखीमध्ये स्थापन केले जातात.

पालखीला छान अशी आरास करून गावातील प्रत्येकाच्या घरी फिरवली जाते.

ज्यादिवशी पालखी येणार आहे त्या दिवशी अंगणामध्ये सडा सारवण घालून ग्रामदेवतेच्या आगमनाची तयारी केली जाते.

सुहासिनी ग्रामदेवतेची ओटी भरतात. नवस बोलले जातात. कुटुंबाच्या सुखसमाधानासाठी गाऱ्हाणी घातली जातात.

यादिवशी घरामध्ये गोडधोड पदार्थ केले जातात.

पालखी सोहळ्यातील सर्वांत अभूतपूर्व क्षण म्हणजे पालखी नृत्य.

गावकरी मंडळी ढोल ताशाच्या गजरात आपल्या ग्रामदेवतेच्या पालखीला खांद्यावर घेऊन नाचवतात.

ढोल ताशांच्या तालावर वेगवेगळ्या पद्धतीने पालखी नाचवण्याची मजा काही वेगळीच असते.

Dhol Tashancha Gajar, ढोल ताशांचा गजरPin
ढोल ताशांचा गजर

आपल्या ग्रामदेवतेची पालखी किमान एकदातरी नाचवावी असे प्रत्येक कोकणवासियाचे स्वप्न असते.

काही ठिकाणी पालखी नृत्याच्या स्पर्धा घेतल्या जातात.

होळी 

Bhavik Holi Nachavtana, भाविक होळी नाचवतानाPin
भाविक होळी नाचवताना

फाल्गुन शुद्ध पौर्णिमेला होळी साजरी केली जाते.

या दिवशी होम पेटवला जातो.

आंब्याच्या झाडाची किंवा सुरमाडाची होळी केली जाते.

साधारणपणे २० ते २५ फूट लांब आणि ५०० ते ६०० किलो वजन असणाऱ्या या होळीला गावकरी आपल्या हाताने उचलून सहाणेपर्यंत आणतात.

सहाण म्हणजे होळी उभी करण्याची जागा.

सहाणेपर्यंत आणताना ही होळी हातांवर खेळवली जाते.

यामध्ये शेंड्याची मानकरी आणि बुंध्याचे मानकरी ठरलेले असतात.

बाकीची मंडळीही होळी खेळवण्यास मदत करू शकते.

यावेळी गुलाल उधळत असतानाच बोंबा मारल्या जातात.

“हाय रे हाय आणि … च्या जीवात काय नाय रे… होलियो!” अशाप्रकारच्या अलंकारिक भाषेत एकमेकांविरुद्ध या बोंबा मारल्या जातात.

Shimagotsavail Holi Ubhi Karatana Bhavik, शिमगोत्सवातील होळी उभी करताना भाविकPin
शिमगोत्सवातील होळी उभी करताना भाविक

परंतु याबद्दल कोणीही वाईट वाटून घेत नाही.

खेळीमेळीच्या वातावरणात हा सण साजरा केला जातो. सहाणेवर होळी उभी केल्यानंतर होम पेटवला जातो.

त्यानंतर होळीभोवती पालखी फिरवली जाते. 

होळी साजरी झाल्यानंतर आणि पालखी प्रत्येकाच्या घरी येऊन गेल्यानंतर गावातील सर्व पुरुषमंडळी पुन्हा मुख्य देवस्थानापाशी म्हणजेच मांडावर जमा होतात. 

येथे देवाला गाऱ्हाणे घालून या सणाची सांगता होते. 

Previous

सख्या रे!

रत्नागिरीतील श्रीदेव भैरीचा शिमगोत्सव

Next

Leave a Comment