पोलार्डचा झंझावात, टाकले एका षटकात सहा षटकार…

| | ,

पोलार्डचे सहा चेंडूंमध्ये सहा षटकार (Pollard Hits Six Sixes in an Over)

वेस्ट इंडिज आणि श्रीलंका यांच्यात सुरु असलेल्या टी-२० मालिकेतील पहिल्या सामन्यात अविस्मरणीय घटना पाहायला मिळाल्या.

या सामन्यात श्रीलंकेच्या अकिला धनंजयने तीन चेंडूंमध्ये तीन बळी मिळवत हॅटट्रिक लावली तर वेस्ट इंडिजचा धडाकेबाज फलंदाज किरॉन पोलार्ड याने धनंजयच्याच एका षटकात सहा चेंडूंवर सहा षटकार खेचत इतिहास रचला आहे. (Pollard Hits Six Sixes in an Over)

एकाच सामन्यात घडलेल्या या दोन घटनांनी क्रिकेटप्रेमींसाठी हा सामना अविस्मरणीय बनवला.

३ मार्च २०२१ रोजी अँटिग्वा येथे खेळल्या गेलेल्या वेस्ट इंडिज आणि श्रीलंका यांतील टी-२० मालिकेतील पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.

श्रीलंकेच्या निरोशन डिक्वेला ३३ (२९) आणि पाथुन निसंका ३९ (३४) यांच्या खेळीच्या जोरावर निर्धारित २० षटकांमध्ये ९ गडी बाद १३१ धावांपर्यंत मजल मारली.

या दोघांव्यतिरिक्त श्रीलंकेच्या इतर फलंदाजांना समाधानकारक कामगिरी करण्यात यश आले नाही.

दरम्यान १३१ धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या वेस्ट इंडिज संघाची सुरुवात धमाकेदार झाली.

सलामीवीर लेंडल सिमन्स आणि इविन लुईस यांनी सुरुवातीपासूनच चौकार, षटकारांचा पाऊस पाडण्यास सुरुवात केली.

सिमन्सनें ३ चौकार आणि २ षटकारांसह १५ चेंडूत २६ धाव केल्या तर लुईस ने २ चौकार आणि ३ षटकारांसह १० चेंडूत २८ धाव केल्या.

दोघांनी मिळून ३ षटकांतच ५० धावा धावफलकावर लावल्या.

यानंतर चवथ्या षटकात गोलंदाजी करण्यासाठी आलेल्या अकिला धनंजयने आपल्या षटकातील दुसऱ्या, तिसऱ्या आणि चवथ्या चेंडूवर अनुक्रमे लुईस, ख्रिस गेल ० (१) आणि निकोलस पुरन ० (१) याना बाद करत हॅटट्रिक साधली.

परंतु या हॅटट्रिकचा आनंद तो फार काळ घेऊ शकला नाही.

त्याच्या पुढच्याच षटकात फलंदाजीसाठी आलेल्या किरॉन पोलार्डने सहा चेंडूंमध्ये सहा षटकार खेचत आपल्या वादळी खेळीने धनंजयच्या आनंदावर पाणी फेरले.

धनंजयने आपल्या ४ षटकांमध्ये ६२ धावा देत ३ गडी बाद केले.

पोलार्डने ११ चेंडूंमध्ये ३८ धावांची वादळी खेळी केली.

टी -२० मध्ये एकाच षटकात सहा षटकार मारणारा पोलार्ड युवराजसिंह नंतर दुसरा खेळाडू बनला आहे.

या आधी युवराज सिंहने २००७ साली झालेल्या टी -२० विश्वचषक मालिकेत इंग्लड विरुद्ध खेळताना इंग्लंडचा जलदगती गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड याला एकाच षटकात सहा षटकार लगावले होते.

१३१ धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या वेस्ट इंडिज संघाने अवघ्या ७ षटकांमध्येच १०० धावा धावफलकावर लावल्या होत्या.

या मालिकेतील पुढचे सामने अनुक्रमे ६ मार्च आणि ८ मार्च रोजी होणार आहेत.

Previous

पॅनासॉनिक लुमिक्स जी १०० कॅमेरा

व्हॅक्सिनेशन साठी आता रजिस्टर करा आरोग्य सेतू ॲप वरून

Next

Leave a Comment