शेतकऱ्याचे मनोगत मराठी निबंध । Shetkaryache Manogat Marathi Nibandh

| |

मित्रांनो, आजच्या लेखामध्ये आपण शेतकऱ्याचे मनोगत मराठी निबंध (Shetkaryache Manogat Marathi Nibandh) या विषयावर १० ओळी ३०० शब्द ५०० शब्द आणि १००० शब्दांमध्ये निबंध बघणार आहोत.

मित्रांनो, शेतकऱ्याचा आवाज सहसा कुणाच्याही कानी पडत नाही, मात्र शेतकऱ्याला देखील खूप काही बोलायचे असते. (Shetkaryache Manogat  Essay in Marathi) या निबंधाच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या बोलण्याला वाट मोकळी करून देण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. शाळेमध्ये देखील अशा आशयाचे निबंध लिहून आणण्यास सांगितले जातात. त्यासाठी विद्यार्थी आणि शिक्षक बंधूंना देखील हा लेख उपयोगी पडेल.

दहा ओळींमध्ये शेतकऱ्याचे मनोगत मराठी निबंध (10 lines Shetkaryache Manogat Marathi Nibandh)

१. माझे नाव रभाजी, मी एक शेतकरी आहे.

२. मी सकाळी लवकर उठतो, पटपट आवरतो व बैलांना गाडीस जुंपून शेतावर जातो.

३. सकाळी उन्हे डोक्यावर येण्याआधीच मी शेतातली कामे भराभर उरकतो.

४. माझी कारभारीन मला न्याहारीसाठी तिच्या हाताचे सुग्रास पदार्थ घेऊन येते.

५. न्याहारी करून मी शेतातली इतर हलकी कामे करतो.

६. दुपारी पुन्हा कारभारणीने आणलेलं जेवण करून मी तिथेच झाडाखाली जरावेळ पहुडतो.

७. त्यानंतर मी आणि कारभारीन शेतातली उरलेली कामे करतो आणि जनावरांसाठी चारा सुद्धा काढतो.

८. शेतातली सर्व कामे आटोपली की आम्ही बैलगाडीत चारा भरतो, आणि घरी येतो.

९. दिवसभर शेतात कष्ट केल्याने संध्याकाळी घरी आल्यावर अगदी प्रसन्न वाटते.

१०. मला माझी शेती आणि शेतीतले काम मनापासून आवडते.

धन्यवाद…

तीनशे शब्दांमध्ये शेतकऱ्याचे मनोगत मराठी निबंध (Shetkaryache Manogat  Essay in Marathi in 300 Words)

नमस्कार, मी गेनबा अर्थातच ज्ञानेश्वर उत्तम पठारे. मी नारळवाडी ला राहतो. इथं मला चार-पाच एकर चांगली बागायती शेती आहे. त्या शेतात मी एकरभर संत्र्याची बाग लावलेली आहे. तसेच दरवर्षी एकर दोन एकर ऊस असतोच. एखादा एकरभर चारा आणि उरलेल्या शेतात आलटून पालटून मी भुसार पिके घेत असतो. आज मी माझे आत्मवृत्त तुमच्यासमोर मांडणार आहे.

मित्रांनो, सगळ्यात आधी मी तुम्हाला माझ्या कुटुंबाबद्दलची माहिती देतो. आमच्या कुटुंबात माझे आई वडील, पत्नी, आणि एक मुलगा आहे. मुलगा उच्च शिक्षणासाठी परगावी राहतो, त्यामुळे गावी आमचे फक्त चौकोनी कुटुंब राहते. दररोज सकाळी उठायचं, जनावरांचा चारापाणी करायचा, धारा काढायच्या, आणि शेतातल्या कामासाठी निघायचं. शेतातून संध्याकाळी आलं की पुन्हा जनावरांचा चारापाणी करून धारा काढल्या की मग मात्र मी जरासा निवांत होतो. संध्याकाळचे दोन घास पोटात ढकलले की सुखाने आडवा होतो. एकंदरीत खाऊन पिऊन सुखी असे हे आमचे कुटुंब. दैनंदिन गरजा भागवून मुलाच्या शिक्षणासाठी पैसा पुरवण्याइतपत माझे उत्पन्न येते. 

यंदाच्या साली मात्र निसर्ग राजा माझ्यावर कोपल्यासारखा झालेला आहे. अख्खा जून महिना गेला तरी देखील पावसाचा टिपूसही पडला नाही. दरवर्षीप्रमाणे जूनच्या पहिल्या आठवड्यात दिमाखात केलेल्या पेरण्या वाया गेल्या, त्यामुळे दुबार पेरणी करण्याचे संकट आम्हा शेतकऱ्यांवर ओढवले आहे. पहिल्या पेरणीतच राखून ठेवलेला पैसा संपल्यामुळे दुसऱ्या पेरणीसाठीचे खते बियाणे उधारीवर घ्यावे लागले आहेत. जुलै च्या अर्ध्यापर्यंत कमरेला भिडणारा कापूस यंदा मात्र गुडघ्याच्याही वर निघाला नाही, अशा या खुजा झाडांना कापूस लागणार तरी किती,  या विचाराने मन हैराण होते. चांगले उत्पन्न मिळाले नाही तर उधारीवर घेतलेल्या खत बियाणे बिलाचे पैसे कसे चुकते करायचे या प्रश्नामुळे मनात नाना विचारांचे थैमान सुरू असते. त्यातच मुलाच्या शिक्षणाचे अंतिम वर्ष असल्यामुळे त्याला देखील शिक्षणासाठी जास्तीचा पैसा खर्च होत आहे. गेल्या चार वर्षाची मेहनत पैशाच्या कमतरतेमुळे वाया जाऊ नये म्हणून मी देवाकडे धावा करत राहतो.

शेतीला माय माऊली मानणारा आमचा शेतकरी धर्म निसर्गाच्या प्रकोपामुळे आणि शेतीमालाला मिळणाऱ्या कमी भावामुळे मात्र त्रस्त होतो, आणि शेतीलाच कंटाळल्यासारखा होतो. देव सर्व शेतकऱ्यांच्या पदरात चांगले दान टाको, आणि शेतीला भरभराटीचे दिन मिळो अशीच सकल शेतकरी वर्ग प्रार्थना करत आहोत.

 धन्यवाद…

पाचशे शब्दांमध्ये शेतकऱ्याचे मनोगत मराठी निबंध (Shetkaryache Manogat Essay in Marathi in 500 Words)

नमस्कार मित्रांनो, माझे नाव यशवंत त्रंबक सोनवणे. माझ्या अवतारावरून तुम्ही ओळखलंच असेल की मी एक शेतकरी आहे. मी विदर्भातील एका छोट्याशा खेडेगावात राहत असून दुष्काळी शेती आणि माझे फार जुने नाते आहे. आमच्या या दुष्काळी शेतीला पावसाची ओढ असते, मात्र माझ्या गावातील या काळ्या आईवर पाऊस नेहमीच अन्याय करत आलेला आहे. पाऊस आणि विदर्भ यांचा जणू ३६ चा आकडा आहे असे काही लोक गमतीने म्हणतात, आणि काही अंशी ते खरे देखील आहे.

माझ्या कुटुंबाबद्दल सांगायचे झाल्यास आमच्या कुटुंबात मी, माझी पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी तसेच आई वडील राहतात. मी आणि पत्नी दिवसभर शेतात कष्ट करत असतो. आई वडील घर सांभाळतात, तर दोन्हीही मुले शाळेमध्ये जातात.

विदर्भातला शेतकरी म्हटलं की कसा अगदी कणखर आणि अस्मानी संकटांना तेवढ्याच निडरपणे तोंड देणारा अशी आमची ओळख आता निर्माण झालेली आहे  कधी कधी पाऊस अगदीच कमी पडतो अशात देखील आम्ही कसेबसे पीक उगवून आणतो, मात्र नियतीला कधी कधी हे देखील मान्य होत नाही आणि हाता तोंडाशी आलेला घास अतिवृष्टी हिरावून नेते. तरी देखील आम्ही हार मानत नाही, आणि पुन्हा नव्या जोमाने आणि नव्या उमेदीने आम्ही सज्ज होतो. आणि नवनवीन पिक लावून पुन्हा या धरणी मातेची अविरत सेवा करत राहतो.

अस्मानी संकटांशी झुंजायचं म्हटलं की प्रतिकूल परिस्थितीत तग धरून राहणं शिकलं पाहिजे, अगदी निसर्गातल्या प्राणी, पक्षी आणि झाडांसारखं. आता आम्ही देखील केशर आंबा, चिंच आणि बोरे तसेच सोबतीने नारळ इत्यादीच्या झाडांची लागवड केलेली आहे. परिणामी शेतातल्या इतर पिकांनी साथ दिली जरी नाही तरी देखील किमान झालेला खर्च भागवून काढण्याची शक्ती आम्हाला या फळझाडांमधून मिळते.आम्ही धरणी मातेची सेवा करण्यासाठी कधीच मागे पुढे पाहत नाही, आणि ही धरणी माता देखील आम्हाला कधी उपाशी झोपू देत नाही.

मित्रांनो, आम्ही आणि इतरही शेतकरी ज्यावेळी काळ्या आईची सेवा करतात तेव्हाच उभं जग दोन वेळचे अन्न सुखाने खाऊ शकते. त्यामुळे आपण सर्वांनी या धरणी मातेचे उपकार नेहमीच मानले पाहिजे. आम्ही दरवर्षी प्रत्येक पीक लावणी पूर्वी धरणी मातेला नमन करून तिची पूजा करतो, आणि मगच तिच्यामध्ये बीज रोपण करतो. आमच्या या सेवेने तृप्त झालेली ही काळी आई आनंदून आम्हाला उत्पन्नाच्या रूपात आशीर्वादच देत असते.

मित्रांनो, शेतकऱ्याचे जीवन हे जवळून बघितल्यास अतिशय खडतर असते. ऊन, वारा, पाऊस कशाचीही तमा न बाळगता शेतकऱ्याला वर्षाचे ३६५ दिवस शेतामध्ये अविरत कष्ट घ्यावे लागतात. ‘शेतकऱ्याच्या पोटी जन्म घेणं म्हणजे जणू कष्ट पाचवीला पूजणं’ असंच म्हणावं लागेल. आम्हाला पदोपदी विविध संकटांचा सामना करावा लागतो, अगदी लावणीपासून काढणीपर्यंत. प्रत्येक टप्प्याला आम्हाला काळजी ना सामोरे जावे लागते. पीक लावले तर उगवेल का, उगवले तर त्यासाठी पाऊस पडेल का, रोग किडी तर पडणार नाहीत ना, या आणि अश्या नाना प्रश्नांनी जीव अगदी भंडावून जातो. त्यातही शेतीमालाला कधीच चांगला भाव मिळत नाही. सरकार देखील कमी भाव असताना कधीच उपाययोजना करताना दिसत नाही, मात्र कांदा टोमॅटोचे थोडेसे भाव वाढले की लगेच आयात धोरण राबवून भाव कमी करण्यासाठी हालचाली सुरू होतात. 

शेतकरी कधीच अव्वाच्या सव्वा भाव मागत नाही, मात्र उत्पादन खर्च सुटून दोन रुपये पदरात पडावेत हीच सर्व शेतकऱ्यांची माफक अपेक्षा असते. आणि या अपेक्षेला फळ यावे हीच आम्हा सर्व शेतकऱ्यांकडून प्रार्थना. 

धन्यवाद…

एक हजार शब्दांमध्ये शेतकऱ्यांचे मनोगत मराठी निबंध (Shetkaryache Manogat Marathi Nibandh in 1000 Words)

नमस्कार, मी पिराजी नारवाडी गावचा एक साधा शेतकरी. मी अगदी लहान असल्यापासून शेती करतो. आज मी तुम्हाला माझं आत्मकथन सांगणार आहे.

अगदी लहान वयापासूनच शेतीला अगदी जवळून बघितलेले असल्यामुळे मला शेती माझ्या सर्वात जवळची वाटते. आज माझं 42 वय झालेलं असूनही मी दररोज नित्यनियमाने पहाटे पाच वाजता उठतो. शेतीनेच मला ही सवय लावली असे म्हटले तरी वावगे ठरायला नको.

मित्रांनो, आजकाल मुलं थोडीशी शिकली की शेती करायला नको म्हणतात, आमच्या काळात बारावीचे शिक्षण खूप मानले जाई. अशा काळात मी माझे बी ए चे शिक्षण पूर्ण केलेले आहे, आणि तरीदेखील मी त्या काळात शेतीमध्ये उतरण्याचे ठरविले. त्याचे मुख्य कारण म्हणजे लहानपणापासून असणारी शेती विषयीची आवड आणि प्रेम होय.

माझ्याकडे आज तारखेला वडिलोपार्जित आठ एकर आणि स्वतः घेतलेली पाच एकर अशी एकूण 13 एकर जमीन आहे. माझ्या आधी वडील आमची शेती करत असत. जी पारंपारिक पद्धतीवर अवलंबून असे. मात्र जेव्हापासून मी शेती स्वतःच्या ताब्यात घेतली आहे तेव्हापासून मी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करत शेतीतून चांगले उत्पन्न घेण्याचा प्रयत्न करत आहे. आणि याच शेतीच्या जीवावर मी आठ एकर जमिनीची 13 एकर जमीन केलेली आहे. आज माझ्या शेतात बऱ्याच गोष्टी मी ऑटोमॅटिक पद्धतीच्या केलेल्या आहेत. तसेच ठिबक सिंचन तुषार सिंचन यांसारख्या आधुनिक सिंचन प्रणालींद्वारे मी कमी पाण्यात जोमदार पिके घेण्याचा प्रयत्न करत असतो. शेती बरोबरच मी पशुधन देखील सांभाळतो, आज माझ्याकडे उत्तम प्रतीचा गायांचा एक गोठा आहे. त्यातून मी दररोज सुमारे 70 ते 80 लिटर दूध विकतो. यातून मला चांगलाच नफा मिळतो. सोबतच माझ्या शेतीसाठी मला शेणखतही उपलब्ध होते. तसेच घरी गाया असल्यामुळे एक वेगळे चैतन्यमय वातावरण निर्माण होते.

मित्रांनो माझा दिवसभराचा दिनक्रम अगदीच साधा आहे. मी सकाळी पाच वाजता उठून सर्वात आधी गोठ्यात जातो. सर्व गायांचे व्यवस्थित निरीक्षण केल्यानंतर मी त्यांना चारा खायला टाकतो. जनावरांचा चारा खाऊन होईपर्यंत मी सकाळची विधी उरकून घेतो. त्यानंतर आमचा नोकर गोटू याच्या मदतीने गायांना दुसऱ्या ठिकाणी बांधतो, आणि गोटू च्या साह्यानेच गाईचे दूध काढतो. हे सर्व दूध कॅन मध्ये भरून ठेवतो त्यानंतर गोटूला गायांची आणि गोठ्याची साफसफाई करायला सांगतो. तोपर्यंत मी गायांसाठी खुराक तयार करतो. तोपर्यंत गोठ्याची साफसफाई झालेली असते. सर्व गायांना खुराक देऊन गोटू आणि मी त्यांस चारा टाकतो. चारा खाऊन गाया मस्त दिवसभर आरामात बसत असतात. मग मी आंघोळ करून डेअरी वर दूध टाकायला जातो.

तेथून आल्यानंतर मी मस्त जेवण करतो आणि जेवता जेवताच मनात दिवसभराच्या कामाची आखणी करत असतो. त्यानंतर मी आणि नोकर गोटू शेतात जाण्यासाठी निघतो. गोटूला दिवसभर करावयाची कामे समजावून मी प्रत्येक पिकाकडे चक्कर मारतो. प्रत्येक पिकाला काय हवे नको ते बघतो, कोणत्या पिकासाठी काय केले पाहिजे, कुठला फवारा घेतला पाहिजे, खुरपणी करण्याची गरज आहे का, पाणी देण्याची गरज आहे का, ह्या सगळ्या गोष्टी तपासून बघतो आणि त्यानुसार पुढच्या कामाची आखणी करतो. त्यानंतर शेतीवरील विविध यंत्रे आणि अवजारे यांची देखील तपासणी करतो. त्यांना कुठल्या देखभालीची गरज आहे का याची चाचपणी केल्यानंतर मी जरा वेळ झाडाच्या सावलीत बसतो.

शेतात खुरपणी, माती लावणे, किंवा काढणी – तोडणी यासारख्या कामासाठी मजुरांची टोळी असेल तर त्यांच्याकडे चक्कर मारतो. त्यांना काही अडचण आहे का याबाबत खात्री करून घेतो. तसेच त्यांचे कामे व्यवस्थित चालले आहे का याबद्दल माहिती घेतो. त्यानंतर घरी जाऊन जेवण करतो तसेच गोटू साठी चा डब्बा घेऊन पुन्हा शेतावर येतो. त्याला डब्बा दिल्यानंतर बाहेरील कामे जसे की खते औषधी आणणे, शेतमाल विक्रीसाठी घेऊन जाणे, शेतमाल विक्रीच्या पेमेंट गोळा करणे इत्यादी कामे असतील तर ते करण्यासाठी बाहेर जातो. बाहेरील कामे उरकून आल्यानंतर एकतर ट्रॅक्टर किंवा बैलगाडी घेऊन पुन्हा शेतात जातो. तोपर्यंत गोटू ने चारा कापून ठेवलेला असतो. त्यानंतर गोटू आणि मी चारा ट्रॅक्टर अथवा बैलगाडी मध्ये भरतो.

शेतात दिवसभराच्या कामांचा आढावा घेऊन तसेच उद्या करावयाच्या कामांचा एक अंदाजीत आराखडा तयार करून मी आणि गोटू घराकडे निघतो. तोपर्यंत माझ्या पत्नीने गायांना चारापाणी करून ठेवलेले असते. चारा खाली काढल्यानंतर गोटू गोठ्याची स्वच्छता करतो. त्यानंतर गोटू आणि माझ्यासाठी पत्नी गरमागरम चहा बनवते. आम्ही दोघेही चहा घेतो आणि गायांच्या धारा काढण्यासाठी जातो. दूध काढून झाल्यानंतर गोटू गायांना खुराक खाऊ घालतो. तर मी सर्व दूध एकत्र करून कॅन मध्ये भरतो आणि डेअरीवर घेऊन जातो.

तेथून आल्यानंतर मी जरा वेळ टीव्ही बघत टाईमपास करतो. तोपर्यंत माझी पत्नी तिच्या हातचे सुग्रास असे जेवण तयार करते. आम्ही सर्वजण आणि गोटू सोबतच जेवण करतो. त्यानंतर मी जरा वेळ आई वडिलांशी गप्पा मारतो आणि झोपायला जातो. असा हा माझा दररोजचा दिनक्रम असतो. पाहुण्यांमधील काही कार्यक्रम, तसेच घरचे काही कार्यक्रम किंवा आजारपण वगळता माझ्या या दिनक्रमात कधीही खंड पडत नाही.

मित्रांनो आजकाल बरेच लोक आणि त्यातले त्यात विशेषतः तरुण पिढी शेती करण्यास नकार देते. शेतीमालास योग्य रीतीने भाव न मिळाल्यामुळे तसेच वेळेवर पाऊस न पडल्यामुळे शेती दिवसेंदिवस परवडेनासी झालेली आहे, त्यामुळे जुने लोक शेती करण्यास मागे हटत आहेत. तर शेतीत कराव्या लागणाऱ्या अमाप कष्टामुळे नवीन आणि शिकलेली पिढी शेतीकडे वळण्यास नको म्हणत आहे. मात्र शेततळे, ठिबक सिंचन यांसारख्या गोष्टींचा अवलंब करून बदलत्या हवामानावर आणि पारंपारिक पिकांना फाटा देत योग्य कालावधीत योग्य पिकाची लागवड करून तुम्ही संभाव्य नुकसान किमान कमी तरी करू शकता. आणि याच तत्त्वाचा अवलंब करत मी गेल्या कित्येक वर्षापासून शेतीमध्ये यशस्वी होत चांगले उत्पन्न मिळवत आहे.

मित्रांनो शेती आणि शेतकरी याकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन आधी सारखा राहिलेला नाही. पूर्वी शेती प्रथम मानली जाई, तर इतर उद्योग व्यवसाय कनिष्ठ मानली जात. मात्र खते बियाणे यांच्या वाढत्या किमती, मजुरी दरांचे वाढते प्रमाण, दिवसेंदिवस पावसाचा लहरीपणा आणि शेतीमालाला योग्य भाव न मिळणे यासारख्या कारणामुळे शेती व्यवसाय अधोगतीकडे वाटचाल करीत आहे. आणि याच कारणामुळे नवीन तरुण शेतीकडे वळण्यापेक्षा नोकरी करणे पसंत करतात. मात्र जो शेतकरी या सर्व गोष्टींवर मात करून चांगली शेती चांगली शेती पिकवतो तो नक्कीच यशस्वी होतो.

मला कोणी विचारले तर मी आवर्जून सांगतो की मला या यशस्वीतेच्या उंचीवर आणण्याचे संपूर्ण श्रेय शेतीलाच जाते. शेतीच्या उत्पन्नाच्या जीवावर मी आज आठ एकर वरून पंधरा एकर बागायती शेती केली आहे. सोबतच या शेताला पाणीपुरवठा करण्यासाठी दोन विहिरी आणि एक शेततळ्याची ही व्यवस्था केली आहे. तसेच शेती करण्यासाठी ट्रॅक्टर, ट्रॅक्टरची विविध अवजारे देखील खरेदी केलेली आहेत. माझ्या घरी आज पशुधनाच्या रुपात साक्षात लक्ष्मी नांदत आहे. आणि या सर्वांच्या वर मी आजच्या यांत्रिकीकरणाच्या युगात देखील एक दिमाखदार बैल जोडी पाळलेली आहे.

मित्रांनो प्रत्येक जण शेतीची पडती बाजू दाखवतो, मात्र योग्य व्यवस्थापन केले असता शेती देखील एक उत्तम करिअर चॉईस असू शकतो असे मला वाटते.

धन्यवाद…

मित्रांनो हा निबंध तुम्ही पुढील विषयांसाठी देखील वापरू शकता.

१. मी शेतकरी बोलतोय (Mi Shetakari Boltoy Marathi Nibandh)

२. एका शेतकऱ्याचे आत्मवृत्त (Shetkaryache Aatmvrutt Marathi Nibandh)

वाचकहो शेतकऱ्याचे मनोगत मराठी निबंध (Shetkaryache Manogat Nibandh Marathi) आपल्याला कसा वाटलं हे आम्हाला कंमेंटद्वारे जरूर कळवा. माहिती आवडल्यास नक्की शेअर करा.

Previous

मला पंख असते तर मराठी निबंध । Mala Pankh Aste Tar Marathi Nibandh

क्रियापद व त्याचे प्रकार । Kriyapad Va Tyache Prakar

Next

Leave a Comment