निळ्या मोकळ्या आकाशात स्वछंदपणे विहार करायला कोणाला आवडणार नाही. आकाशात पंख पसरून मनमोकळॆपणाने उडणाऱ्या पक्ष्यांकडे बघून एकदातरी तुमच्या मनात आले असेलच “मला पंख असते तर…”. (Mala Pankh Aste Tar Marathi Nibandh) आणि जरी नसेल अशी कधी कल्पना केली तर हा निबंध वाचून तुम्ही कल्पना करू शकता. या लेखात पहिली ते दहावी पर्यंतच्या मुलांना उपयोगी पडेल असा वेगवेगळ्या पद्धतीने मला पंख असते मराठी निबंध (Mala Pankh Aste Tar Essay in Marathi) देण्यात आला आहे. शाळांमध्ये किंवा परीक्षांमध्ये अशा प्रकारचे निबंध विचारले जातात. त्यामुळे हा लेख तुमच्यासाठी नक्की उपयोगी आहे.
दहा ओळींमध्ये मला पंख असते तर मराठी निबंध (Mala Pankh Aste Tar Marathi Nibandh in 10 Lines)
१. घराच्या अंगणात बसलेलो असताना समोरच्या झाडावर बसलेल्या पक्षाला पाहून सहज माझ्या मनात आलं मलाही पंख असते तर?
२. मी सुद्धा त्याच्यासारखा मोकळ्या आकाशात उंच उडालो असतो.
३. एका झाडावरून उडून दुसऱ्या झाडावर बसलो असतो.
४. गोड गोड फळे खाल्ली असती.
५. शाळेला जाताना पंख पसरून मस्त उडत गेलो असतो.
६. मित्राच्या घरी उडत उडत खेळायला गेलो असतो.
७. वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला गेलो असतो.
८. माझ्या मित्रांना पाठीवर बसवून त्यांनाही आकाशातून फिरवून आणेन.
९. आईला दुकानातून काही आणायचे असेल उडत उडत जाऊन आणून देईन.
१०. खरंच! पंख असते तर खूप मज्जा आली असती.
३०० शब्दांमध्ये मला पंख असते तर मराठी निबंध (Mala Pankh Aste Tar Essay in Marathi in 300 Words)
संध्याकाळची वेळ होती. मी आणि माझे मित्र मैदानावर खेळत होतो. पक्षी हळू हळू आपल्या घरट्याकडे परतत होते. आम्ही खेळून खूप थकलो होतो. पायांमध्ये घरी चालत जाण्याइतकी शक्ती नव्हती. सहज आकाशात उडणाऱ्या पक्ष्यांकडे लक्ष गेले आणि सहज मनात विचार आला मलाही या पक्षांप्रमाणे पंख असते तर…
खरंच ! जर मला पंख असते तर किती मजा आली असती! आता या क्षणी मी उडत उडत माझ्या घरी गेलो असतो. माझे चालण्याचे कष्ट वाचले असते. हा त्याक्षणी माझ्या मनात आलेला पहिला विचार होता. मग मी अजुन खोलवर विचार करू लागलो खरंच जर मला पंख असते तर मी अजून काय काय करेन?
सगळ्यात आधी मी आकाशात उंच भरारी घेईन. आकाशात उंच उडताना मोठमोठी झाडे सुद्धा किती छोटी दिसतील. डोंगर, नद्या, मोठमोठया इमारती सगळं काही मला लहान वाटेल. उडून उडून थकायला झालं कि मी इतर पक्ष्यांप्रमाणे एखाद्या झाडावर बसेन. झाडांवरची गोड गोड फळे खाईन. पक्ष्यांच्या घरट्यामध्ये कुतूहलाने वाकून पाहीन. त्यांच्या पिल्लांसोबत मैत्री करायचा प्रयत्न करेन. एका झाडावरून दुसऱ्या झाडावर स्वच्छंदपणे उडत फिरेन.
शाळेत जाताना मला बसची वाट पाहत बसावी लागली नसती. मस्तपैकी पंख पसरून आकाशात झेपावत शाळेच्या पटांगणात उतरलो असतो. सर किंवा मॅडम छडी घेऊन मारायला आल्या असत्या तर खिडकीतून भुर्रकन उडून गेलो असतो. खूप मज्जा आली असती. मित्रांसोबत पकडापकडी खेळताना कोणी मला पकडूच शकले नसते. पकडायला आल्यावर उडत उडत त्यांच्यापासून दूर पळालो असतो. अभ्यासाचा कंटाळा आल्यावर पंख पसरून आभाळात फेरफटका मारायला गेलो असतो. पक्ष्यांसोबत गप्पा मारल्या असत्या. त्यांच्यासोबत उडण्याची शर्यत लावली असती.
मला पंख असते तर मी वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला गेलो असतो. डोंगर, नद्या, धबधबे पाहिले असते. मनात येईल तेव्हा माझ्या मित्रांना आणि नातेवाईकांना भेटायला गेलो असतो. उंच आकाशात उडताना इंद्रधनुष्याचे रंग एकदम जवळून पाहिले असते. माझ्या मित्रांनाही पाठीवर बसवून उंच आकाशातून फिरवून आणले असते. कुठेही जायचे झाले तरी मला बस, सायकल, ट्रेन यांसारख्या वाहनांची गरज लागली नसती. त्यांच्या तिकिटासाठी पैसे खर्च करावे लागले नसते. सगळीकडे फुकट फिरलो असतो.
खरंच मला पंख असते तर खूप मजा आली असती.
५०० शब्दांमध्ये मला पंख असते तर मराठी निबंध (Mala Pankh Aste Tar Marathi Nibandh in 500 Words)
काही दिवसांपूर्वी आमची सहल एका अभयारण्यात गेली होती. तिथे वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी पक्षी अगदी आनंदाने रहात होते. पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येत होता. काही पक्षी झाडाच्या फांदीवर गर्दी करून बसले होते, काही आपल्या घरट्यांमध्ये आपल्या पिल्लांसोबत होते तर काही पक्षी मनसोक्त निळ्या आकाशाची भ्रमंती करत होते. त्या मनमुराद पणे आभाळाच्या उंचीचा आणि मोकळेपणाचा आनंद लुटणाऱ्या पक्ष्यांकडे बघून मनात विचार आले किती छान आयुष्य आहे ना पक्ष्यांचं. पंख पसरवून आकाशाला गवसणी घालत आहेत. आणि हे शक्य होत आहे त्यांच्या कडे असलेल्या त्यांच्या पंखांमुळे. मला सुद्धा असे पंख असते तर…
या पक्ष्यांप्रमाणे मी सुद्धा या अथांग पसरलेल्या आकाशाला आपल्या कवेत घेण्याचा प्रयत्न केला असता. जास्तीत जास्त उंच उडून भणभणत्या वाऱ्यावर स्वतःला आरूढ केले असते. ज्या दिशेला वारा घेऊन जाईल त्या दिशेला वरून दिसणाऱ्या विहंगम दृश्याचा आनंद घेत फिरलो असतो. उडून थकल्यावर एखाद्या झाडावर बसलो असतो. त्या झाडाच्या थंडगार सावलीत बसून पंखांमध्ये पुन्हा बळ साठवले असते. भूक लागल्यावर त्या झाडावरचीच फळे पोट भरून खाल्ली असती. भुंग्याप्रमाणे पुलाजवळ उडत उडत जाऊन त्याचा सुगंध नाकात साठवला असता. पक्ष्यांबरोबर मैत्री केली असती. त्यांच्यासोबत घोळक्याने आकाशाची सैर केली असती. उडताना त्यांच्यासोबत हवेत वेगवेगळे आकार बनवले असते.
मला पंख असते तर मला एखाद्या ठिकाणी जाण्यासाठी बस, रिक्षा, ट्रेन, विमान यांसारख्या साधनांची गरज पडली नसती. मनात येईल तेव्हा पंख पसरून मनाला वाटेल त्या ठिकाणी गेलो असतो. या साधनांचे तिकीट घेण्याचे टेन्शन नसते, त्यांच्या तिकिटासाठी रांगा लावाव्या लागल्या नसत्या. रहदारी मध्ये किंवा ट्रॅफिक जॅम मध्ये अडकून पडायला लागले नसते. मला कोणत्याच प्रकारचे बंधन नसते. मी कोणत्याही अडथळ्याशिवाय माझ्या आवडीच्या ठिकाणांना भेटी दिल्या असत्या. तसं तर मला जगभ्रमंती करायला खूप आवडली असती. सर्वप्रथम मी जगातील सात आश्चर्यांना भेटी दिल्या असत्या. ते हि अगदी फुकट. आकाशात उडत असताना विमानातील लोकांना हाय, हॅलो केले असते. ढगांच्या मऊ गालिच्यांमध्ये झोपलो असतो.
शाळेत जाताना दप्तराचं ओझं घेऊन उडत उडत गेलो असतो आणि शाळेतून घरी येताना सगळ्यांच्या आधी घरी पोचलो असतो. आईला बाजारातून काही आणायचे झाल्यास पटकन जाऊन आणून दिले असते. मनाला येईल तेव्हा मित्रांसोबत खेळण्यासाठी उडत उडत त्याच्या घरी गेलो असतो. त्याला हि माझ्या पाठीवर बसवून मोकळ्या आकाशातून फेरफटका मारून आणला असता. तसाच त्याला रोज शाळेतही घेऊन गेलो असतो. कोणाला काही मदत लागली असती तर ती पटकन केली असती. परीक्षा संपताच त्याच दिवशी उडत उडत मामाच्या गावी गेलो असतो. मामाच्या बागेतील आंब्याच्या झाडावर बसून मनसोक्त आंबे खाल्ले असते. सगळ्या नातेवाईकांकडे मी मनात येईल तेव्हा उडत गेलो असतो.
पण या मनुष्यप्राण्याने मला असं मनसोक्त आकाशात उडू दिल असता का? मला उडताना बघून लहान मुलांनी मला दगड मारले असते जसे ते इतर पक्ष्यांना मारतात. लोकांनी माझा त्यांच्या स्वार्थासाठी उपयोग करून घेतला असता. पंखांमुळे मी विचित्र दिसू लागलो असतो. कदाचित त्यामुळे माझे मित्र माझ्यासोबत खेळायला आले नसते. ते माझ्यापासून दुरावले असते. कदाचित मी शास्त्रज्ञाच्या कुतूहलाचा विषय झालो असतो. त्यांनी मला कैद करून माझ्यावर वेगवेगळे प्रयोग केले असते. यामुळे मला आणि माझ्या आईवडिलांना खूप त्रास झाला असता.
म्हणूनच असे वाटते कि मला पंख असते तर हि कल्पना कल्पनाच राहिलेली बरी. देवाने प्रत्येकाला जसं बनवलंय ते काहीतरी विचार करूनच बनवलं आहे. म्हणूनच आपण जसे आहोत त्यातच समाधान मानलेलं बरं.
१००० शब्दांमध्ये मला पंख असते तर मराठी निबंध (Mala Pankh Aste Tar Nibandh Marathi in 1000 Words)
दोन दिवसांपूर्वी बाबांनी एक आनंदाची बातमी दिली. ते आम्हा सर्व कुटुंबाला पिकनिक ला घेऊन जाणार होते. आम्ही सर्वजण खुश होतो. पिकनिकच्या विचारांनी तर माझ्या मनात गुदगुदल्या होत होत्या. तिथे जाऊन काय काय मजा करायची, कुठे कुठे फिरायचं आणि काय काय खायचं याच्या योजना मनात आखल्या जात होत्या. परंतु दुर्दैव पिकनिकच्या दिवशी बस चा संप झाला आणि आमची पिकनिकची योजना फिसकटली. माझा पुरता हिरमोड झाला होता. मी हिरमुसून खिडकीपाशी बसलो होतो. समोरच्या झाडावर चिमण्या, कावळे येऊन बसत होते. थोड्या वेळाने पुन्हा त्यांना पाहिजे तिथे उडून जात होते. त्यांच्याकडे पाहताना सहज माझ्या मनात विचार आला जर मलाही यांच्यासारखे पंख असते तर…
आज पिकनिकला जाण्यासाठी मला बस वर अवलंबून राहायला लागले नसते. मनात येईल तेव्हा मनात येईल त्या ठिकाणी जाऊ शकलो असतो. अगदी या पक्ष्यांसारखा. त्यांच्या प्रमाणे निळ्या आकाशात मनमोकळे पणाने उडालो असतो. उडून उडून दमायला झाल्यावर यांच्यासारखेच एखाद्या झाडावर बसून त्याच्या थंडगार सावलीत क्षणभर विश्रांती घेतली असती आणि मग पुन्हा नव्या ठिकाणी जायला निघालो असतो. भूक लागल्यावर त्याच झाडांवरची स्वादिष्ट फळे खाल्ली असती. महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या फळांसाठी मला कोणत्याही प्रकारचे पैसे द्यावे लागले नसते किंवा ती फळे तोडण्यासाठी कोणतेही कष्ट करावे लागले नसते. मी मला पाहिजे तितकी फळे मनसोक्त खाल्ली असती.
खरंच जर मला पंख असते तर पाठीवर दप्तराचे ओझे घेऊन चालत जाण्याचा त्रास कमी झाला असता. घरातून उडत उडत लगेच शाळेत पोहोचलो असतो. एखादे पुस्तक घरी राहिले असते तर लगेच जाऊन घेऊन आलो असतो. त्यामुळे शिक्षकांचा ओरडा खावा लागला नसता. एखादे वेळी शिक्षक फटके द्यायला आले असते तर भुर्रकन खिडकीतून उडून गेलो असतो. दुपारी जेवणाच्या सुट्टीत आईच्या हातचे गरम गरम जेवण खाण्यासाठी उडत उडत घरी आलो असतो. अभ्यास करून कंटाळा आल्यावर उंच आकाशातून एक फेरफटका मारून आलो असतो. हवेत मनसोक्त उडून मनाचा थकवा घालवला असता आणि पुन्हा अभ्यासाला बसलो असतो.
मित्रांसोबत खूप धमाल केली असती. त्यांनाही माझ्यासोबत पाठीवर बसवून उंच आकाशाची सैर घडवून आणली असती. कधीही मित्रांची आठवण आली किंवा त्यांच्यासोबत खेळावेसे वाटले कि लगेच भुर्रकन उडून त्यांच्या जवळ गेलो असतो. त्यांच्यासोबत पकडापकडी खेळलॊ असतो परंतु ते मला कधीच पकडू शकले नसते. त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी खास पाठीवर बसवून उडत उडत कोठेतरी फिरायला घेऊन गेलो असतो. आपल्या पृथ्वीचे विहंगम दृश्य उंच आकाशातून पहिले असते. डोंगर, पर्वत, मोठमोठी झाडे सर्व काही लहान वाटलं असत. हवेत उडताना पक्ष्यांसोबत मैत्री केली असती. त्यांच्यासोबत उडण्याची शर्यत लावली असती. दाणे गोळा करायला त्यांना मदत केली असती. त्यांच्या पिल्लांसोबत खेळलो असतो. उंचावर उडताना भणभणत्या वाऱ्याचा आनंद लुटला असता. ढगांच्या मऊ बिछान्यावर अलगद झोपलो असतो. ढंगांचीच चादर अंगावर पांघरली असती. ढगांच्या पलीकडे जाऊन पाऊस कसा पडतो ते जाणून घेतले असते. इंद्रधनुष्याचे रंग स्वतःच्या अंगाला लावून घेण्याचा प्रयत्न केलं असता.
पक्षी तर संध्याकाळी आपल्या घरट्यात परत येतात. ते रात्री आकाशात उडत नाहीत. परंतु मी रात्रींचाही आकाशात मनमोकळे पणाने विहार केला असता. चांदण्या रात्री चंद्राच्या शीतल प्रकाशात आकाशात विहार करायची मजा काही वेगळीच असती. रात्रीच्या वेळी रस्त्यावरील दिवे लागल्यानंतर त्या प्रकाशात लखलखणारी गावे आणि शहरे उंच आकाशातून किती छान दिसत असतील. मी आकाशात जाऊन त्यांचे फोटो काढले असते.
मला पंख असते तर वेगवेगळ्या ठिकाणांना, प्रेक्षणीय स्थळांना भेटी दिल्या असत्या. धार्मिक स्थळांना भेटी देऊन त्यांचे महत्त्व समजून घेतले असते. शिमला, मनाली, केदारनाथ, ताजमहाल, कन्याकुमारी, आसाममधील चहाचे मळे, शिवाजी महाराजांचे गडकिल्ले हि काही महत्त्वाची ठिकाणे आहेत जी पाहण्याची माझी मनापासून इच्छा आहे. सर्वप्रथम मी या ठिकाणी गेलो असतो. तिथलं निसर्गसौंदर्य डोळयात साठवलं असत. हळू हळू मी संपूर्ण भारत भर प्रवास केला असता. आपल्या देशाचा कानाकोपरा पहिला असता. तिथली लोक, त्यांचे विचार, त्यांची संस्कृती या सगळ्याचा अभ्यास केला असता. नद्या, समुद्र, डोंगर एका उडीत पार केले असते. नद्यांवरून उडत असताना मध्येच नदीमध्ये एक डुबकी मारली असती आणि पुन्हा आकाशात झेपावलो असतो. मी फक्त भारताचाच नाही तर संपूर्ण जगाचा कानाकोपरा पहिला असता. वेगवेगळ्या देशांमध्ये गेलो असतो. तिथल्या लोकांसोबत मैत्री केली असती. आपली समृद्ध अशी भारतीय संस्कृती जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचा प्रयत्न केला असता.
मला पंख असते तर मी लोकांना शक्य तितकी मदत करायचा प्रयत्न केला असता. म्हाताऱ्या आजी आजोबाना पटकन उडत उडत जाऊन मेडिकल मधून औषधे आणून दिली असती. आईला दुकानातून भाजीपाला आणि इतर सामान आणून दिल असतं. एखाद्या व्यक्तीचा अपघात झाल्यास ऍम्ब्युलन्स ची वाट न पाहता तसेच उडत उडत दवाखान्यात घेऊन गेलो असतो. भुकेलेल्या व्यक्तींना झाडावरची फळे काढून दिली असती. गाड्यांची प्रचंड वर्दळ असलेल्या रस्त्यावर वयस्कर व्यक्तींना उचलून उडत उडत पलीकडे नेवून रस्ता पार करायला मदत केली असती. खरंच मला पंख असते तर किती बार झालं असत ना. मी कित्येक लोकांची मदत करू शकलो असतो. गरजू लोकांना मदत करण्याचे आणि समाजसेवा करण्याचे पुण्य मला मिळाले असते.
माझ्या डोक्यात असे कल्पनाचक्र सुरु असतानाच कोणीतरी त्या पक्ष्यांच्या दिशेने दगड भिरकावून मारला. सुदैवाने तो दगड कोणत्या पक्ष्याला लागला नाही. मात्र सर्व पक्षी उडून गेले. मग माझ्या मनात आलं खरंच एव्हडं छान आयुष्य असेल का या पक्ष्यांचं. जसं या पक्ष्यांना आम्ही माणसे दगड मारून त्रास देतोय तसंच मला पंख असते तर मलाही लोकांनी त्रास दिलाच असता ना. मला हवेत उडताना बघून माझ्याही अंगावर दगड फेकून मारले असते. कोणी जाळी टाकून मला पकडले असते. कदाचित माझे पंख छाटून टाकले असते. कोणी मला पकडून शोभेची वस्तू म्हणून घरात ठेवले असते. खरंच मनुष्यप्राणी खूप नीच आहे. तो कसा वागेल काही सांगता येत नाही. कदाचित दहशतवाद, चोरी यांसारख्या वाईट कामांसाठीसुद्धा माझा उपयोग करून घेईल.
म्हातारपणी जशी हातापायांची शक्ती कमी कमी होत जाते त्याचप्रमाणे माझे पंख हि शक्तिहीन होत जातील. कदाचित माझ्याच पंखांचे वजन मला पेलवणार नाही. ते वजन घेऊन कदाचित मी चालू फिरू पण शकणार नाही. माणसाने विद्युत तारांचे नुसते जाळे पसरवून ठेवले आहे. त्यामुळे हवेत उडताना माझे पंख त्या तारांमध्ये तर अडकणार नाहीत ना. मला पंख आहेत हे समजल्यावर जिज्ञासू माणूस मला पकडून माझ्यावर वेगवेगळे वैज्ञानिक प्रयोग करेल. त्यात मला खूप यातना होतील.
नको. त्यापेक्षा मला पंखच नको. पंख हवेच असतील तर माझ्या बुद्धीला मिळू दे. माझ्या धैर्याला आणि आत्मविश्वासाला मिळू दे. या गोष्टींचा जीवावर मी माझ्या आयुष्यात गगनभरारी घेऊ शकतो. नव नवी यशाची शिखरे गाठू शकतो. त्यामुळे मला पंख असते तर हि कल्पना कल्पनाच राहिलेली बरी.
धन्यवाद!
मित्रांनो हाच निबंध तुम्ही पुढील विषयांसाठी देखील वापरू शकता.
- मला पंख फुटले तर
- मी पक्षी झालो तर
- मला उडता आले तर
- मला उडण्याची शक्ती मिळाली तर
- मी उडू शकलो तर
मित्रांनो या लेखातील मला पंख असते तर मराठी निबंध (Mala Pankh Aste Tar Nibandh Marathi) आपल्याला कसा वाटला हे आम्हांला कंमेंटद्वारे जरूर कळवा. माहिती आवडल्यास नक्की शेअर करा.