पुन्हा एकदा शाळेत जावंसं वाटतंय…

| | ,

Punha Ekada Shalet Javese Vatatey…

आज परत एकदा अल्लड़ आयुष्य जगावंसं वाटतंय
स्वप्नांच्या जादुई नगरीत रमावंसं वाटतंय
का मागे सरला तो रम्य काळ?
आज पुन्हा एकदा शाळेत जावंस वाटतंय…

प्रार्थनेला उभं राहावंसं वाटतंय
फळयाला सुविचाराने सजवावंसं वाटतंय
हवीहवीशी वाटतेय ती रोजची हजेरी
आज पुन्हा एकदा “येस सर” म्हणावंसं वाटतंय

मराठीच्या पुस्तकात खोल शिरावंसं वाटतंय
इंग्रजीला जवळ करावंसं वाटतंय
दया येतेय त्या पायथागोरसची
बिचाऱ्याला आज परत समजून घ्यावंसं वाटतंय

भूगोलाची जगभ्रमंती करावीशी वाटतेय
इतिहासाची युद्धं लढावीशी वाटतायंत
माणसांप्रमाणे बदलणाऱ्या अमिबाला
पुन्हा मायक्रोस्कोप खाली बघावंसं वाटतंय

वर्गात गोंधळ घालावासा वाटतोय
मास्तरांचा ओरडा खावासा वाटतोय
फळयावर नाव लिहिणाऱ्या त्या मॉनिटरला
पुन्हा एकदा मस्का लावावासा वाटतोय

बाकावर नाव लिहावंसं वाटतंय
दोस्तांसोबत भांडण करावंसं वाटतंय
धूळ बसलेल्या बाकाला,
पुन्हा मित्राच्या दप्तराने पुसावंसं वाटतंय

शिक्षा म्हणून मुलींच्या बाजूला बसावंसं वाटतंय,
ती हसली म्हणून उगाच रागवावंसं वाटतंय.
हृदयाची धड़धड़ वाढवणाऱ्या तिला मात्र,
पुन्हा चोरुन चोरुन पहावंसं वाटतंय.

अभ्यासाचं टेंशन घ्यावंसं वाटतंय
दप्तराचं वजन हवहवंसं वाटतंय
शाळा सुटताना होणाऱ्या बेलची
पुन्हा एकदा वाट बघत बसावंसं वाटतंय

अशक्य ते शक्य करावंसं वाटतंय
काळाला मागे न्यावंसं वाटतंय
निखळ निरागस बालपणाला
पुन्हा एकदा जगावंसं वाटतंय
आज पुन्हा शाळेत जावंसं वाटतंय …

भावेश कुड

आणखी वाचा:

Previous

हॅपी हग डे इमेजेस मराठी

हॅपी किस डे इमेजेस मराठी

Next

Leave a Comment