डोळ्यांत तुझ्या मी पाहता वाटे
थांबले माझे जग हे क्षणिक
अस्तित्वाची जाणीव करण्या
पुरे तुझे हे गूढ स्मित
चाहूल लागता तुझी मग माझ्या
मनी उठती वादळे अनेक
सावरता सावरता मी मजला
संपते तुझ्या घड्याळातील वेळ
आसपास तू असता वाटे
थांबावा हा दिन इथेच
राहावी मी अशीच वेडी
कोरण्या तुझी छबी हृदयात
समोर तू असता माझ्या
नकळे मज कसली ही आस
पाहण्या तुलाच तिरक्या नजरा
घेती धाव तुजपर्यंत
मनातील ते वादळ वारे
गाठती आनंदाचे टोक
न कळण्या मग कोणास काही
सावरला मी नजरेचा रोख
वाटू लागे मज मग हेवा
अससी जेव्हा त मित्रांसमवेत
वाटे तडक उठून यावे तिकडे
अन् वागावे मी त्यांसवें चोख
अशाच नेक भावना उसळती
माझ्या मनी सख्या तू ऐक
तुजवाचूनी न राहायचे मजला
जाणवते हे ह्रदयी खोल
या सर्व घडामोडीत तू म्हणशी
“चल… भेटू पुन्हा परत!”
नजरेआड तू निघुनी जाता
गमावते मी मौल्यवान खूप…
मेघना मावळंकर
आणखी वाचा: