कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खूप दिवसानंतर दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघ भारत दौऱ्यावर आला आहे.
दोन्ही संघांमध्ये ५ एकदिवसीय आणि ३ टी -२० सामन्यांच्या मालिकेचे आयोजन करण्यात आले आहे. (IND W vs SA W 2021)
७ मार्च पासून सुरु झालेल्या ५ एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना लखनऊ मधील भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी इकाना स्टेडियमवर खेळवण्यात येत आहे.
५ सामन्यांची ही मालिका भारताने आधीच ३-१ अशा फरकाने गमावली आहे.
त्यामुळे शेवटचा सामना जिंकून टी -२० मालिकेसाठी आत्मविश्वास उंचावण्याचा भारतीय महिला क्रिकेट संघाचा प्रयत्न असेल.
एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघाने ८ गडी राखून जिंकला होता.
दुसऱ्या सामन्यामध्ये भारतीय संघाने कम बॅक करत ९ गडी राखून दक्षिण आफ्रिका संघाचा पराभव केला.
यानंतर मात्र तिसरा आणि चवथा सामना दक्षिण आफ्रिका संघाने अनुक्रमे ६ धाव आणि ७ गडी राखून आपल्या नावावर केला आणि मालिका आपल्या खिशात घातली
सुधार करण्याची गरज
भारतीय संघाची अनुभवी गोलंदाज पूनम यादव हिने सांगितले की, आम्ही दक्षिण आफ्रिकेला त्यांच्या घरी तसेच भारतातही हरवले होते.
परंतु यावेळी आमची फिरकी गोलंदाजी तितकीशी यशस्वी झाली नाही.
त्यांमुळे सराव सत्रामध्ये काय करायला हवे, जर शेवटच्या सामन्यातही फिरकी गोलंदाजी यशस्वी ठरली नाही तर काय करायला पाहिजे, कोणते बदल करणे आवश्यक आहेत याबद्दल चर्चा करण्यात आली आहे.
टी -२० मालिकेमध्ये चांगल्या प्रदर्शनाची उम्मीद
पूनम यादव हिने शनिवार पासून सुरु होणाऱ्या टी -२० मालिकेमध्ये भारतीय संघ चांगले प्रदर्शन करेल अशी आशा व्यक्त केली आहे.
एकदिवसीय सामन्यांमध्ये आम्ही आमच्या रणनित्या योग्य प्रकारे अंमलात आणू शकलो नाही.
परंतु टी -२० मालिकेमध्ये त्यामध्ये सुधार करण्याचा आमचा प्रयत्न असेल. असेही ती म्हणाली.
दरम्यान भारतीय महिला क्रिकेट संघ आणि दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघ यांमध्ये २० मार्च, २१ मार्च आणि २३ मार्च या दिवशी टी -२० सामने (ind w vs sa w t20) होणार आहेत.
सर्व सामने भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी ७ वाजता सुरु होतील.