Road Safety World Series 2021। भारताचा फायनल मध्ये प्रवेश, सचिन – युवी यांची आतिषबाजी

| | ,

इंडिया लेजंड्स आणि वेस्ट इंडिज लेजंड्स यांच्यात रंगलेल्या रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजच्या (Road Safety World Series 2021) पहिल्या सेमीफायनल मुकाबल्यात इंडिया लेजंड्सने बाजी मारली.

वेस्ट इंडिज लेजंड्स चा १२ धावांनी पराभव करत फायनल मध्ये प्रवेश केला आहे.

फायनल मध्ये इंडिया लेजंड्स कोणासोबत भिडणार हे २१ मार्च रोजी होणाऱ्या श्रीलंका लेजंड्स आणि दक्षिण आफ्रिका लेजंड्स यांच्यामध्ये होणाऱ्या दुसऱ्या सेमीफायनल मुकाबल्याच्या निकालावर अवलंबून आहे.

या मालिकेसाठी भारतीय संघ सुरुवातीपासूनच चषकाचा (Road Safety Series) मजबूत दावेदार मानला जात होता.

आपल्या नावाला साजेसा असा खेळ करत सहा पैकी पाच सामने जिंकून गुणतालिकेमध्ये अव्वल स्थान पटकावले होते.

दरम्यान इंडिया लेजंड्स आणि वेस्ट इंडिज लेजंड्स यांच्यात खेळल्या गेलेल्या पहिल्या सेमीफायनल सामन्यात वेस्ट इंडिज लेजंड्स संघाचा कर्णधार ब्रायन लारा याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

भारताची सुरुवात धमाकेदार झाली.

सचिन आणि सेहवाग यांच्या लोकप्रिय सलामी जोडीने ५.३ षटकांमध्येच ५६ धावा धावफलकावर लावल्या.

सेहवाग ने ५ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने अवघ्या १७ चेंडूंमध्ये ३५ धावा बनवल्या.

सचिननेही ६ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ४२ चेंडूंमध्ये ६५ धावा बनवत आपला मास्टर क्लास दाखवून दिला.

सचिन बाद झाला तेव्हा भारताची स्थिती १४ षटकांमध्ये १४०/३ अशी होती.

यानंतर मैदानात आलेल्या युसूफ पठाण आणि युवराज सिंह यांनी तुफान फटकेबाजी करायला सुरुवात केली.

युसूफने २ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ३७ धावा बनवल्या तर युवराज सिंहने १ चौकार आणि ६ गगनचुंबी षटकारांच्या मदतीने अवघ्या २० चेंडूंमध्ये ४९ धावा कुटल्या.

२० षटकांच्या समाप्तीनंतर इंडिया लेजंड्स ने वेस्ट इंडिज लेजंड्स समोर २१८ धावांचा डोंगर उभा केला.

वेस्ट इंडिज लेजंड्सचा कडवा प्रतिकार

प्रत्युत्तरासाठी मैदानात उतरलेल्या वेस्ट इंडिज लेजंड्स संघाने दमदार खेळ दाखवत सामन्यामध्ये रंगत आणली.

ड्वेन स्मिथ ६३ (३६), नरसिंह देवनारायण ५९ (४४) आणि ब्रायन लारा ४६ (२८) यांनी तडाखेबंद खेळी करून भारताच्या मुठीतून सामना जवळपास हिसकावून घेतला होता.

एक वेळ अशी होती कि वेस्ट इंडिज लेजंड्सना सामना जिंकण्यासाठी १० चेंडूंमध्ये १९ धावांची गरज होती.

मैदानावर ब्रायन लारा आणि नरसिंह देवनारायण तुफान फटकेबाजी करत खेळत होते.

परंतु पुढच्याच चेंडूवर विनय कुमारने ब्रायन लाराला त्रिफळाचित केले आणि शेवटच्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर देवनारायण रन आऊट झाला.

अशाप्रकारे भारतीय लेजंड्सने वेस्ट इंडिजच्या जबड्यातून सामना खेचून आणला.

वेस्ट इंडिज संघाने निर्धारित २० षटकांमध्ये २०६/६ धावांपर्यंत मजल मारली.

युवराज सिंह ला त्याच्या तुफानी खेळीची सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

Previous

IND W vs SA W । टी -२० मालिकेआधीचा शेवटचा सामना जिंकून आत्मविश्वास वाढवण्याचा भारताचा प्रयत्न

पाण्याचे महत्व

Next

Leave a Comment