Gudipadwa Essay in Marathi
‘चैत्राची सोनेरी पहाट, आहे तिचा एक वेगळाच थाट!’ खरंच… या दिवसाचा थाट, या दिवशीचे वातावरण काही वेगळेच असते.
हिंदूंच्या नवीन वर्षाची सुरुवात म्हटल्यानंतर दिवस खास तर असणारच.
घरातील वातावरण या दिवसाला तर खास बनवतंच पण त्याला अजून खास बनवतं ते या दिवसाचं आध्यात्मिक महत्व.
हिंदू धर्मातील सर्वात पवित्र समजल्या जाणाऱ्या साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जाणारा हा दिवस म्हणजे गुढीपाडवा.
दसरा, गुढीपाडवा आणि अक्षय तृतीया हे तीन पूर्ण मुहूर्त आणि दिवाळीचा पाडवा म्हणजेच कार्तिक शुद्ध प्रतिपदेचा अर्धा असे साडेतीन मुहूर्त मानले जातात.
हिंदू बांधवांसाठी ही नवीन वर्षाची सुरुवात असते.
गुढीपाडवा (Gudipadwa in Marathi) या सणाने चैत्र महिन्याची सुरुवात होते आणि चैत्र महिन्यापासून मराठी वर्षाची सुरुवात होते.
त्यामुळे या मराठी वर्षाचे स्वागत हिंदू बांधव मोठ्या उत्साहाने करतात.
आनंदाचा आणि उत्साहाचा सण म्हणूनही या सणाला ओळखले जाते.
गुढीपाडव्याशी निगडित पुराणातील कथा
श्रीराम यांचे अयोध्येत आगमन
रामायणात सर्वानी वाचले असेलच.
भगवान श्रीराम यांना चौदा वर्षे वनवास भोगावा लागला होता.
हा वनवास भोगत असताना रावणाने सीतेचे अपहरण केले होते.
त्यामुळे श्रीरामांनी दुष्ट रावणासोबत युद्ध करून रावण आणि इतर राक्षसांचा पराभव केला होता.
हि घटना म्हणजेच वाईट गोष्टीवर सत्याचा विजय होता.
असे सांगितले जाते की रावणासारख्या शक्तीशाली शत्रूचा पराभव करून भगवान श्रीराम याच दिवशी अयोध्येत परत आले होते.
त्यांच्या आगमनाप्रित्यर्थ अयोध्यावासियांनी दारोदारी गुढ्या उभारून आनंद साजरा केला.
त्या दिवसापासून हिंदू संस्कृतीमध्ये या दिवशी गुढी उभारण्याची प्रथा आहे.
गुढी हे विजयाचे, सकारात्मकतेने आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते.
शालिवाहन शक
गुढीपाडव्यानिमित्ताने आणखी एक आख्यायिका सांगितली जाते.
पुराणात सांगितलेल्या कथेप्रमाणे शालिवाहन नावाचा एक कुंभार होता.
या कुंभाराच्या पुत्राने शकांचा पराभव करण्यासाठी सहा हजार मातीचे पुतळे तयार केले.
त्यानंतर त्यांच्यामध्ये प्राण फुंकून त्यांना जिवंत केले.
या सहा हजार जिवंत केलेल्या पुतळ्यांच्या साहाय्याने त्याने शकांचा पराभव केला.
याच शालिवाहन राजाच्या नावाने नवीन कालगणना सुरु झाली तिला ‘शालिवाहन शक’ असे म्हणतात.
शालिवाहन शंकाची सुरुवात गुढीपाडव्याच्या दिवसापासूनच झाली आहे असे सांगितले जाते.
शंकर आणि पार्वती यांचा विवाह
असे म्हणतात की प्राचीन मानवाने जेव्हा देवाची कल्पना केली आणि पूजा करायला सुरुवात केली ती एका स्त्रीच्या म्हणजेच देवीच्या रूपाची.
ही स्त्री म्हणजे आदिशक्ती, आदिमाता पार्वती असे मानले जाते.
पुराणकथेनुसार पाडव्याच्याच दिवशी आदिशक्ती पार्वती आणि भोलेनाथ शंकर यांचे लग्न ठरले.
याच दिवसापासून लग्नाच्या तयारीला सुरुवात झाली आणि तृतीयेला विवाह सोहळा पार पडला अशी आख्यायिका प्रचलित आहे.
गुढीपाडवा कसा साजरा करतात?
चैत्र शुद्ध प्रतिपदेचा दिवस गुढीपाडवा म्हणून साजरा केला जातो.
असे म्हणतात कोणत्याही शुभकार्याची सुरुवात या दिवशी करावी.
इतर दिवसांप्रमाणे या दिवशी मुहूर्त शोधण्याची गरज नसते.
या दिवसापासूनच वसंत ऋतूचे आगमन होते.
त्यासोबतच शालिवाहन संवत्सराची सुरुवात देखील याच दिवसापासून होते.
हिंदू बांधवांसाठी हा सण म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात असते.
मराठी बांधव मोठ्या उत्साहाने नवीन वर्षाचे स्वागत करतात.
चैत्राची ती रम्य पहाट उजाडताच घराघरांतून लगबग सुरु होते.
घरासमोरील अंगण साफ करून त्यावर सडा सारवण केले जाते.
त्यावर काढलेली सुंदर रांगोळी मनाला प्रसन्न करते.
घरातील प्रत्येकजण अंघोळ करून नवीन पारंपरिक कपडे घालतात.
वातावरणात एक वेगळाच उत्साह दाटलेला असतो.
यानंतर गुढी उभारली जाते.
यामध्ये एक लांब बांबूची काठी घेतली जाते.
तिला धुवून स्वच्छ केले जाते.
काठीच्या वरच्या टोकाला एक रेशमी वस्त्र गुंडाळले जाते.
त्यासोबतच काठीला कडुलिंबाची डहाळी, आंब्याची पाने, फुलांचा हार आणि साखरेच्या गाठी बांधल्या जातात.
यानंतर त्यावर सहसा तांब्या किंवा पितळेचा गडू किंवा तांब्या बसवला जातो.
ही गुढी घरासमोरील अंगणात उभी केली जाते.
गुढी ज्या ठिकाणी उभी करणार ती जागा व्यवस्थित स्वच्छ करून त्या ठिकाणी एक पाट ठेवला जातो.
त्याभोवती सुंदर रांगोळी काढली जाते.
गुढीचा बांबू या पाटावर उभा केला जातो.
आणखी वाचा: गुढीपाडवा मराठी इमेजेस
गुढी पडणार नाही याची दक्षता घेण्यासाठी तो बांधला जातो.
ज्यांच्या घरासमोर अंगण नसेल ते गच्चीवर किंवा गॅलरी मध्ये गुढी उभी करतात.
यानंतर गुढीला गंध, फुले, अक्षता वाहून गुढीची पूजा केली जाते.
उदबत्ती आणि निरांजन लावले जाते.
गुढीला दूध साखरेचा किंवा गुळाचा वगैरे नैवेद्य दाखवला जातो.
यावेळी घरातील वातावरण एकदम आल्हाददायक आणि उत्साहवर्धक असते.
दुपारी गुढीला पुराणपोळीसारख्या गोडधोड पदार्थाचा नैवेद्य दाखवला जातो.
घरातील सर्वजण एकत्र बसून आनंदी वातावरणात जेवण करतात.
यामुळे घरातील लोकांच्या नात्यामध्ये प्रेम आणि दृढता वाढते.
सायंकाळी सूर्यास्ताच्यावेळी पुन्हा हळद कुंकू, फुले आणि अक्षता वाहून गुढी उतरवली जाते.
यावेळी कुटुंबाच्या समृद्धीची कामना केली जाते.
या दिवशी सर्व आप्तेष्टांना नववर्षाच्या शुभेच्छा देऊन त्यांचाही आनंद द्विगुणित केला जातो.
अशाप्रकारे गुढीपाडवा हा सण आनंदाबरोबरच नवचैतन्य देऊन जातो.