शिवनेरीवर कलम १४४, विरोधकांची जोरदार टीका.

| | ,

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने यावर्षी शिवजयंती साध्या पद्धतीने साजरी करण्याचे आवाहन शिवप्रेमींना केले आहे.

यासंदर्भात सरकारतर्फे नियमावली जाहीर करण्यात आली आहे.

यामध्ये कोणत्याही प्रकारची मिरवणूक न काढता साधेपणाने शिवजयंती साजरी करण्याबाबत मार्गदर्शक सूचना करण्यात आल्या आहेत.

त्यातच सरकारने आता शिवप्रेमींनी गर्दी करू नये म्हणून शिवनेरीवर कलम १४४ लागू केला आहे. त्यामुळे शिवप्रेमींमध्ये नाराजीचे सूर उमटत आहेत. (Section 144 Imposed at Shivaneri Fort on 19th Feb Shivajayanti Programme).

विरोधकांनीही सरकारच्या या निर्णयावर जबरी टीका केली आहे.

महाराष्ट्र भाजपाच्या ट्विटर अकाउंट वरून “आपल्या मंत्र्यांच्या खासगी कार्यक्रमात जेव्हा हजारो लोकांची गर्दी होते, तेव्हा या सरकारला कोरोनाच्या नियमावलीची आठवण येत नाही. मात्र, शिवजयंती साजरी करताना सरकारला कोरोनाची नियमावली आठवते ! शिवजयंतीसाठी ठाकरे सरकारचा दुट्टपीपणा का?” असे ट्विट करत विरोधकांनी सरकारच्या निर्णयाचा विरोध केला आहे.

काय आहे नियमावली? (Shivjayanti 2021 Maharashtra Government Rules and Regulations)

१) छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म १९ फेब्रुवारी, १६३० रोजी शिवनेरीवर झाला होता. त्यामुळे अनेक शिवप्रेमी किल्ला शिवनेरी अथवा गड/किल्ल्यांवर जाऊन तारखेनुसार दि. १८ फेब्रुवारी रोजीच्या मध्यरात्री १२ वाजता देखील एकत्र येऊन शिवजयंती साजरी करतात. परंतु यावर्षी कोविड – १९ चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणात एकत्र न येता साधेपणाने शिवजयंती उत्सव साजरा करणे अपेक्षित आहे.

२) दरवर्षी शिवजयंती साजरी करताना संपूर्ण महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. परंतु यावर्षी कोणत्याही प्रकारे सार्वजनिक ठिकाणी पोवाडे, व्याख्यान, गाणे, नाटक इत्यादींचे सादरीकरण अथवा इतर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येऊ नये. त्याऐवजी या कार्यक्रमाचे केबल नेटवर्क अथवा ऑनलाइन प्रक्षेपण उपलब्ध करुन देण्याबाबत व्यवस्था करण्यात यावी.

३) तसेच, कोणत्याही प्रकारे प्रभात फेरी, बाईक रैली, मिरवणुका काढण्यात येऊ नयेत. त्याऐवजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अथवा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्याचा कार्यक्रम आयोजित करुन त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सींगचे पालन करून फक्त १०० व्यक्तींच्या उपस्थितीत शिवजयंती साजरी करण्याची परवानगी देण्यात येत आहे.

४) शिवजयंतीच्या दिवशी आरोग्यविषयक उपक्रम/शिबिरे (उदा. रक्तदान) आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे आणि त्याद्वारे कोरोना, मलेरिया, डेंग्यू इत्यादी आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता याबाबत जनजागृती करण्यात यावी.

५) आरोग्य विषयक उपक्रमांचे आयोजन करताना त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सींग तसेच स्वच्छतेचे नियम (मास्क, सैनिटायझर इत्यादी) पाळण्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे.

६) कोविड- १९ च्या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महानगरपालिका, पोलीस प्रशासन, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे. तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष सण सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत अजून काही सूचना प्रसिद्ध झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे.

तरी शिवजयंतीचा काही प्रोग्रॅम बनवण्याआधी सरकारचे हे नियम जरूर वाचा.

Previous

फाफ डू प्लेसिसची कसोटी क्रिकेट मधून निवृत्ती

शिवजयंती मराठी इमेजेस

Next

Leave a Comment