फाफ डू प्लेसिसची कसोटी क्रिकेट मधून निवृत्ती

दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार राहिलेला धडाकेबाज फलंदाज फाफ डू प्लेसिस याने आज कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. (Faf du Plessis Announces Retirement From Test Cricket).

दक्षिण आफ्रिकेकडून ६९ कसोटी सामने खेळलेल्या प्लेसिसने ३० सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्वही केले आहे.

‘आपल्या देशासाठी क्रिकेटच्या तिन्ही प्रकारातून खेळणे ही एक अभिमानाची गोष्ट आहे, परंतु कसोटी क्रिकेटमधून माझी निवृत्ती घेण्याची वेळ आलेली आहे.’ असे म्हणत त्याने आपली निवृत्ती जाहीर केली आहे.

६९ कसोटी सामने खेळलेल्या प्लेसिसने ४०.०३ च्या सरासरीने ४१६३ धाव केल्या आहेत. यामध्ये १० शतकांचा समावेश आहे.

त्याची सर्वोच्च धावसंख्या १९९ आहे. दोन महिन्यांपूर्वीच श्रीलंकेविरुद्ध सेंच्युरियनच्या मैदानावर त्याने ही धावसंख्या बनवली होती.

“जर १५ वर्षांपूर्वी मला कोणी सांगितलं असतं की तू दक्षिण आफ्रिकेकडून ६९ कसोटी सामने खेळणार आहेस आणि संघाचा कर्णधारही असणार आहेस, तर मी त्याच्यावर विश्वास ठेवला नसता. मला दिलेल्या आशीर्वादांनी भरलेल्या कसोटी कारकीर्दीबद्दल मी कृतज्ञ आहे.” असे निवृत्ती दरम्यान सोशल मीडियावर दिलेल्या निवेदनात प्लेसिसने म्हटले आहे.

ऑस्ट्रेलिया आणि घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका जिंकणारा फाफ डू प्लेसिस हा दक्षिण आफ्रिकेचा एकमेव कर्णधार आहे.

“पुढील दोन वर्षे आयसीसी टी -२० वर्ल्डकपची वर्षे आहेत. त्यामुळे मी माझे लक्ष तिथे केंद्रित करत आहे. मला जगभरामध्ये जास्तीत जास्त खेळायचे आहे जेणेकरून मी सर्वोत्कृष्ट खेळाडू बनू शकेन.” असेही त्याने निवेदनात म्हटले आहे.

“मला ठाम विश्वास आहे की या फॉर्मेटमध्ये संघाला देण्यासाठी माझ्याकडे खूप काही आहे. याचा अर्थ असा नाही की मी एकदिवसीय सामन्यांकडे दुर्लक्ष करत आहे. मी सध्या काही काळासाठी टी -२० क्रिकेटला प्राधान्य देत आहे.” असे त्याने आपल्या निवेदनात स्पष्ट केले आहे.

“आपल्या सगळ्यांना आवडणाऱ्या खेळाचे प्रतिनिधित्व आणि देशाचे नेतृत्व करण्याची संधी दिल्याबद्दल मी आपला आभारी आहे.” अशा शब्दांत प्लेसिस ने दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाचे आभार मानले आहेत.

सोबतच त्याने त्याच्या कारकिर्दीत लाभलेले प्रशिक्षक, सहकारी आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांचेही आभार मानले.

Leave a Comment