देशभक्तीपर गीते | Desh Bhakti Geet in Marathi 

| |

या लेखात आपण मराठी भाषेतील देशभक्तीपर गीते पाहणार आहोत. देशभक्तीपर गीते म्हणजे अशी गीते ज्यांच्यामधून आपले देशप्रेम किंवा देशभक्ती व्यक्त होते. या गीतांमधून आपल्या देशाचे गौरवगान गायले जाते आणि त्याच्या भरभराटीची कामना केली जाते. वेगवेगळ्या भाषांमधून अशी अनेक देशभक्तीपर गीते लिहिली गेली आहेत. मराठी भाषेतही ग.दि.माडगूळकर, गोविंदाग्रज यांसारख्या महान साहित्यिकांनी देशभक्तीपर गीते (Patriotic Songs Lyrics in Marathi) लिहिली आहेत. अशीच काही मराठी देशभक्तीपर गीते (Marathi Desh Bhakti Geet) या लेखात लिहिली आहेत. 

देशभक्तीपर गीते (Desh Bhakti Geet in Marathi)

1. हे राष्ट्र देवतांचे

हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे
आ-चंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे

कर्तव्यदक्ष भूमी सीता-रघुत्तमाची
रमायणे घडावी येथे पराक्रमांची
शिर उंच उंच व्हावे हिमवंत पर्वतांचे

येथे नसो निराशा थोड्या पराभवाने
पार्थास बोध केला येथेच माधवाने
हा देश स्तन्य प्याला गीताख्य अमृताचे

येथेच मेळ झाला सामर्थ्य-संयमाचा
येथेच जन्म झाला सिद्धार्थ गौतमाचा
हे क्षेत्र पुण्यदायी भगवन्‌ तथागताचे

हे राष्ट्र विक्रमाचे, हे राष्ट्र शांततेचे
सत्यार्थ झुंज द्यावी या जागत्या प्रथेचे
येथे शिवप्रतापी नरसिंह योग्यतेचे

येथे परंपरांचा सन्मान नित्य आहे
जनशासनातळीचा पायाच ‘सत्य’ आहे
येथे सदा निनादो जयगीत जागृताचे

– ग.दि.माडगूळकर

2. झेंडा आमुचा प्रिय देशाचा

झेंडा आमुचा प्रिय देशाचा
फडकत वरी महान
करितो आम्ही प्रणाम याला
करितो आम्ही प्रणाम

लढले गांधी याच्याकरिता
टिळक, नेहरू लढली जनता
समरधूरंधर वीर खरोखर
अर्पुनि गेले प्राण
करितो आम्ही प्रणाम याला
करितो आम्ही प्रणाम

भारतमाता आमुची माता
आम्ही गातो या जयगीता
हिमालयाच्या उंच शिरावर
फडकत राही निशाण
करितो आम्ही प्रणाम याला
करितो आम्ही प्रणाम

या देशाची पवित्र माती
जूळती आमुच्या मधली नाती
एक नाद गर्जतो भारता
तुझा आम्हा अभिमान
करितो आम्ही प्रणाम याला
करितो आम्ही प्रणाम

गगनावरी आणि सागरतिरि
सळसळ करिती लाटा लहरी
जय भारत जय, जय भारत जय, गाता ती जयगान
करितो आम्ही प्रणाम याला
करितो आम्ही प्रणाम!

आणखी वाचा: भारताचे राष्ट्रगीत | Jana Gana Mana in Marathi

3. जिंकू किंवा मरू (Marathi Desh Bhakti Geet)

माणुसकीच्या शत्रुसंगे
युद्ध आमुचे सुरू
जिंकू किंवा मरू

लढतिल सैनिक, लढू नागरिक
लढतिल महिला, लढतिल बालक
शर्थ लढ्याची करू, जिंकू किंवा मरू

देश आमुचा शिवरायाचा, झाशीवाल्या रणराणीचा
शिर तळहाती धरू, जिंकू किंवा मरू

शस्त्राघाता शस्त्रच उत्तर, भुई न देऊ एक तसूभर
मरू पुन्हा अवतरू, जिंकू किंवा मरू

हानी होवो कितीहि भयंकर, पिढ्या-पिढ्या हे चालो संगर
अंती विजयि ठरू, जिंकू किंवा मरू

– ग.दि.माडगूळकर

4. बलसागर भारत होवो (Patriotic Songs Lyrics in Marathi)

बलसागर भारत होवो
विश्वात शोभुनी राहो॥

हे कंकण करि बांधियले जनसेवे जीवन दिधले
राष्ट्रार्थ प्राण हे उरले मी सिध्द मरायाला हो॥१॥

वैभवी देश चढवीन सर्वस्व त्यास अर्पीन
हा तिमिर घोर संहारीन या बंधु सहाय्याला हो॥२॥

हातात हात घालून ह्रदयास ह्रदय जोडून
ऐक्याचा मंत्र जपून या कार्य करायाला हो॥३॥

करि दिव्य पताका घेऊ प्रियभारतगीते गाऊं
विश्वास पराक्रम दावू ही माय निजपदा लाहो॥४॥

या उठा करु हो शर्थ संपादु दिव्य पुरुषार्थ
हे जीवन ना तरि व्यर्थ भाग्यसुर्य तळपत राहो॥५॥

ही माय थोर होईल वैभव दिव्य शोभेल
जगतास शांति देईल तो सोन्याचा दिन येवो॥६॥

मंगल देशा पवित्र देशा

मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा
प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा

राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा
नाजुक देशा, कोमल देशा, फुलांच्याहि देशा

अंजन कांचन करवंदीच्या काटेरी देशा
बकुलफुलांच्या प्राजक्तीच्या दळदारी देशा

भावभक्तिच्या देशा आणिक बुद्धीच्या देशा
शाहीरांच्या देशा कर्त्या मर्दांच्या देशा

ध्येय जे तुझ्या अंतरी, निशाणावरी, नाचते करी;
जोडी इह पर लोकांसी, व्यवहारा परमार्थासी,

वैभवासि, वैराग्यासी
जरिपटक्यासह भगव्या झेंड्याच्या एकचि देशा
प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा ॥१॥

अपार सिंधुच्या भव्य बांधवा, महाराष्ट्र देशा
सह्याद्रीच्या सख्या, जिवलगा, महाराष्ट्र देशा

पाषाणाच्या देही वरिसी तू हिरव्या वेषा
गोदा, कृष्णा, भीमा तुझिया ललाटिंच्या रेषा

तुझिया देही करी प्रतिष्ठा प्रथम प्राणांची
मंगल वसती जनस्थानिंची श्रीरघुनाथांची
ध्येय जे तुझ्या अंतरी….. ॥२॥

– गोविंदाग्रज

5. उठा राष्ट्रवीर हो (Desh Bhakti Geet in Marathi)

उठा राष्ट्रवीर हो
सज्ज व्हा, उठा चला,
सशस्त्र व्हा, उठा चला

युध्द आज पेटले जवान चालले पुढे
मिळूनि सर्व शत्रुला क्षणांत चारु या खडे
एकसंघ होउनि लढू चला लढू चला
उठा उठा, चला चला

लाख संकटे जरी उभी समोर ठाकली
मान ताठ आमुची कुणापुढे न वाकली
थोर वंश आपुला महान मार्ग आपुला
उठा उठा, चला चला

वायुपुत्र होउनी धरु मुठीत भास्करा
होउनी अगस्तिही पिऊनि टाकु सागरा
मन्युबाळ होउनी रणात जिंकू मृत्युला
उठा उठा, चला चला

चंद्रगुप्त वीर तो फिरुनि आज आठवू
शूरता शिवाजिची नसानसात साठवू
दिव्य ही परंपरा अखंड चालवू चला
उठा उठा, चला चला

यज्ञकुंड पेटले प्रचंड हे सभोवती
दुष्ट शत्रू मारुनी तयास देउ आहुती
देवभूमि ही अजिंक्य दाखवू जगा चला
उठा उठा, चला चला

– रवींद्र भट

6. खरा तो एकची धर्म

खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे

जगी जे हीन अतिपतित, जगी जे दीन पददलित
तया जाऊन उठवावे, जगाला प्रेम अर्पावे

जयांना ना कोणी जगती सदा ते अंतरी रडती
तया जाऊन सुखवावे, जगाला प्रेम अर्पावे

समस्तां धीर तो द्यावा, सुखाचा शब्द बोलावा
अनाथा साह्य ते द्यावे, जगाला प्रेम अर्पावे

सदा जे आर्त अतिविकल, जयांना गांजती सकल
तया जाऊन हसवावे, जगाला प्रेम अर्पावे

कुणा ना व्यर्थ शिणवावे, कुणा ना व्यर्थ हिणवावे
समस्तां बंधु मानावे, जगाला प्रेम अर्पावे

प्रभूची लेकरे सारी तयाला सर्वही प्यारी
कुणा ना तुच्छ लेखावे, जगाला प्रेम अर्पावे

असे जे आपणापाशी असे, जे वित्त वा विद्या
सदा ते देतची जावे, जगाला प्रेम अर्पावे

भरावा मोद विश्वात असावे सौख्य जगतात
सदा हे ध्येय पूजावे, जगाला प्रेम अर्पावे

असे हे सार धर्माचे असे हे सार सत्याचे
परार्थी प्राणही द्यावे, जगाला प्रेम अर्पावे

जयाला धर्म तो प्यारा, जयाला देव तो प्यारा
त्याने प्रेममय व्हावे, जगाला प्रेम अर्पावे

– साने गुरुजी

आणखी वाचा: वंदे मातरम् | Vande Mataram in Marathi

7. जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा (Marathi Desh Bhakti Geet)

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

रेवा वरदा, कृष्ण कोयना, भद्रा गोदावरी
एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी
भीमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा
जय जय महाराष्ट्र माझा …

भीती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणार्‍या नभा
अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जीभा
सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा
दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा

काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी
पोलादी मनगटे खेळती खेळ जीवघेणी
दारिद्र्याच्या उन्हात शिजला, निढळाच्या घामाने भिजला
देशगौरवासाठी झिजला
दिल्लीचेही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा

वाचकहो तुम्ही शाळेमध्ये ही गीते (Marathi Desh Bhakti Geet) नक्की गायली असतील. या लेखातील माहिती आपल्याला कशी वाटली हे आम्हाला कंमेंट द्वारे जरूर कळवा. माहिती आवडल्यास नक्की शेअर करा. 

Previous

वंदे मातरम् | Vande Mataram in Marathi

झाडांचे महत्त्व मराठी निबंध । Importance of Trees Essay in Marathi

Next

Leave a Comment