उत्तराखंडमध्ये पुन्हा एकदा हाहाकार | हिमकडा कोसळून महाभयंकर हानी

| |

उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यातील जोशीमठ येथे आज सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास हिमकडा कोसळून एक मोठी दुर्घटना घडली. (Uttarakhand Glacier Burst News)

हिमकडा नदीत कोसळल्याने नदीला महापूर आला त्याचा परिणाम आजूबाजूच्या परिसरावर झाला आहे. अनेक घरांचं नुकसान झालं आहे. 

या नैसर्गिक आपत्तीचा तडाखा ऋषिगंगा ऊर्जा प्रकल्पाला बसला आहे. हा ऊर्जा प्रकल्प जवळपास उद्ध्वस्थ झाला आहे.

या प्रकल्पाशी संबंधित असलेले जवळपास १००-१५० जण बेपत्ता आहेत. प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणेने मदत आणि बचावकार्य युद्धपातळीवर सुरु केले आहे. 

आयटीबीपीचे महासंचालक एस एस बी देसवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार दुर्घटना घडतेवेळी जवळपास १०० मजूर, कामगार घटनास्थळीच उपस्थित होते.

त्यापैंकी नऊ जणांचे मृतदेह हाती लागले आहेत. बेपत्ता मजुरांचा शोध सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं. तपोवन धरणात अडकलेल्या १६ जणांना वाचवण्यात सुरक्षा यंत्रणेला यश आले आहे. 

दरम्यान उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत चमोलीमध्ये तपोवन भागाजवळ रेणी गावात दाखल झाले असून ते परिस्थितीचा आढावा घेत आहेत.

“मी उत्तराखंड येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेचा सातत्याने आढावा घेत आहे. देश उत्तराखंडच्या बाजूने उभा आहे आणि प्रत्येकाच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना करत आहे. मी सातत्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलत आहे आणि एन डी आर एफ च्या तैनातीबाबत, मदत आणि बचाव कार्याबाबत अपडेट घेत आहे.” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करून म्हटले आहे.    

या घटनेनंतर मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी करण्यात आला आहे.

नागरिक मदत मिळवण्यासाठी  १०७० किंवा ९५५७४४४४८६ या क्रमांकावर संपर्क साधू शकतात.

Previous

रतन टाटा यांची विनंती: “मला भारतरत्न देण्याच्या मागणीची मोहिम थांबवा”

हॅपी टेडी डे इमेजेस मराठी

Next

Leave a Comment