मराठी प्रार्थना । Prayers in Marathi

| |

या लेखात आपण मराठी प्रार्थना (Prayers in Marathi) पाहणार आहोत. निर्मळ मनाने देवाची केलेली आराधना म्हणजे प्रार्थना होय. शाळेमध्ये दैनंदिन परिपाठामध्ये या प्रार्थनांचा समावेश केलेला आहे. रोज सकाळी प्रार्थना (Marathi Prarthana) केल्याने मन प्रसन्न होते. एक प्रकारच्या मनःशांतीचा अनुभव येतो. म्हणून प्रत्येकाने रोज सकाळी प्रार्थना केली पाहिजे. शाळेमध्ये घेतली जाणारी प्रार्थना मुलांवर चांगले संस्कार रुजविण्यास मदत करते. अशाच काही संस्कार घडविणाऱ्या मराठी प्रार्थना (Marathi Prayers Lyrics) खाली दिल्या आहेत. 

१. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे (Khara to Ekachi Dharma Marathi Prarthana)

खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे

जगी जे हीन अतिपतित, जगी जे दीन पददलित

तया जाऊन उठवावे, जगाला प्रेम अर्पावे ॥१॥

जयांना ना कोणी जगती सदा ते अंतरी रडती

तया जाऊन सुखवावे, जगाला प्रेम अर्पावे ॥२॥

समस्तां धीर तो द्यावा, सुखाचा शब्द बोलावा

अनाथा साह्य ते द्यावे, जगाला प्रेम अर्पावे ॥३॥

सदा जे आर्त अतिविकल, जयांना गांजती सकल

तया जाऊन हसवावे, जगाला प्रेम अर्पावे ॥४॥

कुणा ना व्यर्थ शिणवावे, कुणा ना व्यर्थ हिणवावे

समस्तां बंधु मानावे, जगाला प्रेम अर्पावे ॥५॥

प्रभूची लेकरे सारी तयाला सर्वही प्यारी

कुणा ना तुच्छ लेखावे, जगाला प्रेम अर्पावे ॥६॥

असे जे आपणापाशी असे, जे वित्त वा विद्या

सदा ते देतची जावे, जगाला प्रेम अर्पावे ॥७॥

भरावा मोद विश्वात असावे सौख्य जगतात

सदा हे ध्येय पूजावे, जगाला प्रेम अर्पावे ॥८॥

असे हे सार धर्माचे असे हे सार सत्याचे

परार्थी प्राणही द्यावे, जगाला प्रेम अर्पावे ॥९॥

जयाला धर्म तो प्यारा, जयाला देव तो प्यारा

त्याने प्रेममय व्हावे, जगाला प्रेम अर्पावे ॥१०॥

२. सर्व धर्म प्रार्थना (Sarv Dharma Marathi Prayer)

ॐ तत् सत् श्री नारायण तू, पुरुषोत्तम गुरु तू।
सिद्ध बुद्ध तू, स्कंद विनायक, सविता पावक तू।।

ब्रह्म मज्द तू, यह शक्ती तू, ईशु पिता प्रभू तू।
रुद्र, विष्णू तू, राम- कृष्ण तू, रहीम ताओ तू।।

वासुदेव गो-विश्वरूप तू, चिदानंद हरि तू।
अद्वितीय तू, अकाल निर्भय, आत्मलिंग शिव तू॥

– विनोबा भावे

३. या लाडक्या मुलांनो (Ya Ladkya Mulano Marathi Prayers Lyrics)

या लाडक्या मुलांनो, तुम्ही मला आधार ।
नव हिंदवी युगाचे, तुम्हीच शिल्पकार ॥धृ।।

आईस देव माना, वंदा गुरुजनांना।
जगी भावनेहुनी या, कर्तव्य थोर जाणा ।
गंगेपरी पवित्र, ठेवा मनी विचार ॥१॥

शिवबापरी जगांत, दिलदार थोर व्हावे।
टिळकापरी सदैव, ध्येयास त्या स्मरावें।
जे चांगलें जगी या, त्याचा करा स्वीकार।।२।।

शाळेत रोज जाता, ते ज्ञान-बिंदु मिळवा।
हृदयांत आपुल्या त्या देशाभिमान ठेवा।
कुलशील थोर माना, ठेवू नका विकार ॥३॥

४. असो तुला देवा! माझा सदा नमस्कार (Aso Tula Deva Maza Marathi Prarthana)

असो तुला देवा! माझा सदा नमस्कार

तुझ्या दयादातृत्वाला अंत नाहि पार ॥ असो…. ॥

तुझ्या कृपेने रे होतिल फुले फत्तराची

तुझ्या कृपेने रे होतिल मोति मृत्तिकेची

तुझ्या कृपेने रे होतिल सर्प रम्य हार

असो तुला देवा! माझा सदा नमस्कार ॥

तुझ्या कृपेने रे होइल उषा त्या निशेची

तुझ्या कृपेने रे होइल सुधा त्या विषाची

तुझ्या कृपेने रे होइल पंगु सिधुपार

असो तुला देवा! माझा सदा नमस्कार ॥

तुझ्या कृपासिंधूमधला बिंदु जरि मिळेल

तरि प्रभो! शतजन्मांची मत्तृषा शमेल

तुझे म्हणुनि आलो राया! बघत बघत दार

असो तुला देवा! माझा सदा नमस्कार ॥

५. या भारतात बंधुभाव नित्य बसू दे (Ya Bhartat Bandhubhav Nitya Vasu De)

या भारतात बंधुभाव नित्य वसू दे।
दे वरचि असा दे॥धृ॥

हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसू दे।
मतभेद नसू दे॥१॥

सकलांस कळो मानवता, राष्ट्रभावना।
ही सर्व स्थळी मिळुनी समुदाय-प्रार्थना
उद्योगी तरुण शीलवान येथे दिसू दे॥२॥

जातीभाव विसरूनिया एक हो आम्ही।
अस्पृश्यता समूळ नष्ट हो जगातुनी।
खलनिंदका मनींही सत्य न्याय वसू दे॥३॥

सौंदर्य रमो घराघरात स्वर्गियापरी।
ही नष्ट होऊ दे विपत्ति भीतीबावरी
तुकड्यास सदा या सेवेमाजि बसू दे॥४॥

– राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

६. दिवा पाहुनी लक्ष्मी येते करू तिची प्रार्थना (Diva Pahuni Lakshmi Yete Prayers in Marathi)

दिवा पाहुनी लक्ष्मी येते करू तिची प्रार्थना

शुभंकरोति म्हणा, मुलांनो, शुभंकरोति म्हणा

शुभंकरोति कल्याणम्‌, शुभंकरोति कल्याणम्‌

जेथे ज्योती तेथे लक्ष्मी

उभी जगाच्या सेवाधर्मी

दिशादिशांतुन या लक्ष्मीच्या दिसती पाउलखुणा

या ज्योतीने सरे आपदा

आरोग्यासह मिळे संपदा

शत्रुबुद्धिचा विनाश होता सौख्य मिळे जीवना

दिव्या दिव्या रे दीपत्कार

कानी कुंडल मोतिहार

दिव्यास पाहून नमस्कार हा रिवाज आहे जुना

७. सत्यं शिवं सुंदरा (Satyam Shivam Sundara Marathi Prayer)

नमस्कार माझा या ज्ञानमंदिरा सत्यं शिवं सुंदरा ।।धृ।।

शब्दरूप शक्ती दे, भावरूप भक्ती दे
प्रगतीचे पंख दे चिमणपाखरा ॥१॥

विद्याधन दे आम्हास, एक छंद एक ध्यास
नाव नेई पैलतिरी दयासागरा।।२।।

होऊ आम्ही नीतिमंत, कला गुणी बुद्धीमंत
कीर्तीचा कळस जाई उंच अंबरा।।३।।

८. सर्वात्मका शिवसुंदरा (Sarvatmaka Shivsundara Marathi Prarthana)

सर्वात्मका, शिवसुंदरा स्वीकार या अभिवादना

तिमिरातूनी तेजाकडे प्रभू आमुच्या ने जीवना ॥ धृ. ॥

सुमनांत तू, गगनांत तू

तार्‍यांमध्ये फुलतोस तू

सद्धर्म जे जगतामध्ये

सर्वांत त्या वसतोस तू

चोहीकडे रूपे तुझी जाणीव ही माझ्या मना ॥ १ ॥

श्रमतोस तू शेतामध्ये

तू राबसी श्रमिकांसवे

जे रंजले अन गांजले

पुसतोस त्यांची आसवे

स्वार्थावीना सेवा जिथे तेथे तुझे पद पावना ॥ २ ॥

न्यायार्थ जे लढती रणी

तलवार तू त्यांच्या करी

ध्येयार्थ जे तमी चालती

तू दीप त्यांच्या अंतरी

ज्ञानार्थ जे तपती मुनी, होतोस त्या तू साधना ॥ ३ ॥

करुणाकरा, करुणा तुझी

असता मला भय कोठले ?

मार्गावरी पुढती सदा

पाहीन मी तव पाउले

सृजनत्व या हृदयामध्ये नित जागवी भीतीविना ॥ ४ ॥

– कुसुमाग्रज

९. हंस वाहिनी सरस्वती (Hans Vahini Saraswati Lyrics)

हंस वाहिनी सरस्वतीच्या, 

पदकमली रमते, 

माझे मन पावन होते ।।धृ.।।

वीणा हाती मंजूळ वादन

श्वेत कमल के मंगल आसन

राजहंस तव राजस वाहन

घे वंदन माते ||१||

मूर्ती साजरी नयन मनोहर

धवल वस्त्र किती शोभे सुंदर

चंद्रही भासे उदात्त अंबर

भारावून जाते ||२||

१०. तू बुद्धि दे (Tu Buddhi De Marathi Prayers Lyrics)

तू बुद्धि दे, तू प्रकाश दे, नवचेतना विश्वास दे

जे सत्य सुंदर सर्वथा आजन्म त्याचा ध्यास दे

सापडे ना वाट ज्यांना हो तयांचा सारथी

हरवले आभाळ ज्यांचे हो तयांचा सोबती

करिती तुझी जे साधना त्यांना तुझा सहवास दे

सन्मार्ग आणि सन्मती लाभो सदा सत्संगती

नीती ना ही भ्रष्ट हो जरी संकटे आली किती

पंखात ह्या बळ दे नवे झेपावण्या आकाश दे

११. शुद्धी दे, बुद्धी दे, हे दयाघना (Shuddhi De, Buddhi De He Dayaghana Lyrics)

शुद्धी दे, बुद्धी दे, हे दयाघना

शक्‍ती दे, मुक्‍ती दे आमुच्या मना

तरतम ते उमजेना, उमजेना सत्य

फसविते आम्हांला विश्व हे अनित्य

दिग्दर्शन मज व्हावे हीच कामना

स्वत्वाला विसरून जर भ्रमले हे चित्त

ऋजुतेवर मात करी द्रोह हा प्रमत्त

निर्भयता जागावी हीच प्रार्थना

१२. अजाण आम्ही तुझी लेकरे तू सर्वांचा पिता (Ajan aamhi Tuzi Lekare Lyrics)

अजाण आम्ही तुझी लेकरे तू सर्वांचा पिता

नेमाने तुज नमितो, गातो तुझ्या गुणांच्या कथा

सूर्यचंद्र हे तुझेच देवा, तुझी गुरेंवासरें

तुझीच शेते, सागर, डोंगर, फुले, फळे, पाखरे

अनेक नावे तुला तुझे रे दाही दिशांना घर

करिशी देवा सारखीच तू माया सगळ्यांवर

खूप शिकावे, काम करावे, प्रेम धरावे मनी

हौस एवढी पुरवी देवा हीच एक मागणी

१३. देवा तुझे किती सुंदर आकाश (Deva Tuze Kiti Sundar Aakash Lyrics)

देवा तुझे किती सुंदर आकाश

सुंदर प्रकाश सूर्य देतो

सुंदर चांदण्या चंद्र हा सुंदर

चांदणे सुंदर पदे त्याचे

सुंदर ही झाडे, सुंदर पाखरे

किती गोड बरे गाणे गाती

सुंदर वेलींची सुंदर ही फुले

तशी आम्ही मुले देवा तुझी

इतुके सुंदर जग तुझे जर

किती तू सुंदर असशील 

१४. तुम्ही हो माता पिता तुम्ही हो (Tumhi Ho Mata Pita Tumhi Ho Prayer Lyrics)

तुम्ही हो माता, पिता तुम्ही हो ।

तुम्ही हो बंधू, सखा तुम्ही हो ॥

तुम ही हो साथी, तुम ही सहारे ।

कोई ना अपना सिवा तुम्हारे ॥

तुम ही हो नईया, तुम ही खिवईया ।

तुम ही हो बंधू, सखा तुम ही हो ॥

तुम ही हो माता, पिता तुम्ही हो ।

तुम ही हो बंधू, सखा तुम्ही हो ॥

जो खिल सके ना वो फूल हम हैं ।

तुम्हारे चरणों की धूल हम हैं ॥

दया की दृष्टि, सदा ही रखना ।

तुम ही हो बंधू, सखा तुम्ही हो ॥

तुम्ही हो माता, पिता तुम्ही हो ।

तुम्ही हो बंधू, सखा तुम्ही हो ॥

मित्रांनो या लेखातील मराठी प्रार्थनांची हि माहिती आपल्याला कशी वाटली हे आम्हांला कंमेंटद्वारे जरूर कळवा. माहिती आवडल्यास नक्की शेअर करा.

Previous

मंगळागौर गाणी | Mangalagaur Songs in Marathi

मंगलाष्टके । Marathi Mangalashtak

Next

Leave a Comment