माझा आवडता महिना श्रावण मराठी निबंध | Maza Avadta Mahina Shrawan Marathi Nibandh

| |

मित्रांनो, आजच्या लेखामध्ये आपण माझा आवडता महिना श्रावण मराठी निबंध (Maza Avadta Mahina Shrawan Marathi Nibandh) या विषयावर विविध निबंध बघणार आहोत.

मित्रांनो, सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या सर्व महाराष्ट्रातील लोकांचा जिव्हाळ्याचा विषय म्हणजे श्रावण महिना होय. श्रावण महिन्याची आतुरतेने वाट उभा महाराष्ट्र बघत असतो. विद्यार्थ्यांसाठी याच विषयावर निबंध लिहिणे सोपे व्हावे म्हणून काही निबंधाचे नमुने खाली दिलेले आहेत. 

दहा ओळींमध्ये माझा आवडता महिना श्रावण मराठी निबंध (10 lines Maza Avadta Mahina Shrawan Marathi Nibandh)

१. मराठी दिनदर्शिकेत येणारा श्रावण महिना माझ्या सर्वात आवडीचा महिना आहे.

२. श्रावण महिना म्हणलं की सुट्यांची फारच रेलचेल असते.

३. या महिन्यात खूप सारे सण येत असल्याने या महिन्यात मला खूप गोडधोड खायला मिळते.

४. आम्ही या महिन्यात आमच्या घराजवळील गोरक्षनाथ गडावर जातो, तेथे श्रावणात प्रत्येक सोमवारी मोठी यात्रा भरते.

५. आमची शाळा आम्हाला तिसऱ्या श्रावणी सोमवारी शाळेजवळील शिव मंदिरात घेऊन जाते, तेथे आम्हाला महाप्रसाद दिला जातो.

६. श्रावण महिन्यात पावसामुळे सर्वत्र हिरवेगार गवत उगवलेले असते.

७. पावसामुळे सर्वत्र प्रसन्न वातावरण निर्मान होते.

८. या महिन्यात आमच्याइकडे आवर्जून मकेचे कणीस भाजून खाल्ले जाते, या पार्टीत आम्ही मित्र फार धमाल करतो.

९. माझ्यासाठी तरी श्रावण महिना हा भरपूर सुट्या, खूप सारे सण उत्सव आणि खाण्यापिण्याची रेलचेल असते.

१०. असा हा श्रावण महिना मला फार आवडतो.

धन्यवाद…

तीनशे शब्दांमध्ये माझा आवडता महिना श्रावण मराठी निबंध (Maza Avadta mahina Shrawan Marathi Nibandh in 300 Words)

मित्रांनो, प्रत्येक मराठी महिन्याचं काही न काही वैशिष्ट्य असतातच, आणि या विविध वैशिष्ट्यांमुळेच  प्रत्येकाला वेगवेगळा मराठी महिना आवडत असतो. चैत्रापासून सुरू होणारे मराठी वर्ष पहिल्याच दिवशी मराठी नववर्ष ज्याला पाडवा म्हणून ओळखले जाते या सणांनी सुरू होते. कोणी या चैत्राच्या पालवीचा आनंद घेतो तर कोणी मुसळधार बरसणाऱ्या आषाढासाठी आस लावून धरतो. मला मात्र संपूर्ण पृथ्वीला हिरव्या शालू नेसवणाऱ्या आणि रिमझिम रिमझिम पावसात उभ्या निसर्गाला नटविणाऱ्या श्रावणाचे वेध लागलेले असतात. सर्वत्र सौंदर्य, तेज आणि नवचैतन्य पेरणारा श्रावण हा माझा आवडीचा महिना आहे.

क्रमाने विचार केल्यास श्रावण हा मराठी दिनदर्शिकेत पाचव्या क्रमांकावर येणारा महिना आहे. प्रत्येक मराठी महिना हा विविध सणांशी जोडलेला असतो, मात्र श्रावण महिन्यावर विविध सणांचे विशेष प्रेम दिसून येते. श्रावण महिन्यात अनेक सनावारांची रेलचेल असते, आणि सण म्हटलं की सुग्रास अन्नाची मेजवानी ही आलीच. सोबतीने विविध व्रत वैकल्ये उपवास यांनी वातावरण कसे चैतन्यमय होऊन जाते. श्रावणातला प्रत्येक दिवस हा काही ना काही खास असतोच असतो.

श्रावणातील निसर्ग सौंदर्य देखील अगदी मनोरम असते. ज्येष्ठ आणि आषाढ महिन्यात अगदी धुवाधार पडलेला पाऊस सर्वत्र गवत आणि झाडेझुडपे उगवितो. त्यामुळे सर्वत्र कसे हिरवेगार गालिचे पसरल्यासारखे भासत असते. आणि अशा या श्रावणात धुवाधार पावसाची जागा रिमझिम पावसाने घेतलेली असते. फेसाळते धबधबे महाकाय आवाज करत कड्यावरून कोसळत असतात, बाहेर अल्हाददायक पाऊस चालू असतो, सगळीकडून हिरवाईमुळे मंद गार वारा सुटलेला असतो, आणि अशात आई घरात कांदा भजी तळत असते वाह! या वर्णनानेच कोणीही श्रावणाच्या अगदीच प्रेमात पडून जाते.

मित्रांनो श्रावण म्हटले की प्रत्येक जण आपल्या धावपळीच्या आयुष्यातून उसंत काढून श्रावणाचा आनंद लुटत असतो. मी देखील माझ्या कुटुंबासमवेत श्रावण महिन्यात विविध देवस्थानांना भेट देतो. रोजच्या धावपळीत होणाऱ्या कसरतीला येथे जरासा आराम मिळतो, येतील शांत आणि पवित्र वातावरणामुळे मन अगदी शांत आणि प्रसन्न होऊन जाते.

चराचरातील सर्वच प्राण्यांसाठी श्रावण हा विसाव्याचा महिना म्हणून ओळखला जातो. माझे शेतकरी आई वडील देखील या काळात शेतीतून थोडीशी उसंत काढून श्रावण महिन्याचा आस्वाद घेतात. पिके उभे राहून चांगलीच जोमात आलेली असतात, पावसाच्या रिमझिम पडल्यामुळे पिकांना पाणी देण्याची आवश्यकता नसते त्यामुळे सर्वच लोक अगदी आनंदून गेलेले असतात.

असा हा मनोरम, मधुर, आल्हाददायक असणारा श्रावण मला फार आवडतो तसंच तो तुम्हालाही आवडत असणार यात तीळमात्रही शंका नाही.

पाचशे शब्दांमध्ये माझा आवडता महिना श्रावण मराठी निबंध (Maza Avadta Mahina Shrawan Essay in Marathi in 500 Words)

मित्रांनो, श्रावण आणि मराठी लोक यांचं एक अतूट नातं आहे, ज्याप्रमाणे चातक पक्षी पावसाची आतुरतेने वाट पाहतो तसंच सर्व भाविक भक्त श्रावण महिन्याची आतुरतेने वाट पाहत असतात. आणि याचे कारण म्हणजे श्रावण महिन्याला पवित्रतेचे स्थान दिले गेलेले आहे. या महिन्यात अनेक सणवार, दैवी उत्सव येत असतात. विशेषतः भगवान शिव शंकर आणि भगवान विष्णू यांच्या आराधनेसाठी हा महिना अतिशय खास समजला जातो. या महिन्यात अनेक गिरीदुर्गांवर आणि डोंगर माथ्यावर शिवभक्त मोठ्या संख्येने गर्दी करत असतात, आणि भगवान शिवाची आराधना करत यात्रा उत्सव साजरे करत असतात.

श्रावण महिना पवित्र असण्यामागे अनेक दंतकथा सांगितल्या जात असतात. त्यातील एक महत्त्वाची दंतकथा म्हणजे दक्ष राजाची कन्या मृत पावल्यानंतर त्या कन्येने हिमालया पर्वतामध्ये माता पार्वतीच्या रूपाने पुनर्जन्म घेतला होता, आणि माता पार्वतीने श्रावण महिन्यामध्येच भगवान शिव शंकराची मनोभावे उपासना करून आपला विवाह भगवान शिव यांच्याशी व्हावा म्हणून आराधना केली होती, आणि त्यांच्या या तपश्चर्याचे फळ म्हणून भगवान शिवशंकर यांच्याशी माता पार्वतीचा विवाह झाला होता. तेव्हापासून श्रावण महिना हा खास करून शिव पार्वती भक्तांसाठी अतिशय पवित्र समजला जातो. अनेक शिवभक्त या कालावधी मध्ये भगवान शिव यांची मनोभावे आराधना करतात. आणि त्यांना त्यांचे इच्छित फळही मिळते अशी सर्वत्र मान्यता आहे.

तसेच दुसरी एक दंतकथा अशी देखील सांगते की, समुद्रमंथनाच्या वेळी विविध प्रकारची चौदा रत्ने समुद्रातून निघाली होती. त्यामध्ये हलाहल नावाचे विष देखील होते. इतर सर्व रत्ने घेण्यामध्ये सर्वजण पुढे होते मात्र हलाहल विष कोण पचवणार यावरून गोंधळ निर्माण झाला होता. त्यावेळी भगवान शिव यांनी स्वतः पुढे होऊन ते हलाहल विष प्राशन केले. त्यामुळेच भगवान शिव यांचा कंठ निळ्या रंगाचा झाला, व तिथून पुढे भगवान शिवांना नीलकंठ या नावाने सर्व भाविक भक्त ओळखू लागले. आपल्या भक्तांवरील संकटे स्वतःवर घेण्यास सदैव तत्पर असणाऱ्या भगवान शिवांना श्रावण महिन्यात सर्व भाविक भक्त मोठ्या भक्ती भावाने पुजतात.

 सोमवार हा भगवान शिवाचा दिवस आहे हे आपण सर्वच जाणतो. आणि त्यातही श्रावण महिन्यातील सोमवार खूपच पवित्र असतात असे आपण सर्वांनीच ऐकले असेल. श्रावण महिन्यातील सोमवारी पुरुष, स्त्रिया आणि विशेष करून कुमारीका मुली भगवान शिवांची आराधना करतात. श्रावणी सोमवारच्या दिवशी भगवान शिवांची केलेली आराधना फलदायी ठरते, अशी भाविक भक्तांमध्ये मान्यता आहे. आणि म्हणूनच बरेच लोक या दिवशी उपवास देखील ठेवतात.

श्रावण महिन्यात निसर्ग सुद्धा खूपच उदार झाल्यासारखा वाटतो. संपूर्ण पृथ्वी हिरव्या रंगाची उधळण करत हिरवाईच्या शालूने नटते. सर्व डोंगरदऱ्या हिरव्यागार होतात, आणि ह्या डोंगर उतारावर जनावरे मस्त चरण्याचा आनंद सुद्धा घेतात, तसेच सर्व पक्षी किलबिलाट करत स्वैरपणे इकडे तिकडे विहार करत असतात. शेतकऱ्यांचे पिके अगदी टरारून आलेली असतात, आणि श्रावणसरी पिकांना दिवसेंदिवस तेज बहाल करत असतात. श्रावण महिन्यातील खेडेगावातील दृश्य अतिशय मनोरम असते. एरवी आषाढातील मुसळधार  पावसामुळे सर्व नद्या नाले तुडुंब भरून वाहत असतात, सर्व झाडे हिरवेगार होऊन सुखाने डोलत असतात, हलक्या रिमझिम पावसाने वातावरणात सर्वत्र गारवा भरलेला असतो, आणि अशा या वातावरणात सुग्रास आणि गरम गरम जेवणाचा आस्वाद आणि सोबतीला पापड असला की माणूस पृथ्वीवरील स्वर्गच अनुभवतो. म्हणूनच श्रावणाला समाजातील सर्वच स्तरातून मोठ्या प्रमाणावर पसंत केले जाते.

श्रावण महिन्यात मला अनेक सणवारात सहभागी होण्याबरोबरच प्रत्येक सणाला विविध प्रकारच्या सुग्रास अन्न पदार्थांचा आस्वाद घेण्यास मिळतो, तसेच गावाकडे चिखल तुडवत निसर्गाचा आनंद लुटत भटकायला मिळते, सोबतीला मंद रिमझिम पाऊस आणि गावाकडील मित्र ही मैफिल जुळून आली की मला खूप आनंद होतो. म्हणून मला हा श्रावण महिना फार आवडतो, आणि नेहमी आवडतही राहणार…

एक हजार शब्दांमध्ये माझा आवडता महिना श्रावण मराठी निबंध (Maza Avadta Mahina Shrawan Marathi Nibandh in 1000 Words)

श्रावणमासी हर्ष मानसी,

हिरवळ दाटे चोहीकडे.

क्षणात येते सरसर शिरवे,

क्षणात फिरूनि ऊन पडे.

                            ~बालकवी

मित्रांनो या ओळी आपण लहानपणापासून केव्हा ना केव्हातरी ऐकलेल्याच असतील. लहानपणी जेव्हा आपल्याला मराठी महिन्यांचे ज्ञान नव्हते तेव्हा आपल्याला या ओळींचा अर्थ देखील कळत नसेल, मात्र जेव्हा श्रावण महिना म्हणजे काय हे समजले तेव्हापासून प्रत्येक जणच या श्रावण महिन्याचा चाहता झाला असेल.

कुणी ‘आवडता महिना’ असा शब्द उल्लेख जरी केला तरी माझ्या जिभेवर आपोआपच श्रावण महिन्याचे नाव येते, कारण श्रावण महिन्यात निसर्गाचे जे रूप आपल्याला बघायला मिळते ते संपूर्ण वर्षात कधीच दिसत नाही. बालकवींनी वर्णन केल्याप्रमाणे अगदी हुबेहूबच श्रावणातला नजारा असतो. रिमझिम पावसामुळे सर्वत्र पृथ्वी झाडाझुडपांनी हिरवीगार झालेली असते, आणि ऊन आणि पाऊस यांचा सुरेख असा लपंडाव सुरू असतो. इतक्यात रिमझिम करत पडणाऱ्या सरी कधी बंद होतात आणि लख्ख असे ऊन पडते हे कळत सुद्धा नाही, अगदी डोळ्याची पापणी लवेपर्यंत उन्हाचा पाऊस आणि पावसाचे ऊन हा खेळ सुरू असतो. यामध्ये आपली मात्र छत्री उघडा आणि बंद करा यात पुरी मजा होऊन जाते. रिमझिम करत पडणाऱ्या सरी गवतावर पडतात, आणि पुढच्याच क्षणी पडणाऱ्या उन्हामध्ये हे थेंब अगदी मोत्याप्रमाणे चमकू लागतात, तेव्हा चरा चरातील सर्वच सृष्टी आणि प्राणीमात्र देखील सुखावून जातात. याच्या जोडीला म्हणून आकाशात सारखे इंद्रधनुष्य दिसत असते. हिरवेगार डोंगर, त्यावर उगवलेल्या नवनवीन वनस्पती आणि त्यांना लागलेली रंगबिरंगी फुले, दुरून मोराच्या ओरडण्याचा येणारा आवाज, घडीत ऊन तर घडीत सावली असा नयनरम्य देखावा प्रत्येकाच्याच मनाला भुरळ घालत असतो, आणि डोळ्यांचे पारणे फेडतो.

गावाकडे तर श्रावण महिन्यात विशेष मज्जा असते. व्रत वैकल्य यांमुळे आसपासच्या प्रत्येक घरी कोठे न कोठे धार्मिक कार्यक्रम आयोजित केलेले असतातच. यावेळी लहान मुलांना तर गोड धोड खायला मिळणार म्हणून खूपच आनंद होतो. सर्वत्र वातावरण हे भक्ती भावाने भारलेले असते. अनेक ठिकाणच्या धार्मिक मंदिरांमध्ये सप्ताहाचे आयोजन केले जाते, यादरम्यान अनेक धार्मिक ग्रंथाचे पारायण देखील केले जाते. मोठी माणसे शेतात फारसे काम नसल्यामुळे जनावरांना डोंगरावर चरायला घेऊन जातात. जनावरे चारा खाण्याचा आस्वाद घेत असतानाच सर्व गुराखी लोकांची गप्पांची चांगलीच मैफिल जमते.

श्रावण महिना हा कृतज्ञता व्यक्त करण्याचा महिना आहे असे देखील म्हटले जाते, आणि याचे कारण म्हणजे श्रावण महिन्यात येणारे विविध सण होय. श्रावण महिना खरंतर शेतकऱ्यांशी मोठ्या प्रमाणावर जोडला गेलेला आहे. नाग हा उंदरांना खाऊन शेताचे रक्षण करतो म्हणून नागाला शेतकऱ्याचा मित्र म्हणून ओळखले जाते. वर्षभर पिकांचे रक्षण करण्यात आघाडीवर असणाऱ्या या नागाची पूजाअर्चा करून त्याच्या प्रति कृतज्ञ होण्याचा महत्त्वाचा सण म्हणजे नागपंचमी होय. यावेळी नवविवाहित मुली आपल्या माहेरपणाला येतात. घरोघरी झाडाला झोका बांधला जातो, मुली आणि महिला तसेच लहान बालके नागपंचमीची गाणी म्हणत म्हणत झोका खेळण्याचा आस्वाद घेतात. ‘उंच बाई माझा झोका’ असे म्हणत या नवविवाहिता जणू माझ्या संसाराचा गाडाही असाच उंच उंच जात राहो अशी प्रार्थना करताना भासतात.

 तसेच श्रावणामध्ये बहिण भावाच्या प्रेमाचे प्रतीक असणारा रक्षाबंधन हा सण देखील येतो. या सणाच्या दिवशी बहिण भावाला ओवाळते, आणि राखी सुद्धा बांधते. सोबतच भाऊ बहिणीचे सदा रक्षण करण्याचे वचन देखील बहिणीला देतो. याप्रसंगी घरात गोडधोड पदार्थ बनविले जातात, अवघे वातावरण प्रसन्न होऊन जाते. याच दिवशी नारळी पौर्णिमेचा सण देखील साजरा केला जातो. या सणाला कोकणात अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. वर्षभर मासेमारीतून उदरनिर्वाह करणाऱ्या कोळी बांधवांसाठी ही समुद्राप्रती कृतज्ञ होण्याची एक नामी संधी असते. या दिवशी समुद्राला नारळ अर्पण करून कोळी बांधव मोठ्या भक्ती भावाने हा सण साजरा करतात, आणि तेथून पुढेच मासेमारीसाठी समुद्रात उतरतात.

मित्रांनो हल्लीच महाराष्ट्र सरकारने दहीहंडी या खेळाला महाराष्ट्राचा राज्य खेळ म्हणून दर्जा दिलेला आहे. महाराष्ट्र आणि दहीहंडी यांचे नाते फार जुने आहे. श्रावण महिन्यात येणाऱ्या गोकुळाष्टमी या सणाच्या दिवशी श्रीकृष्ण भगवानांची मोठी भक्तिभावाने पूजाअर्चा केली जाते. सगळीकडे भजन कीर्तनाचे कार्यक्रम आयोजित केले जातात. त्यापूर्वी सात दिवस धार्मिक ग्रंथांचे पारायण करून सप्ताह साजरा केला जातो, आणि गोकुळाष्टमीच्या दिवशी काल्याचे किर्तन करून दहीहंडी फोडली जाते. तरुणांमध्ये दहीहंडी प्रति प्रचंड वेड असल्याचे दिसते.

मित्रांनो सणांची रेलचेल आणि कृतज्ञता व्यक्त करत करत श्रावण महिना कसा संपतो हे कळत सुद्धा नाही, मात्र आपल्या मूळ स्वभावाप्रमाणेच श्रावण शेवटच्या दिवशीही स्वस्त बसत नाही. श्रावणाच्या शेवटच्या दिवशी शेतकऱ्याच्या प्रत्येक सुखदुःखात आणि कष्टात साथ देणाऱ्या बैलाप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी श्रावणी पोळा हा सण उभ्या महाराष्ट्रभर अतिशय उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी बैलांना कामासाठी जुंपले जात नाही. सकाळी उठून शेतकरी बैलांना चांगली अंघोळ घालतो, व त्यांना सुकवल्यानंतर विविध रंगछटांनी बैलांना सजवितो. बैलांवर झूल टाकली जाते. बैलांची शिंगे रंगविली जातात. तसेच विविध आभूषणांनी बैलांचे गळे अगदी भरून जातात. आणि अशा या दिमाखदार बैल जोड्या संपूर्ण गावातून वाजत गाजत मिरविल्या जातात. मित्रांनो वर्षभर आपल्याला साथ देणाऱ्या निसर्गातील प्रत्येक घटकाप्रति कृतज्ञ होत त्यांची पूजा चर्चा करणे हे आपल्या भारतीय संस्कृतीला श्रावणातूनच देणे लाभले आहे.

सामान्य माणसाबरोबरच श्रावण हा कवी मनाला देखील भुरळ घालत असतो. आजच्या तारखेला तुम्हाला श्रावण महिन्यावर आधारित अनेक प्रकारच्या कविता आणि गाणी बघायला मिळतील. इतर सगळे महिने सोडून श्रावण महिन्यावर कविता सुचतात म्हणजे श्रावण महिना नक्कीच असाधारण असा आहे.

या महिन्यामध्ये लहान मुलांपासून वृद्ध व्यक्तीपर्यंत प्रत्येक जण आपापल्या परीने श्रावणाचा आनंद लुटत असतो. लहान मुले रिमझिम पावसात भिजत आणि एकमेकांच्या अंगावर चिखल उडवत तर काही मुले पावसात विविध खेळ खेळण्याचा आस्वाद घेत आनंद लुटतात. एरवी मुसळधार पावसात घराबाहेर न जाऊ देणाऱ्या आयादेखील श्रावणातल्या रिमझिम सरीत मुलांना भिजण्यासाठी अडवत नाहीत. स्त्रिया श्रावणातील विविध सण उत्सवांचा आधार घेत व्रत वैकल्ये करण्यामध्ये आनंद मानतात, तर पुरुष मंडळी शेतातल्या कामातून उसंत घेत आपल्या सवंगड्यांसोबत गाव गप्पा करण्यामध्ये आनंद घेतात. श्रावणाचा आनंद उपभोगायचा म्हणजे वृद्ध मंडळी तरी का मागे राहतील, रेडिओवर श्रावण गीतांचा आनंद लुटत आणि गरमागरम चहाचा कप हातात घेत खिडकीतून पाऊस बघत सगळ्या आयुष्यातील श्रावणाच्या आठवणी ही वृद्ध मंडळी ताज्या करत असतात. त्यात त्यांना अलौकिक असा आनंद मिळत असतो.

श्रावण महिन्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे एरवी थोडेसे खाल्ले तरी देखील मागे हटणारी लोक श्रावणात कधी खादाड होऊन जातात हे त्यांचे त्यांना देखील कळत नाही. श्रावणातल्या या रिमझिम पावसात प्रत्येकालाच गरमागरम आणि मसालेदार पदार्थ खाण्याची इच्छा होत असते. बाहेर रिमझिम पडणारा पाऊस, हवेत हलकासा पसरलेला गारवा, एका हातात गरमागरम चवदार कांदे भजे, आणि दुसऱ्या हातात वाफाळत्या चहाचा कप आणि या सर्वांच्या जोडीला लता मंगेशकर यांच्या मंजुळ आवाजात ‘श्रावणात घन निळा बरसला’ यांसारखी गाणी म्हणजे खऱ्या श्रावणप्रेमीसाठी स्वर्गीय सुखच. आणि हे सुख अनुभवल्याशिवाय कुठलाही मराठी माणूस मोठा होतच नाही असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

मला तर हा श्रावण महिना दिवाळी सारख्या मोठ्या सणांपेक्षाही प्रिय आहे. आणि का नसावा?  स्वप्नात दिसल्याप्रमाणे सगळे आयुष्य सत्यात जगायचे असेल तर श्रावण महिना आणि गावाकडचे दिवस याचा मेळ घालत स्वतःच अनुभव घ्यावा लागेल.

 धन्यवाद…

Previous

क्रियापद व त्याचे प्रकार । Kriyapad Va Tyache Prakar

क्रियाविशेषण अव्यय व त्याचे प्रकार । Kriyavisheshan Avyay va Tyache Prakar 

Next

Leave a Comment