सर्वनाम व त्याचे प्रकार । Sarvanam Va Tyache Prakar

| |

या लेखात आपण मराठी व्याकरणातील आणि शब्दांच्या जातीमधील अजून एक महत्त्वाचा घटक म्हणजे सर्वनाम (Pronoun in Marathi) याबद्दल माहिती पाहणार आहोत. सर्वनाम व त्याचे प्रकार (Sarvanam Va Tyache Prakar) याबद्दल सविस्तर माहिती ला लेखात दिली आहे. सर्वप्रथम आपण सर्वनामाची व्याख्या पाहू. 

सर्वनाम (Pronoun in Marathi)

सर्वनामाची व्याख्या : वाक्यात किंवा परिच्छेदामध्ये नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम (Sarvanam in Marathi) असे म्हणतात. 

एखादया वाक्यात किंवा परिच्छेदामध्ये वारंवार नामाचा उल्लेख येत असेल तर नामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी नामाऐवजी एक विशिष्ट शब्द वापरला जातो त्याला सर्वनाम असे म्हणतात. 

या सर्वनामांचा स्वतःचा असा विशिष्ट अर्थ नसतो. ते ज्या नामाऐवजी वापरले जातात त्या नामाचा अर्थ त्यांना प्राप्त होतो. 

महत्त्वाची गोष्ट म्हणजे एखाद्या सर्वनामांचा उपयोग करण्याआधी ते ज्या नामाची वापरले जाणार आहे त्याचा उल्लेख करणे आवश्यक असते. 

खालील उदाहरणावरून आपण अधिक समजून घेण्याचा प्रयत्न करू. 

पराग हुशार आणि अभ्यासू मुलगा आहे. परागला वाचनाची खूप आवड आहे. परागने आतापर्यंत वेगवेगळी ५० पुस्तके वाचली आहेत. 

वरील वाक्यांमध्ये पराग हे नाम वारंवार आले आहे. त्याऐवजी सर्वनामांचा वापर करू. 

पराग हुशार आणि अभ्यासू मुलगा आहे. त्याला वाचनाची खूप आवड आहे. त्याने आतापर्यंत वेगवेगळी ५० पुस्तके वाचली आहेत. 

येथे आपण पराग या नामाऐवजी त्याला, त्याने हि सर्वनामे वापरली. 

आता आपण सर्वनामाचे प्रकार पाहू. 

आणखी वाचा : नाम आणि नामाचे प्रकार

सर्वनामाचे प्रकार (Sarvanam Va Tyache Prakar)

सर्वनामाचे एकूण सहा प्रकार पडतात ते पुढीलप्रमाणे. 

१) पुरुषवाचक सर्वनाम

२) दर्शक सर्वनाम

३) संबंधी सर्वनाम

४) प्रश्नार्थक सर्वनाम

५) सामान्य सर्वनाम/ अनिश्चित सर्वनाम

६) आत्मवाचक सर्वनाम

आणखी वाचा : विशेषण व त्याचे प्रकार

१. पुरुषवाचक सर्वनाम 

आपले संभाषण किंवा लिखाण हे साधारणतः तीन घटकांमध्ये होते १. स्वतःविषयी बोलणारे २. ज्याच्याशी बोलतो ते ३. ज्यांच्याविषयी बोलतो ते 

यांवरून पुरुषवाचक सर्वनामाचे तीन उपप्रकार पडतात. 

अ) प्रथमपुरुषवाचक सर्वनाम

आ) द्वितीयपुरुषवाचक सर्वनाम

इ) तृतीयपुरुषवाचक सर्वनाम 

अ) प्रथमपुरुषवाचक सर्वनाम :

अशी सर्वनामे ज्यांचा उपयोग आपण स्वतःविषयी बोलताना किंवा लिहिताना करतो त्यांना प्रथमपुरुषवाचक सर्वनामे असे म्हणतात. 

उदा. मी, स्वतः, मला, आम्ही, माझा, आमचे, आपण इ.

वाक्यात उपयोग : 

१. मला पोहायला आवडते. 

२. मी खूप खुश आहे. 

आणखी वाचा : क्रियाविशेषण अव्यय व त्याचे प्रकार

आ) द्वितीयपुरुषवाचक सर्वनाम :

अशी सर्वनामे ज्यांचा उपयोग आपण समोर बोलणाऱ्या व्यक्तीचा उल्लेख करण्यासाठी करतो त्यांना द्वितीयपुरुषवाचक सर्वनामे असे म्हणतात. 

उदा. तू, तुला, तुझा, तुम्ही, तुमचे, आपण इ.

वाक्यात उपयोग : 

१. तुला कोणीतरी हाक मारत होता. 

२. तुमच्या मुलाची तब्येत कशी आहे?

इ) तृतीयपुरुषवाचक सर्वनाम : 

अशी सर्वनामे ज्यांचा उपयोग त्रयस्थ व्यक्ती किंवा वस्तू यांचा उल्लेख करण्यासाठी केला जातो त्यांना तृतीयपुरुषवाचक सर्वनामे असे म्हणतात. 

उदा. तो, त्या, ती, ते, त्यांचे, त्यांना, त्याला इ.

वाक्यात उपयोग : 

१. तो खूप हुशार मुलगा आहे. 

२. त्यांचे खूप वाईट झाले. 

आणखी वाचा : शब्दयोगी अव्यय व त्याचे प्रकार

२. दर्शक सर्वनाम

अशी सर्वनामे ज्यांचा उपयोग जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी केला जातो त्यांना दर्शक सर्वनामे असे म्हणतात. 

उदा. हा, हि, हे, तो, ती, ते इ. 

वाक्यात उपयोग : 

१. हा दगड येथे कोणी आणला?

२. ते घर खूप छान आहे. 

३. संबंधी सर्वनाम

अशी सर्वनामे ज्यांचा उपयोग वाक्यात पुढे येणाऱ्या दर्शक सर्वनामाशी संबंध दर्शवण्यासाठी केला जातो त्यांना संबंधी सर्वनामे असे म्हणतात. 

उदा. जो, जी, जे ज्या इ. 

वाक्यात उपयोग : 

१. जे पेराल ते उगवेल.

२. जो अभ्यास करेल तो पास होईल. 

आणखी वाचा : उभयान्वयी अव्यय व त्याचे प्रकार

४. प्रश्नार्थक सर्वनाम

अशी सर्वनामे ज्यांचा उपयोग वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी केला जातो त्यांना प्रश्नार्थक सर्वनामे असे म्हणतात. 

उदा. कोण, कोणी, काय, कोणास, कोणाला, किती, कोणाचा इ.

वाक्यात उपयोग : 

१. हा कोणाचा डबा आहे? 

२. तू काय खाल्लस?

आणखी वाचा : केवल प्रयोगी अव्यय व त्याचे प्रकार

५. सामान्य सर्वनाम/ अनिश्चित सर्वनाम

अशी प्रश्नार्थक सर्वनामे जी वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी न येता ती कोणत्या नामाबद्दल आली आहेत हे निश्चित सांगता येत नाही त्यांना सामान्य सर्वनामे किंवा अनिश्चित सर्वनामे असे म्हणतात. 

उदा. कोण, काय इ. 

वाक्यात उपयोग :

१. कोणी कोणावर हसू नये. 

२. काय ती गर्दी!

६. आत्मवाचक सर्वनाम

अशी सर्वनामे ज्यांचा उपयोग आपण स्वतः किंवा इतर स्वतः या अर्थाने मूळ नाम किंवा सर्वनामानंतर केला जातो त्यांना आत्मवंचक सर्वनामे असे म्हणतात. 

उदा. आपण, स्वतः इ. 

वाक्यात उपयोग :

१. मी स्वतः हे अनुभवलं आहे. 

२. तू स्वतः हे करून बघ.

आणखी वाचा : शब्दांच्या जाती

सर्वनामांविषयी अधिक माहिती 

काही सर्वनामांमध्ये वचन आणि लिंग यानुसार बदल होतो. 

वचनानुसार बदलणारी सर्वनामे :

मी : आम्ही
तू : तुम्ही
तो : तो, ती, ते (एकवचनी) ती, ते, त्या (अनेकवचनी)
हा : हा, ही, हे (एकवचनी) ही, हे, ह्या (अनेकवचनी)
जो : जो, जी, जे (एकवचनी) जी, जे, ज्या (अनेकवचनी)

लिंगानुसार बदलणारी सर्वनामे :

तो : तो, ती, ते
हा : हा, ही, हे
जो : जे, जो, जी

वाचकहो सर्वनाम व त्याचे प्रकार (Sarvanam Va Tyache Prakar) हि माहिती आपल्याला कशी वाटली हे आम्हांला कंमेंटद्वारे जरूर कळवा. माहिती आवडल्यास नक्की शेअर करा.

Previous

शब्दांच्या जाती । Shabdanchya Jati in Marathi

विशेषण व त्याचे प्रकार । Visheshan Va Tyache Prakar

Next

Leave a Comment