तंबाखूचा वापर टाळण्यासाठी सामाजिक स्तरावर शिक्षकांची भूमिका

| | , ,

तंबाखूचे सेवन आणि त्यामुळे उद्धभवणाऱ्या आरोग्य समस्या हा भारतासमोरील गंभीर प्रश्न आहे. सुमारे १४० कोटी लोकसंख्येच्या भारत देशात तब्बल २६.७ कोटी प्रौढ लोक तंबाखू सेवन करतात. हे प्रमाण एकूण प्रौढ लोकसंख्येच्या सुमारे २९% इतके आहे. 

तंबाखूचा वापर केल्याने हृदयरोग, कर्करोग, पक्षाघात, श्वसनसंस्थेचे आजार, मधुमेह, अल्झायमर, पार्किन्सन, अस्थमा, एकाग्रता कमी होणे, स्मृतिभ्रंश, चिंता, नैराश्य, दात खराब होणे, त्वचेचे आजार, ऍलर्जी, इत्यादी अनेक आरोग्य समस्या होऊ शकतात. 

तंबाखूचा वापर केल्याने दरवर्षी जगभरात सुमारे ८० लाख लोकांचा मृत्यू होतो. भारतातही तंबाखूच्या सेवनामुळे प्रत्येक वर्षी १३.५ लाख लोकांचा मृत्यू होतो. एकूण लोकसंख्येच्या तुलनेत हे प्रमाण अत्यल्प वाटत असले तरी तंबाखूच्या सेवनामुळे उद्धभवणाऱ्या समस्यांमुळे भारताला आरोग्य यंत्रणेवर प्रचंड खर्च करावा लागतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार २०१७-१८ या आर्थिक वर्षात तंबाखूच्या सेवनामुळे उद्धभवणाऱ्या आजारांमुळे भारताला तब्बल १७७३४१ कोटी रुपये खर्च करावा लागला होता. त्यामुळे सद्यस्थितीत होणाऱ्या खर्चाची कल्पना न केलेलीच बरी.  

तंबाखूचा वापर टाळून ही रक्कम अन्य विधायक कामांसाठी वापरली जाऊ शकते आणि भारताला विकासाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकता येऊ शकेल. 

आर्थिक बाब वगळता तंबाखूसेवनाचे खूप सामाजिक दुष्परिणाम संभवतात. आरोग्य समस्यांसोबतच  समाजात व्यसनाधीनता वाढते. तंबाखू सेवन करणाऱ्या व्यक्तींना जेव्हा तलफ येते, तेव्हा त्यांचे इतर कामांमध्ये मन लागत नाही. त्यांची आकलनक्षमता आणि पर्यायाने निर्णयक्षमतासुद्धा फार मोठ्या प्रमाणावर कमजोर होते. तंबाखू सेवन करणाऱ्या व्यक्ती पुढे जाऊन मावा, गुटखा, सिगारेट, दारू, आणि इतर अंमली पदार्थांच्या आहारी जाण्याची दाट शक्यता असते. 

या सर्वांचा घरातील इतर सदस्यांवरदेखील विपरीत परिणाम होतो, विशेषतः शाळकरी व महाविद्यालयीन मुले आपल्या पालकांचे, वडीलधारी माणसे व समाजातील इतर व्यक्तींचे अंधानुकरण करत व्यसनाधीनतेचा जाळ्यात अडकण्याची भीती निर्माण होते. या संस्कारक्षम वयात योग्य मार्गदर्शन न मिळाल्यास हे दुष्टचक्र पिढ्यानपिढ्या चालूच  राहील. 

आम्ही स्थानिक भागात केलेल्या सर्वेक्षणांनुसार तंबाखूची पुडी, विडी-सिगारेट, आणि तत्सम तंबाखुजन्य पदार्थांची उपलबद्धता फार मोठ्या प्रमाणावर आहे. शहरी भागातच नव्हे तर ग्रामीण भागातही या गोष्टी सहजतेने मुलांच्या हाती लागू शकतात. शिवाय मद्य आणि ड्रग्स-सारख्या अंमली पदार्थांच्या तुलनेत तंबाखूजन्य पदार्थांची किंमत खूप कमी असल्यामुळे शाळेतील व महाविद्यालयीन विद्यार्थीसुद्धा सहजतेने या गोष्टी खरेदी करू शकतात. दुर्दैवाने काही शाळा व महाविद्यालयांच्या आसपास असणाऱ्या टपरीवजा दुकानांवर तंबाखू पुडी आणि विडी-सिगारेट अशा गोष्टी दहा-वीस रुपयांना उपलब्ध असल्यामुळे विद्यार्थी या व्यसनांना सहजतेने बळी पडतात. यावर वेळीच उपाययोजना न केल्यास पुढील पिढी व्यसनाधीन होऊन कायमची  बरबाद होण्याचा धोका संभवतो. 

रस्त्यावरील कामगार, भटक्या जमाती, भिकारी, आणि इतर मागास प्रवर्गातील अशिक्षित मुलांकडे पाहिले की ही गोष्ट प्रकर्षाने जाणवते. या तंबाखूच्या वापराला अनेक घटक कारणीभूत आहेत. त्यामध्ये शिक्षणाचा अभाव, कमालीची गरिबी, बेरोजगारी, सामाजिक उदासीनता, प्रबोधनाची कमतरता आणि समवयस्क मित्रांकडून तंबाखूजन्य पदार्थ सेवनासाठी दबाव इत्यादी गोष्टींचा समावेश होतो. गरीब व अशिक्षित मजूर कुटुंबांमध्ये तंबाखू सेवन ही सामान्य गोष्ट असल्याचे आढळते. प्रचंड शारीरिक काम व त्यामुळे येणारा शारीरिक व मानसिक तणाव यांपासून तात्पुरती सुटकेसाठी तंबाखू व तत्सम पदार्थांचे सेवन हा सर्वांत सोपा व कमी खर्चिक पर्याय म्हणून पाहिला जातो. काही व्यक्तींना तंबाखू किंवा मशेरी यांची इतकी सवय होते की या गोष्टींच्या सेवनाशिवाय त्यांचे कामात अजिबात मन लागत नाही. काही लोकांना तर तंबाखू खाल्ल्याशिवाय किंवा मशेरी लावल्याशिवाय शौचासही होत नाही. 

अशा व्यसनांमुळे आर्थिक नुकसान होते ते वेगळेच. दिवसाकाठी २००-३०० रुपये कमावणाऱ्या कुटुंबात जर ५०-१०० रुपये तंबाखू, विडी सिगारेट किंवा तत्सम पदार्थांसाठी खर्च होत असतील तर शिक्षण व आरोग्य यांसारख्या मूलभूत गोष्टींकडे दुर्लक्ष होण्याची दाट शक्यता असते. परिणामी गरिबीचे दुष्टचक्रही कायम सुरु राहते. 

जनमानसातील तंबाखूची सवय मोडून काढण्यासाठी सरकार व आरोग्य यंत्रणा प्रयत्नशील असली तरीही हवी तितकी जनजागृती झालेली अजून दिसून येत नाही. तंबाखूचे दुष्परिणाम या विषयांवर रंगवलेल्या भित्तिचित्रांवरच तंबाखू व गुटखा खाऊन थुंकल्याचे आपल्याला खूप ठिकाणी दिसून येते. अशाप्रकारे सरकारी आरोग्य यंत्रणेकडून केला जाणारा खर्च वाया जातो. 

समाजातील एकंदरीत तंबाखू व्यसनाचे प्रमाण पाहिले की तंबाखूचे उत्पादन विक्री व सेवन इत्यादींविषयी कायदे व नियम खूप शिथिल असल्याचे जाणवते. शिवाय सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने (जाहिरातीस प्रतिबंध आणि व्यापार व वाणिज्य व्यवहार आणि उत्पादन, पुरवठा व वितरण यांचे विनियमन) अधिनियम, २००३ आणि इतर अंमली पदार्थांच्या संबंधित कायद्याची व्याप्ती व त्याची होणारी अंमलबजावणी पाहता तंबाखू पूर्णतः हद्दपार करण्यासाठी खूप मेहनत करावी लागेल. जेणेकरून आपल्या पंतप्रधानांची ‘आयुष्मान भारत’ ही संकल्पना साकार होण्यास मदत होईल. या उद्दात हेतूनेच तंबाखूचा वापर टाळण्यासाठी शासकीय आणि सामाजिक स्तरावरही अनेक प्रयत्न केले जात आहेत. या प्रयत्नांमध्ये आरोग्य कर्मचारी, शिक्षक आणि विद्यार्थी यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. 

सरकार व आरोग्य यंत्रणा तंबाखूजन्य पदार्थांच्या वापरामुळे समाजावर होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी सदोदित कार्यरत असते. डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, आणि आरोग्ययंत्रणेचे इतर घटक आपापल्या परीने या गोष्टी विरुद्ध लढा देत असतात. परंतु या समस्येला समूळ नष्ट करण्यासाठी शिक्षण व सामाजिक उद्बोधन यांचा प्रामुख्याने वापर करणे क्रमप्राप्त आहे.

या सर्व प्रक्रियेमध्ये शिक्षक हा अत्यंत महत्वाचा घटक आहे. खरंतर शिक्षक समाजाचे प्रणेते असतात. ते विद्यार्थ्यांना ज्ञानदान करतात, विविध जीवनमूल्ये शिकवतात आणि सुजाण नागरिक घडवण्यास मदत करतात. त्यामुळेच तंबाखूचा वापर टाळण्यासाठी शिक्षक विद्यार्थ्यांना व इतर सामाजिक घटकांना तंबाखूच्या धोक्यांबद्दल विस्तृत माहिती देऊ शकतात. ते विद्यार्थ्यांना तंबाखूच्या सेवनाने होणारे आजार, तंबाखूच्या व्यसनातून मुक्त होण्यासाठीचे उपाय इत्यादी गोष्टींबद्दल सांगू शकतात. शिक्षक तंबाखूच्या सेवनाला प्रतिबंध करण्यासाठीच्या सरकारी कायद्यांबद्दल व उपक्रमांबद्दल विद्यार्थ्यांना माहिती देऊ शकतात. शिवाय विद्यार्थ्यांना तंबाखू सेवनाच्या व्यसनातून मुक्त होण्यासाठी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या मदत करू शकतात. ते विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना तंबाखू सोडण्याची प्रेरणा देऊ शकतात आणि विविध तंबाखू सोडण्यासाठीच्या उपाययोजनांबद्दल माहिती देऊ शकतात. शिवाय ते व्यसनाधीन विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना तंबाखू सोडण्यासाठीच्या समुपदेशन कार्यक्रमात सहभागी होण्यास प्रोत्साहित करू शकतात. 

जोपर्यंत तंबाखूला पर्याय उपलब्ध होत नाही तोपर्यंत व्यसनाधीन व्यक्ती तंबाखू सोडण्याची शक्यता फार कमी असते, अशा वेळी समुपदेशनासोबतच आवश्यक असल्यास वैद्यकीय साहाय्य घेणे गरजेचे असते. त्यामुळे अचानक तंबाखू सोडल्यामुळे होणाऱ्या मानसिक आजारांची तीव्रता व लक्षणे कमी करण्यास मदत होते. घरगुती पातळीवर बडीशेप, विशिष्ट प्रकारचे मुखवास, किंवा चोखून खायच्या गोळ्या यांचा वापर करून तंबाखू सेवनाचे प्रमाण कमी करता येईल.

याखेरीज शिक्षक तंबाखूविरुद्ध मोठ्या प्रमाणावर जनजागृती करू शकतात. ते तंबाखू सेवनामुळे उदभवणाऱ्या धोक्यांबद्दलच्या पोस्टर्स, बॅनर्स, जाहिराती इत्यादी माध्यमांचा प्रभावी वापर करू शकतात. शिक्षक तंबाखूविरुद्धच्या पथनाट्य, एकपात्री, आणि प्रभातफेरी (रॅली) अशा सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करू शकतात. तसेच विद्यार्थ्यांना या विषयासंबंधित चित्रकला व रांगोळी स्पर्धा इत्यादी कार्मक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करू शकतात. बऱ्याच शाळा व महाविद्यालयांमध्ये शैक्षणिक कार्यक्रमांसाठी प्रोजेक्टरची व्यवस्था असते. शालेय प्रशासनाला विनंती करून विद्यार्थ्यांसाठी प्रोजेक्टरवर तंबाखूविरोधी उद्बोधन करणाऱ्या चित्रफिती व ॲनिमेशन दाखवले जाऊ शकतात.

आजकालच्या चित्रपटांच्या सुरुवातीला तंबाखूसेवन व धूम्रपान कशाप्रकारे मानवी जीवनावर दुष्परिणाम करतात यासाठी ‘त्या कर्करोग झालेल्या मुकेशची बिकट अवस्था दाखवणारी’ चित्रफीत दाखवली जाते, जेणेकरून प्रेक्षक अशा व्यसनांपासून स्वतःला व कुटुंबाला दूर ठेवू शकतील. पण त्यानंतर दाखवल्या जाणाऱ्या चित्रपटात नायक किंवा खलनायकच सर्रास सिगारेट ओढताना दिसून येतो. यापेक्षा अतिशयोक्ती ती कोणती असावी? चित्रपट पाहणारे प्रेक्षक विशेषतः लहान मुले अशा गोष्टींचे अनुकरण करण्यात पटाईत असतात. त्यामुळे शिक्षकांनी पालकांना याबाबत विशेष सूचना देणे गरजेचे आहे. जेणेकरून पालक आपल्या मुलांना असे चित्रपट पाहायला अनुमती देणार नाहीत.  

पालकांव्यतिरिक्त शिक्षक विद्यार्थ्यांच्या समवेत खूप वेळ व्यतीत करतात. त्यामुळे प्रत्येक मुलाची नस अन नस त्यांना ठावूक असते. अशा वेळी शिक्षक विद्यार्थ्यांचे चांगले मित्र बनून एक सुरक्षित व व्यसनमुक्त शालेय वातावरण तयार करू शकतात. याशिवाय मुलांची ऊर्जा क्रीडा, शारीरिक कवायती, हरितसेनेसारखे उपक्रम, आणि इतर विधायक कार्यांमध्ये वापरू शकतात. ज्यामुळे मुले फक्त व्यसनमुक्तच नव्हे तर शारिरीक, मानसिक, व भावनिक दृष्ट्या कणखर व निरोगी राहतील आणि भविष्यात येणाऱ्या आव्हानांना सहज सामोरे जातील.

या सर्व गोष्टी ठीक आहेत परंतु शिक्षकांनी स्वतः तंबाखू किंवा तत्सम पदार्थांचे सेवन करणे टाळले पाहिजे. आई वडिलांनंतर शिक्षक हे विद्यार्थ्यांसाठी आदर्श असतात. त्यांच्यामध्ये एक संपूर्ण पिढी घडवण्याची किंवा बिघडवण्याची क्षमता असते. त्यांचे अनुकरण विद्यार्थी करत असतात. जर त्यांना चुकीची प्रेरणा व मार्गदर्शन मिळू नये असे मनोमन वाटत असेल तर शिक्षकांनी स्वतःपासूनच सुरुवात केली पाहिजे व तंबाखूच्या व्यसनापासून स्वतःला दूर केले पाहिजे. त्यामुळे विद्यार्थ्यांना तंबाखूचा वापर करणे टाळण्यासाठी प्रेरणा मिळेल.

पूर्वी शाळेतील शिक्षकांचा आदरयुक्त वचक विद्यार्थी व पालकांवर असायचा. त्यामुळे बहुतांश मुले व त्यांचे पालक शाळेच्या प्रांगणात तसेच इतरवेळीसुद्धा तंबाखू व इतर व्यसनांपासून दूर राहत असत. परंतु आजकाल मुलांचे व्यसन व त्याचे कारणीभूत घटक ही फक्त पालकांची जबाबदारी आहे अशी भूमिका घेत काही शैक्षणिक संस्था व शिक्षक अशा बाबींकडे दुर्लक्ष करताना दिसून येतात. त्यामुळे मुले विद्यार्थीदशेतच अशा व्यसनांना बळी पडण्याचा फार मोठा धोका संभवतो. त्यामुळे शिक्षकांनी या विषयाला आळा घालण्यासाठी स्वतःहून पुढाकार घेतला पाहिजे आणि आपला एकही विद्यार्थी चुकीचे वर्तन करणार नाही याची खातरजमा केली पाहिजे. 

शिक्षक-पालक सभेमध्येसुद्धा व्यसनमुक्ती हा विषय अंतर्भूत करता येई शकतो. खेड्यापाड्यात विशेषतः जेथे मद्यपान व तंबाखू सेवनाचे प्रमाण जास्त आहे, अशा ठिकाणी हा विषय खूप सुंदररित्या राबवता येऊ शकतो. शिक्षक, पालक, आणि विद्यार्थी यांच्या संयुक्त प्रयत्नांनी तंबाखू व्यसन हद्दपार करता येईल. 

शाळेत किंवा महाविद्यालयात होणाऱ्या स्नेहसंमेलन कार्यक्रमांतही तंबाखू व्यसनमुक्तीवर एखादी नाटिका, एकपात्री, पोवाडा, किंवा लोकगीत सादर करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले जाऊ शकते. ३१ मे  हा जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो. यादिवसाचे औचित्य साधून अनेक सामाजिक प्रबोधन करणारे कार्यक्रम, प्रदर्शन, किंवा प्रभातफेरीसारखे उपक्रम राबवता येऊ शकतात.

जागतिक आरोग्य संघटनेने केलेल्या २००९ च्या जागतिक युवा तंबाखू सर्वेक्षणाच्या आकडेवारीनुसार भारतातील १३ते १५ वयोगटातील १० पैकी १ विद्यार्थी तंबाखू किंवा तत्सम व्यसनांना बळी पडलेला आढळला. संत तुकाराम महाराज, महात्मा गांधी, गाडगेबाबा यांसारख्या महान विभूती जेथे जन्मल्या त्या भारतात अशा गीष्टी घडणे खरंच दुर्दैवी आहे. त्यामुळे ही परिस्थिती अधिक ढासळण्यापूर्वीच केवळ तंबाखू आणि सिगारेटच नव्हे तर इतर अंमली पदार्थ आणि इ-सिगारेट (वेप्स) यांचे आकर्षण मुलांमध्ये निर्माण होणार नाही याची काळजीसुद्धा शिक्षकांनी घेणे अत्यंत गरजेचे आहे. आजकाल या गोष्टी ऑनलाईन खरेदीच्या माध्यमातून विकत घेणे सहन शक्य असल्यामुळे व्यसनाची परिभाषा व व्याप्ती जाणून घेऊन यावर प्राथमिक अवस्थेतच प्रतिबंध घालणे महत्त्वाचे आहे.   

शिक्षकांची भूमिका शाळेत विद्यार्थ्यांना शिकवण्यापुरती मर्यादित नसते तर एक उज्ज्वल प्रतिभावान पिढी घडवण्याचे सामर्थ्य त्यांच्यात असते. त्यामुळे शाळेबाहेर गावांत, वाडीवाडीत आणि घराघरांत प्रबोधन करण्यासाठी ते कंबर कसू शकतात. ग्रामसभा, मंदिरे, बाजार, किंवा गावातील जत्रा अशा ठिकाणी खूप लोक एका वेळेला उपस्थित असतात. अशा ठिकाणी सरपंच किंवा त्या प्रशासकीय कार्यक्षेत्राचा प्रमुख यांची परवानगी घेऊन लोकप्रबोधनाचे कार्यक्रम करणेदेखील शक्य आहे. ग्रामसभेमध्ये तंबाखूसेवनाचे दुष्परिणाम, त्यामुळे होणारे कॅन्सरसारखे गंभीर जीवघेणे आजार, तंबाखूविरोधी सरकारी कार्यक्रम इत्यादींविषयी मार्गदर्शन केले जाऊ शकते. शिक्षकांचे समाजात मानाचे स्थान असते. त्यामुळे अशा कार्यक्रमांचा खूप चांगला प्रभाव गावातील लोकांवर होतो व तंबाखू विरोधी मोहिमेत यश येण्याची शक्यता वाढते. 

याशिवाय सरपंच व इतर प्रतिष्ठित व्यक्तींना सोबत घेऊन गावात विशेषतः शाळेच्या परिसरात तंबाखू व सिगरेटसारखे पदार्थ विकणाऱ्या दुकानदारांचे समुपदेशन केले जाऊ शकते. तंबाखू सारख्या वस्तूंमध्ये नफ्याची टक्केवारी इतर वस्तूंपेक्षा जास्त असल्यामुळे व ग्राहकांमध्ये प्रचंड मागणी असल्यामुळे सहसा दुकानदार अशा समुपदेशनाला न जुमानता त्यांचा तंबाखूजन्य पदार्थ विक्रीचा व्यवसाय सुरू ठेवतात. परंतु अशा पदार्थांचे मुलांवर पर्यायाने समाजावर होणारे दुष्परिणाम जर शिक्षक योग्य रीतीने पटवून देऊ शकले, तर अशा वस्तूंच्या विक्रीला अंशतः किंवा पूर्णतः प्रतिबंध घालता येऊ शकेल. 

आरोग्य विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या अनेक कार्यक्रम तसेच प्रशिक्षण साठी शिक्षकांनी जास्तीत जास्त उपस्थित राहून तो संदेश समाजापर्यंत पोहचवला पाहिजे. सरकारच्या तंबाखू विरोधी कार्यक्रमामध्ये शैक्षणिक संस्था विशेषतः शिक्षक हा महत्वाचा घटक आहे. कारण सरकारी आरोग्य यंत्रणा आणि तळागाळातील सामान्य जनता यांमधील शिक्षक हा महत्त्वाचा दुवा आहे. समाजातील अनेक व्यक्तींना तंबाखू संबंधित जनजागृती करणाऱ्या उपक्रम व व्यसनमुक्ती योजनांविषयी माहितीच नसते. अशावेळी जर कोणाला स्वतःहून तंबाखू किंवा सिगारेटचे व्यसन सोडायचे असेल तर शिक्षक महत्त्वाची सामाजिक भूमिका पार पडू शकतात. ज्या व्यक्तींना तंबाखूपासून कायमचे दूर जायचे आहे अशा व्यक्तींना ते समुपदेशन आणि पुनर्वसन यांसारख्या गोष्टींमध्ये मदत करू शकतात. 

सद्यस्थितीत आपल्या समाजात तंबाखू, सिगारेट आणि अन्य मादक पदार्थांच्या वापर व दुरुपयोगाच्या धोक्याची तीव्रता नाटकीयरित्या वाढत आहे आणि ती खूपच चिंताजनक आहे. म्हणूनच या संकटाचा प्रतिकार करण्यासाठी पद्धतशीर आणि वैज्ञानिक दृष्टीकोन आवश्यक आहे. तंबाखू वापराला आळा घालण्यासाठी लोकसहभाग-आधारित हस्तक्षेप, एक बहुआयामी दृष्टीकोन आणि धोरणे आखली जाणे आवश्यक आहे.

आजकाल समाजामध्ये जनजागृती करण्यासाठी भारत सरकारच्या आरोग्य विभागाने राष्ट्रीय तंबाखू मुक्ती टोल फ्री क्रमांक (१८००-११-२३५६) सुरु केला आहे. परंतु फारच कमी लोकांना याबाबत माहिती असते. आरोग्य कर्मचारी याबद्दल जनजागृती करण्यासाठी खूप मेहनत घेतात परंतु शिक्षक या प्रक्रियेला गती देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य पार पाडू  शकतात. खूप कमी लोक आपल्याला तंबाखू सोडायचा आहे असे उघडपणे मित्रपरिवारासोबत कबूल करून त्यादिशेने स्वतः प्रयत्न करतात, मात्र आपली खिल्ली उडवली जाईल किंवा चेष्टा होईल या मानसिक दडपणाखाली अनेक जण  तंबाखू सोडण्याचा विचार मनातूनच काढून टाकतात. परंतु शिक्षकांनी योग्य मार्गदर्शन केले तर असे कित्येक युवक-युवती व्यसनाच्या सापळ्यातून बाहेर पडून सुखी व निरोगी आयुष्य व्यतीत करू शकतील. 

सरकारी उच्चस्तरावर नीतीविषयक बदल करून तंबाखूवरील कर वाढवणे, तंबाखूजन्य पदार्थांच्या जाहिरातींवर बंधने आणणे, कायद्यामध्ये बदल करून अजून कठोर नियम व अटी अंतर्भूत करणे आणि प्रत्यक्षात त्यांची अंमलबजावणी होईल यासाठी विशेष गतिमान प्रणाली विकसित करणे यांसारख्या गोष्टी करणे सरकारला शक्य आहे. परंतु जोपर्यंत तंबाखू लॉबी कार्यरत आहे आणि तंबाखू खाणे लोक स्वतःहून बंद करत नाहीत तोपर्यंत तंबाखू सेवन व त्यामुळे होणाऱ्या आजारांमुळे कित्येक जण मृत्युमुखी पडत राहणारच. 

तंबाखूचा वापर सामान्यत: पौगंडावस्थेत सुरू होतो आणि प्रौढ जीवनात चालू राहतो, याचा अर्थ असा की तंबाखूच्या वापराचे अनेक भविष्यातील बळी आजची मुले आहेत. शाळा-आधारित कार्यक्रमांमध्ये तंबाखू प्रतिबंधासाठी व्यापक आणि अधिक शक्तिशाली दृष्टीकोन असण्याची शक्यता आहे. शिक्षकांनी महत्त्वाची सामाजिक भूमिका बजावत त्यांच्या विद्यार्थ्यांमधील तंबाखूचा वापर प्रभावीपणे प्रतिबंधित करण्यासाठी आणि कमी करण्यासाठी योग्य वेळीच काही पावले उचलली तर त्याचा विद्यार्थ्यांच्या वर्तमान आणि भविष्यातील आरोग्य आणि कल्याणावर मोठा प्रभाव पडू शकतो.

लहानपणापासूनच जर तंबाखूविरोधात मार्गदर्शन मिळाल्यास पुढची पिढी या व्यसनांपासून दूर जाईल व एक प्रतिभावान, निरोगी भारत उदयास येईल. या सर्वांमध्ये शिक्षकांची भूमिका महत्त्वाची आहे हे निश्चित. परंतु याशिवाय आपण सर्वानीसुद्धा एकत्र येऊन तंबाखूमुक्त भारत देशासाठी एक प्रतिज्ञा आजपासून केली पाहिजे, “नकार द्या तंबाखूला, आधार द्या कुटुंबाला!”

Previous

लिंग व त्याचे प्रकार । Ling v Tyache Prakar

Leave a Comment