या लेखात आपण वचन व त्याचे प्रकार (Vachan v Tyache Prakar) याबद्दल सविस्तर माहिती पाहू.
आपण मराठी व्याकरणातील पुढचा महत्त्वाचा घटक म्हणजे “वचन” पाहणार आहोत. जसे नामाच्या रुपावरुन एखाद्या गोष्टीचे लिंग समजते त्याचप्रमाणे ती गोष्ट एक आहे कि एकापेक्षा अधिक आहे हे देखील कळते. मराठी व्याकरणातील नामाच्या ठिकाणी संख्या सुचवण्याच्या धर्माला वचन असे म्हणतात.
वचन व त्याचे प्रकार (Vachan v Tyache Prakar)
सर्वसामान्यपणे वचनाचे दोन प्रकार पडतात.
१. एकवचन
२. अनेकवचन
१. एकवचन
जेव्हा नामाच्या रुपावरुन ती व्यक्ती किंवा वस्तू एकच आहे असा बोध होतो तेव्हा त्याला एकवचन असे म्हणतात.
उदाहरणार्थ: आंबा, फळा, मुलगा, इमारत, गाय, पट्टी, इत्यादी.
२. अनेकवचन
जेव्हा नामाच्या रुपावरुन ती व्यक्ती किंवा वस्तू एकापेक्षा अधिक आहेत असा बोध होतो तेव्हा त्याला अनेकवचन असे म्हणतात.
उदाहरणार्थ: आंबे, मुलगे, इमारती, गायी, पट्ट्या, फळे इत्यादी.
वचन बदल
जेव्हा एखाद्या एकवचनी नामाचे रुपांतर अनेकवचनी नामात केले जाते किंवा याउलट अनेकवचनी नामाचे रुपांतर एकवचनी नामात केले जाते तेव्हा त्या नामाच्या बदलास वचन बदल असे म्हणतात.
उदाहरणार्थ : १. पुस्तक (एकवचन) – पुस्तके (अनेकवचन)
२. साडया (अनेकवचन) – साडी (एकवचन)
अशाप्रकारे वचन बदल करत असताना काही महत्त्वाचे नियम लक्षात घ्यावे लागतात.
वचन बदला संबंधीचे नियम (Singular Plural in Marathi)
१. पुल्लिंगी नामाचे अनेकवचन :
नियम १:
आ’ कारान्त पुल्लिंगी नामाचे अनेकवचन ‘ए’ कारान्त मध्ये होतात :
उदाहरणार्थ: मुलगा – मुलगे
मासा – मासे
ससा – ससे
फळा – फळे
रस्ता – रस्ते
नियम २
‘आ’ कारान्त शिवाय इतर सर्व पुल्लिंगी नामाची रुपे दोन्ही वचनात समान असतात.
उदाहरणार्थ: बैल – बैल
कवी – कवी
वाघ – वाघ
न्हावी – न्हावी
सुतार – सुतार
२. स्त्रीलिंगी नामाचे अनेकवचन :
नियम १
‘अ’ कारान्त स्त्रीलिंगी नामाचे अनेकवचन काही वेळा ‘आ’ कारान्त तर काही वेळा ‘ई’ कारान्त होते.
उदाहरणार्थ: चूक – चुका
गाय – गायी
वीट – विटा
वात – वाती
चिंच – चिंचा
नियम २
‘आ’ कारान्त स्त्रीलिंगी तत्सम नामांचे अनेकवचन एक वचनासारखेच असते.
उदाहरणार्थ : सभा – सभा
भाषा – भाषा
विद्या – विद्या
कला – कला
दिशा – दिशा
नियम ३
‘ई’ कारान्त स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन ‘या’ कारान्त होते.
उदाहरणार्थ : स्त्री – स्त्रिया
गाडी – गाड्या
बी – बिया
वाटी – वाट्या
साडी – साडया
नियम ४
‘ऊ’ कारान्त स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन ‘वा’ कारान्त होते.
उदाहरणार्थ : सासू – सासवा
जाऊ – जावा
पिसू – पिसवा
ऊ – ऊवा
३. नपुसकलिंगी नामाचे अनेकवचन :
नियम १
‘अ’कारान्त नपुसकलिंगी नामाचे अनेकवचन ‘ए’कारान्त होते.
उदाहरणार्थ : शेत – शेते
फुल – फुले
पुस्तक – पुस्तके
झाड – झाडे
नियम २
‘उ’कारान्त नपुसकलिंगी नामाचे अनेकवचन ‘ए’कारान्त होते.
उदाहरणार्थ : वासरू – वासरे
पाखरू – पाखरे
नियम ३
‘ए’कारान्त नपुसकलिंगी नामाचे अनेकवचन ‘इ’कारान्त होते.
उदाहरणार्थ : गाणे – गाणी
खेडे – खेडी
वाचकहो वचन व त्याचे प्रकार (Singular Plural in Marathi) याबद्दलची हि माहिती आपल्याला कशी वाटली हे आम्हांला कंमेंटद्वारे जरूर कळवा. माहिती आवडल्यास आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये नक्की शेअर करा.