विराट कोहली बायोग्राफी (Virat Kohli Biography)
विराट कोहली…असा एकही भारतीय नसेल ज्याला विराट कोहली हे नाव माहित नसेल किंवा त्याला खेळताना पाहिलं नसेल.
भारतीय संघाचा कर्णधार आणि एक उत्कृष्ट दर्जाचा फलंदाज म्हणून त्याचा नावलौकिक आहे.
यासोबतच दिसायला देखणा आणि कामगिरीत सातत्य यामुळे भारतीयांच्या मनावर तो अधिराज्य करत आहे.
वरच्या फळीतील उजव्या हाताच्या या फलंदाजाने जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रम यांच्या जोरावर काहीही साध्य करता येऊ शकते हे दाखवून दिले आहे. (Virat Kohli Biography in Marathi, Cricket Career, Records, Awards, Full HD Photos, Wiki, Age, Height, Net Worth, Family)
खेळामध्ये सातत्य खूप महत्त्वाचे असते त्यामुळे आपल्या मैदानावरील कामगिरीत सातत्य राखण्यासाठी विराटने खूप मेहनत घेतली आहे आणि अनेक युवा खेळाडूंसमोर आदर्श ठेवला आहे.
आपल्या खेळातील दमदार प्रदर्शनाने अबाल-वृद्धांच्या मनात घर करून राहणारा हा खेळाडू युवा पिढीचा स्टाइल आयकॉन देखील आहे.
जगातीलसर्वोत्कृष्ट खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचे नाव घेतले जाते.
इंडियन प्रीमिअर लीग मध्ये विराट रॉयल चॅलेंजर्स बंगलोर कडून खेळतो तर २०१३ सालापासून तो रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाचा कर्णधार आहे.
२००८ साली मलेशिया येथे झालेली १९ वर्षे वयोगटाखालील विश्वचषक स्पर्धा भारताने जिंकली होती. विराट कोहली या संघाचा कर्णधार होता.
येथूनच विराट कोहली हे नाव पहिल्यांदा प्रकाशझोतात आले.
काही महिन्यातच वयाच्या १९ व्या वर्षी विराटला भारताच्या आंतरराष्ट्रीय संघाकडून खेळण्याची संधी मिळाली.
१८ ऑगस्ट २००८ रोजी श्रीलंकेविरुद्ध त्याने एकदिवसीय सामन्यांमध्ये पदार्पण केले.
सुरुवातीला राखीव फलंदाज म्हणून त्याला भारतीय संघात घेण्यात आले होते परंतु लवकरच त्याने मधल्या फळीतील फलंदाज म्हणून संघात आपले स्थान कायम केले.
२०११ साली विश्वविजेत्या ठरलेल्या भारतीय संघाचा तो एक महत्त्वाचा भाग होता.
सुरुवातीचे जीवन
विराट कोहलीचा जन्म ५ नोव्हेंबर १९८८ रोजी दिल्ली येथे एका पंजाबी हिंदू कुटुंबात झाला.
त्याचे वडील प्रेम कोहली हे वकील होते तर आई सरोज कोहली हि गृहिणी आहे.
विराटला एक मोठा भाऊ विकास कोहली आणि एक मोठी बहीण भावना आहे.
विराटच्या घरच्यांच्या म्हणण्यानुसार त्याने वयाच्या तिसऱ्या वर्षी क्रिकेट बॅट हातात घेतली आणि वडिलांना आपल्या दिशेने चेंडू फेकण्यास सांगू लागला.
कोहलीचे बालपण हे उत्तम नगर येथे गेले.
त्याचे शालेय शिक्षण विशाल भारती पब्लिक स्कूल (Vishal Bharti Public School) येथून झाले आहे.
१९९८ साली वेस्ट दिल्ली क्रिकेट अकॅडमी अस्तित्वात आली आणि ९ वर्षाचा विराट कोहली हा या अकॅडमीच्या पहिल्या तुकडीचा भाग होता.
येथे विराटने राजकुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली क्रिकेटचे धडे गिरवण्यास सुरुवात केली.
‘विराट कोणत्याही स्थानी फलंदाजी साठी तयार असायचा. मी त्याला ट्रेनिंग सेशन संपल्यानंतर अक्षरशः घरी जाण्यासाठी जबरदस्ती करायचो परंतु तो लवकर मैदान सोडायचा नाही.’ असे त्याच्या प्रशिक्षकांनी सांगितले आहे.
क्रिकेटचा जास्तीत जास्त सराव करता यावा म्हणून विराटने इयत्ता ९ वी मध्ये असताना आपली शाळा बदलून पश्चिम विहारमधील झेवियर कॉन्व्हेंट (Saviour Convent) मध्ये प्रवेश घेतला.
फक्त खेळातच नाही तर अभ्यासातही विराट हुशार होता.
त्याचे शिक्षक त्याला हुशार आणि जिज्ञासू विद्यार्थी म्हणून ओळखायचे.
१८ डिसेंबर २००६ रोजी विराटच्या वडिलांचे झटक्याने निधन झाले.
त्यावेळी विराटचे वय अवघे १७ वर्षे होते.
या आघातातून सावरत त्याने काही काळातच त्याने भारतासाठी खंबीर नेतृत्व केले आणि क्रिकेट विश्वातील तेजस्वी तारा म्हणून नावारूपास आला.
आणखी वाचा: दीपिका पदुकोण बायोग्राफी
क्रिकेट करिअर (Virat Kohli’s Cricket Carrer)
ऑगस्ट २००८ मध्ये विराटला एकदिवसीय मालिकेसाठी श्रीलंका दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघात पदार्पण करण्याची संधी मिळाली.
हि त्याच्यासाठी आश्चर्यकारक गोष्ट होती कारण या दौऱ्याआधी विराटने फक्त ८ प्रथमश्रेणी सामने खेळले होते.
या दौऱ्यामध्ये भारताचे दोन्ही सलामीचे फलंदाज सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग जखमी झाले होते.
त्यामुळे विराटला सलामीला फलंदाजी करण्याची संधी मिळाली.
त्याने वयाच्या १९ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय संघात पदार्पण केले आणि चवथ्या सामन्यातच आपले पहिले आंतरराष्ट्रीय अर्धशतक झळकावले.
विराटने १२ जून २०१० रोजी झिम्बाबे विरुद्ध हरारे येथे टी २० संघात तर २० जून २०११ रोजी वेस्ट इंडिज विरुद्ध किंग्स्टन येथे कसोटी संघात पदार्पण केले.
बाकी त्याची दैदिप्यमान कामगिरी तर आपण पाहत आहोतच.
विराट कोहलीचे विक्रम (Virat Kohli’s Records)
१) विश्वचषक पदार्पणात शतक लावणारा पहिला भारतीय खेळाडू.
२) वयाच्या २२ व्या वर्षी २ शतके झळकावणारा सचिन तेंडुलकर आणि सुरेश रैना नंतर तिसरा भारतीय खेळाडू.
३) एकदिवसीय सामन्यांमध्ये १०००, ३०००, ४००० आणि ५००० धावांचा टप्पा जलदगतीने पार करणारा पहिला भारतीय खेळाडू.
४) एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वात जलद शतक बनवणारा भारतीय खेळाडू, त्याने २०१३ साली जयपूर येथे ऑस्ट्रेलिया विरुद्ध फक्त ५२ चेंडूत शतक साजरे केले होते.
५) एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वात जलद २५ शतके बनवणारा खेळाडू. त्याने १६२ सामन्यांमध्ये २५ शतके झळकावली आहेत.
६) एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वात जलद ७५०० धावांचा टप्पा पार करणारा खेळाडू.
७) सर डॉन ब्रॅडमन आणि रिकी पॉन्टिंग नंतर एका कॅलेंडर वर्षात ३ द्विशतक झळकावणारा तिसरा खेळाडू.
८) एका कॅलेंडर वर्षात ९ कसोटी सामने जिंकणारा पहिला भारतीय कर्णधार.
९) परदेशात कसोटी मध्ये द्विशतक झळकवणारा पहिला भारतीय कर्णधार.
१०) आयपीएल च्या एका मोसमात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू. त्याने २०१६ साली आयपीएल च्या ९ व्या मोसमात ९७३ धावा केल्या होत्या.
११) आयपीएल च्या एका मोसमात सर्वाधिक शतके (४) झळकावणारा खेळाडू.
१२) एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वात जलद १०००० धावा बनवणारा खेळाडू. ही कामगिरी त्याने फक्त २०५ सामन्यांमध्ये केली.
१३) आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये सर्वात जलद १९००० धावा बनवणारा खेळाडू.
१४) सर्वात जास्त धावा करणारा भारतीय कर्णधार.
आणखी वाचा: कार्तिक आर्यन बायोग्राफी
विराट कोहलीला मिळालेले पुरस्कार (Virat Kohli’s Awards)
२०१२ – पिपल चॉइस अवॉर्ड फॉर फेवरेट क्रिकेटर
२०१२ – आईसीसी ओडीआई प्लेयर ऑफ द ईयर अवॉर्ड
२०१३ – अर्जुन अवॉर्ड फॉर क्रिकेट
२०१७ – सीएनएन- आईबीएन इंडियन ऑफ द ईयर
२०१७ – पद्मश्री अवॉर्ड
२०१८ – सर गर्फीएल्ड सोबर्स ट्रॉफी ने विराट कोहली ला सन्मानित करण्यात आलं.
विराट कोहलीचे वैवाहिक आयुष्य
दिसायला देखणा आणि स्टाइलिश असणाऱ्या कोहलीने सर्व तरुणाईला वेड लावले होते.
त्याने अनेक तरुणींच्या हृदयात घर केले आहे.
त्याचे नाव काही बॉलीवूड अभिनेत्रींसोबत जोडले गेले. परंतु सर्वात जास्त चर्चा होती ती अनुष्का शर्मासोबतच्या त्याच्या नात्याची.
शेवटी २०१७ साली विराट अनुष्का शर्मा सोबत विवाहबंधनात अडकला.
जानेवारी २०२१ मध्ये त्यांना एका गोड कन्यारत्नाची प्राप्ती झाली आहे. आपल्या लाडक्या लेकीचे नाव त्यांनी वामिका असे ठेवले आहे.
विराट कोहली बद्दल जेवढे लिहावे तेवढे थोडेच आहे. माहिती आवडल्यास नक्की शेअर करा.