उभयान्वयी अव्यय व त्याचे प्रकार । Ubhayanvayi Avyay v Tyache Prakar

| |

उभयान्वयी अव्यय (Ubhayanvayi Avyay in Marathi) हा मराठी व्याकरणातील एक महत्त्वपूर्ण घटक आहे. त्याची आपल्याला सविस्तर माहिती असणे आवश्यक आहे. कारण वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये यावर प्रश्न विचारले जातात. या लेखात आपण उभयान्वयी अव्यय व त्याचे प्रकार (Ubhayanvayi Avyay v Tyache Prakar) विस्तृतपणे पाहणार आहोत. 

सर्वप्रथम आपण उभयान्वयी अव्यय म्हणजे काय ते समजून घेऊ. 

उभयान्वयी अव्यय (Ubhayanvayi Avyay in Marathi)

दोन किंवा अधिक शब्द अथवा वाक्य ज्या अविकारी शब्दाने जोडली जातात त्यांना उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. 

उदा. आणि, अथवा, किंतु, परंतु इत्यादी. 

१. तो आला आणि लाईट गेली. 

२. राहुलने पाच आंबे आणले परंतु त्यातील दोन आंबे खराब निघाले. 

आता आपण उभयान्वयी अव्ययाचे प्रकार पाहू. 

आणखी वाचा : नाम आणि नामाचे प्रकार

उभयान्वयी अव्यय व त्याचे प्रकार (Ubhayanvayi Avyay v Tyache Prakar)

उभयान्वयी अव्ययाचे मुख्यत्त्वेकरून दोन प्रकार पडतात. 

१. समानत्वदर्शक / प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्यये.

२. असमानत्वदर्शक / गौणत्वसूचक उभयान्वयी अव्यये

१. प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्यये

ज्या उभयान्वयी अव्ययाने जोडणारी वाक्ये एकमेकांवर अवलंबून नसतात, प्रत्येक वाक्याला स्वतःचा वेगळा अर्थ असतो म्हणजेच ती स्वतंत्र आणि प्रधान असतात त्यांना प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्यये असे म्हणतात. 

प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्ययाचे आणखी चार उपप्रकार पडतात.

आणखी वाचा : शब्दांच्या जाती 

अ) समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय

दोन किंवा अधिक प्रधान किंवा मुख्य वाक्ये ज्या उभयान्वयी अव्ययांनी जोडून त्यांचा समुच्चय करतात त्यांना समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यये हि पहिल्या विधानात अधिक भर घालण्याचे  करतात. 

उदा. आणि, व, अन्, न, नि, शिवाय, आणखी, अधिक इत्यादी. 

१. त्याचे गाणे संपले आणि सर्वांनी टाळ्यांचा कडकडाट केला. 

२. साहिलने काम केले अन तो घरी गेला. 

३. त्याने मला योग्य मार्गदर्शन केले शिवाय थोडी आर्थिक मदतही केली.

आणखी वाचा : केवल प्रयोगी अव्यय व त्याचे प्रकार

ब) न्यूनत्व बोधक उभयान्वयी अव्यय

जेव्हा दोन वाक्यांना जोडणारी उभयान्वयी अव्यये पहिल्या वाक्यात काही दोष, कमीपणा किंवा उणीव असल्याचे दर्शवतात त्यांना न्यूनत्व बोधक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. 

उदा. पण, परंतु, परी, बाकी, तरी, किंतु इत्यादी. 

१. सायलीने खूप अभ्यास केला होता तरी ती नापास झाली. 

२. आम्ही मोठ्या उत्साहाने व्याघ्रदर्शन करायला गेलो होतो परंतु वाघ काही दिसलाच नाही.

क) विकल्प बोधक उभयान्वयी अव्यय

जी उभयान्वयी अव्यये दोन वाक्यांमधील विकल्प/पर्याय दर्शवतात, म्हणजेच हे किंवा ते अशी स्थिती दर्शवतात त्यांना विकल्प बोधक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात.

उदा. अथवा, किंवा, वा, की इत्यादी. 

१. तुम्ही चहा घेणार कि कॉफी?

२. तिथून तुला बस किंवा रिक्षा मिळेल.

आणखी वाचा : क्रियापद व त्याचे प्रकार

ड) परिणाम बोधक उभयान्वयी अव्यय

दोन वाक्यांना जोडणाऱ्या ज्या उभयान्वयी अव्ययामुळे एका वाक्यात घडलेल्या घटनेचा परिणाम पुढील वाक्यातून दिसून येतो त्यांना परिणाम बोधक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. 

उदा. म्हणून, सबब, यास्तव, तेव्हा, याकरिता इत्यादी. 

१. त्याची तब्येत खराब होती म्हणून तो आज शाळेत आला नव्हता. 

२. तो खूप उधळपट्टी करतो याकरिता मी त्याला पैसे देत नाही. 

आणखी वाचा : क्रियाविशेषण अव्यय व त्याचे प्रकार

२. गौणत्व दर्शक उभयान्वयी अव्यय

ज्या उभयान्वयी अव्ययांनी जोडलेल्या वाक्यांपैकी एक वाक्य प्रधान तर दुसरे गौण असते, म्हणजेच एक वाक्य दुसऱ्या वाक्यावर अवलंबून असते. अशा उभयान्वयी अव्ययांना गौणत्व दर्शक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. 

गौणत्व दर्शक उभयान्वयी अव्ययाचे चार उपप्रकार पडतात. 

अ) स्वरूप दर्शक उभयान्वयी अव्यय

ज्या उभयान्वयी अव्ययांनी जोडलेल्या दोन वाक्यांपैकी प्रधान वाक्याचे स्वरूप गौण वाक्यामुळे कळते त्यांना स्वरूप दर्शक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. 

उदा. म्हणजे, की, म्हणून, जे इत्यादी. 

१. ३६५ म्हणजे एक वर्ष. 

२. गुरुजींनी सांगितलं कि उद्या शाळेला सुट्टी आहे.

आणखी वाचा : शब्दयोगी अव्यय व त्याचे प्रकार

ब) कारण बोधक उभयान्वयी अव्यय 

उभयान्वयी अव्ययांनी जोडलेल्या दोन वाक्यांपैकी प्रधान वाक्यातील क्रिया घडण्याचे कारण हे गौण वाक्य दर्शवते त्यांना कारण बोधक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. 

उदा. कारण, का, की इत्यादी. 

१. तो राज्यात पहिला आला कारण त्याने खूप अभ्यास केला. 

२. तो उशिरा आला कारण त्याला बस चुकली.

आणखी वाचा : सर्वनाम व त्याचे प्रकार

क) उद्देश्य बोधक उभयान्वयी अव्यय

दोन वाक्यांना जोडणाऱ्या ज्या उभयान्वयी अव्ययामुळे गौण वाक्य प्रधान वाक्याचा उद्देश किंवा हेतू दर्शवते त्यांना उद्देश्य बोधक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. 

उदा.  म्हणून, सबब, यात्सव, कारण, की इत्यादी. 

१. शरीर सुधृढ व्हावे म्हणून तो रोज व्यायाम करतो. 

२. वर्गात पहिला नंबर यावा म्हणून तो खूप अभ्यास करतो.

आणखी वाचा : विशेषण व त्याचे प्रकार

ड) संकेत बोधक उभयान्वयी अव्यय

ज्या उभयान्वयी अव्ययांमुळे वाक्यातील संकेत किंवा अटीचा बोध होतो त्यांना संकेत बोधक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. 

उदा. जर – तर, जरी – तरी, जेव्हा – तेव्हा, म्हणजे, की इत्यादी 

१. जर तू परीक्षेमध्ये पहिला नंबर काढलास तर तुला मोबाइलला मिळेल. 

२. जेव्हा दुकानातून दूध आणून देशील तेव्हा तुला कॉफी बनवून मिळेल. 

३. मी पास झालो कि पेढे वाटेनं. 

मित्रांनो उभयान्वयी अव्यय व त्याचे प्रकार याबद्दलची हि माहिती आपल्याला कशी वाटली हे आम्हांला कंमेंटद्वारे जरूर कळवा. माहिती आवडल्यास नक्की शेअर करा. 

Previous

शब्दयोगी अव्यय व त्याचे प्रकार । Shabdyogi Avyay v Tyache Prakar

केवल प्रयोगी अव्यय व त्याचे प्रकार । Keval Prayogi Avyay v Tyache Prakar

Next

Leave a Comment