पश्चिम बंगाल, केरळ, आसाम, पुदुच्चेरी, तामिळनाडू या राज्यांमध्ये सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागले आहेत.
या निवडणुकांची देशभर चर्चा सुरु आहे.
या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सिने जगतातले मोठमोठे नामवंत कलाकार राजकारणात उतरत आहेत.
काही दिवसांपूर्वीच चित्रपट सृष्टीतील नावाजलेले अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी भाजपा मध्ये प्रवेश केला होता.
त्यापाठोपाठ आता रामायण या मालिकेमधून घराघरात पोहोचलेले अरुण गोविल यांनीही राजकारणात पाऊल ठेवले आहे. (Ramayana Fame Arun Govil Joins BJP)
रामानंद सागर यांच्या रामायण या मालिकेमध्ये प्रभू श्रीरामांची भूमिका साकारणारे अभिनेते अरुण गोविल यांनी काळ दिल्ली येथे भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे.
रामायण या मालिकेमध्ये अभिनेते अरुण गोविल यांनी श्रीरामांची भूमिका साकारली होती.
त्यांनी आपल्या उत्कृष्ट अभिनयाने प्रत्येक माणसाच्या हृदयामध्ये वेगळे स्थान निर्माण केले होते.
या मालिकेमुळे अनेक हिंदू लोकांच्या भावना त्यांच्याशी जोडल्या गेल्या होत्या.
या सर्व बाबी लक्षात घेता निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अरुण गोविल यांचा भाजप प्रवेश हि एक मोठी गोष्ट मानली जात आहे.
अरुण गोविल यांनी नवी दिल्ली येथील भाजपा कार्यालयात पक्षाचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह यांच्या उपस्थितीत पक्षाचं सदस्यत्व घेतलं आहे.
दरम्यान भाजपा मध्ये अरुण गोविल यांची भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही.
अरुण गोविल विधानसभा निवडणूक लढवू शकतात असा अंदाज वर्तवला जात आहे.
परंतु भारतीय जनता पक्षाकडून याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केली गेलेली नाही.
अरुण गोविल यांच्या प्रवेशामुळे भारतीय जनता पक्षाला आगामी निवडणुकांमध्ये चांगलाच फायदा होणार असल्याच्या शक्यता वर्तवल्या जात आहेत.
रामायणातील सीता अगोदरच भाजपात
रामानंद सागर यांच्या गाजलेल्या याच रामायण मालिकेमध्ये सीता मातेची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री दीपिका चिखलीया यांनी याआधीच भाजपामध्ये प्रवेश केला आहे.
त्यांचीही भूमिका प्रचंड गाजली होती.
त्यांनी भाजपच्या तिकिटावर दोन वेळा निवडणूकही लढवली आहे.
अरुण गोविल यांच्याविषयी
१२ जानेवारी १९५८ रोजी उत्तर प्रदेश मधील मेरठ येथे जन्मलेल्या अरुण गोविल यांनी रामायण व्यतिरिक्त अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आहे.
‘विक्रम और बेताल’, ‘लव कुश’, ‘बुद्ध’ या मालिकांमध्ये तर ‘पहेली’, ‘सावन’ सारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले आहे.
परंतु त्यांना प्रत्येक माणसाच्या हृदयात स्थान दिले ते रामानंद सागर यांच्या रामायण या मालिकेने.