या लेखात आपण संत ज्ञानेश्वरांनी रचलेलं पसायदान (Pasaydan in Marathi) पाहणार आहोत. आपण सर्वानी शाळेमध्ये हे पसायदान ऐकले किंवा गायले असेलच. ज्ञानेश्वरीच्या शेवटच्या अध्यायाचे समापन करताना संत ज्ञानेश्वरांनी पसायदान लिहिले आहे. यातून त्यांनी विश्वनिर्मात्या भगवंताकडे विश्वाच्या सौख्याची कामना केली आहे. या विश्वात सर्वत्र आनंदी आनंद असावा, यातील प्रत्येक प्राणीमात्राचं कल्याण व्हावं अशी त्यांनी ईश्वराकडे प्रार्थना केली आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर मनात किंचितही अपरभाव न ठेवता निर्मळ मनाने अखिल विश्वाच्या कल्याणासाठी, एका भक्ताने हात जोडून प्रत्यक्ष जगनियंत्याकडे केलेली विश्वप्रार्थना म्हणजे पसायदान. आपणा सर्वाना पसायदान माहित असेलच परंतु या लेखात आपण त्याचा अर्थ ही (Pasaydan and Its Meaning in Marathi) पाहणार आहोत.
पसायदान (Pasaydan in Marathi)
आतां विश्वात्मकें देवें । येणें वाग्यज्ञें तोषावें ।
तोषोनि मज द्यावें । पसायदान हें ॥ १ ॥
जे खळांची व्यंकटी सांडो । तयां सत्कर्मीं रती वाढो ।
भूतां परस्परें जडो। मैत्र जीवांचें ॥ २ ॥
दुरिताचें तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।
जो जें वांच्छील तो तें लाहो । प्राणिजात ॥ ३ ॥
वर्षत सकळमंगळीं । ईश्वर निष्ठांची मांदियाळी ।
अनवरत भूमंडळीं । भेटतु या भूतां ॥ ४ ॥
चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणीचें गांव ।
बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥ ५ ॥
चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।
ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥ ६ ॥
किंबहुना सर्वसुखीं । पूर्ण होऊनि तिहीं लोकीं ।
भजिजो आदिपुरुखीं । अखंडित ॥ ७ ॥
आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें ।
दृष्टादृष्ट विजयें । होआवें जी ॥ ८ ॥
येथ म्हणे श्रीविश्वेश्वरावो । हा होईल दानपसावो ।
येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया झाला ॥ ९ ॥
Pasaydan Lyrics
Ata wishchaatmake dewe, yene waag yajnje toshaawe
Toshoni maj dyaawe, pasaayadaan he
Je khalaanchi wynkati saando, taya satkarmi rati waadho
Bhuta paraspare jado, maitr jiwaanche
Duritaache timir jaawo, wishw swadharmasurye paaho
Jo je waanchhil to te laaho praanijaat
Warshat sakalamngali, ishwaranishthhaanchi maandiyaali
Anawarat bhumndali, bhetatu bhutaan
Chala kalpatarunche araw, chetanaachintaamaninche gaanw
Bolate je arnaw, piyushaache
Chndrame je alaanchhan, maartnd je taapahin
Te sarwaanhi sada sajjan, soyare hotu
Kinbahuna sarwasukhi, purn houni tihinlokin
Bhaji jo adipurukhi, akhndit
Ani grnthopajiwiye, wisheshi loki iye
Drishtaadrishtawijaye, ho awe ji
Yeth mhane shriwishwesharaawo, ha hoil daanapasaawo
Yene ware jnjaanadewo sukhiya jhaala
पसायदान आणि त्याचा अर्थ (Pasaydan and Its Meaning in Marathi)
आतां विश्वात्मकें देवें ।
येणें वाग्यज्ञें तोषावें ।
तोषोनि मज द्यावें ।
पसायदान हें ॥ १ ॥
अर्थ : ज्ञानेश्वरी चे लेखन पूर्णत्वास गेल्यानंतर संत ज्ञानेश्वर सर्व धर्माच्या विश्वात्मक परमेश्वराकडे प्रार्थना करतात की मी हा जो वाङ्मयरूपी यज्ञ केला आहे त्याने तू प्रसन्न व्हावे आणि संतुष्ट होऊन मला हे प्रसादाचे दान द्यावे.
जे खळांची व्यंकटी सांडो ।
तयां सत्कर्मीं रती वाढो ।
भूतां परस्परें जडो।
मैत्र जीवांचें ॥ २ ॥
अर्थ : या श्लोकात संत ज्ञानेश्वर मनुष्याच्या प्रवृत्तीवर भाष्य करत आहेत. ते ईश्वराकडे प्रार्थना करतात की दुष्ट लोकांच्या मनातून सर्व दुष्ट भावना नाहीशी होवो आणि त्यांना सत्कर्म करण्याकडे त्यांची आवड निर्माण व्हावी. सर्व प्राणिमात्रांमधील शत्रुता संपून त्यांच्या मध्ये मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित व्हावेत.
दुरिताचें तिमिर जावो ।
विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।
जो जें वांच्छील तो तें लाहो ।
प्राणिजात ॥ ३ ॥
अर्थ : या श्लोकातून संत ज्ञानेश्वर मागणे मागतात की पापी माणसाच्या जीवनातील अज्ञानरुपी अंधार नाहीसा होवो, विश्वात स्वधर्मरूपी सूर्याचा उदय होवो. प्राणमात्रांच्या सर्व मंगल इच्छा पूर्ण होवोत.
वर्षत सकळमंगळीं ।
ईश्वर निष्ठांची मांदियाळी ।
अनवरत भूमंडळीं ।
भेटतु या भूतां ॥ ४ ॥
अर्थ : या भूतलावर सर्व प्रकारच्या मांगल्याचा वर्षाव करणारे अनेक ईश्वरनिष्ठ संत अवतरित व्हावे आणि त्यांची भेट पृथ्वीवरील प्रत्येक प्राणिमात्रांसोबत व्हावी.
चलां कल्पतरूंचे आरव ।
चेतना चिंतामणीचें गांव
बोलते जे अर्णव ।
पीयूषाचे ॥ ५ ॥
अर्थ : या श्लोकात संत ज्ञानेश्वर या ईश्वरनिष्ठ संतांचे वर्णन करताना तीन काव्यमय उपमा वापरतात. हे संत म्हणजे सर्वांच्या इच्छा पूर्ण करणाऱ्या कल्पतरूंचे चालते फिरते बगीचे आहेत. सचेत अशा चिंतामणी रत्नांची जणू गावे आहेत आणि अमृतवाणी बोलणारे समुद्र आहेत.
चंद्रमे जे अलांछन ।
मार्तंड जे तापहीन ।
ते सर्वांही सदा सज्जन ।
सोयरे होतु ॥ ६ ॥
अर्थ : हे संत म्हणजे कोणताही डाग नसलेले निर्मल चंद्र आहेत. ज्ञानाच्या प्रकाशाचे दाहकता नसलेले तेजस्वी सूर्य आहेत. असे हे ईश्वरनिष्ठ संत सज्जन सर्व प्राणिमात्रांचे मित्र व्हावे.
किंबहुना सर्वसुखीं ।
पूर्ण होऊनि तिहीं लोकीं ।
भजिजो आदिपुरुखीं ।
अखंडित ॥ ७ ॥
अर्थ : या श्लोकात संत ज्ञानेश्वर सांगतात कि तिन्ही लोकांतील सर्वानी सर्व सुखांनी परिपूर्ण होऊन विश्वाच्या आदिपुरुषाची अखंडित सेवा करावी.
आणि ग्रंथोपजीविये ।
विशेषीं लोकीं इयें ।
दृष्टादृष्ट विजयें ।
होआवें जी ॥ ८ ॥
अर्थ : या श्लोकात ज्ञानेश्वर महाराज मागणे मागतात कि हा ग्रंथ ज्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे विशेष लोकांना दृश्य आणि अदृश्य गोष्टींवर विजय प्राप्त होऊ दे.
येथ म्हणे श्रीविश्वेश्वरावो ।
हा होईल दानपसावो ।
येणें वरें ज्ञानदेवो ।
सुखिया झाला ॥ ९ ॥
अर्थ : संत ज्ञानेश्वरांच्या मागणीवर विश्वेश्वर गुरु निवृत्तीनाथ म्हणतात कि तुला या प्रसादाचे दान मिळेल. त्यांच्याकडून मिळालेल्या या आशीर्वादामुळे ज्ञानेश्वर महाराज सुखी झाले आहेत.
वाचकहो तुम्हांला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कंमेंट द्वारे जरूर कळवा. जेणेकरून अशीच नवनवीन माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. आशा करतो ही माहिती तुम्हाला आवडली असेल. आपल्या मित्र मैत्रिणींबरोबर नक्की शेअर करा.