नवग्रह स्तोत्र व मराठी अर्थ (Navgrah Stotra with Marathi Meaning)
अवकाशात विराजित असलेल्या आपल्या सूर्यमालेतल्या नऊ ग्रहांना हिंदू धर्मात देवता मानले गेले आहे. यामध्ये सूर्याचा उल्लेख ग्रह असाच केला जातो, जरी वास्तविक खगोलशास्त्रात सूर्य हा पृथ्वीच्या सर्वांत जवळचा तारा आहे.
नवग्रह स्तोत्र हे हिंदू धर्मातील एक पवित्र व शक्तिशाली स्तोत्र आहे. हे स्तोत्र श्री वेदव्यास ऋषींनी रचिले आहे.
खरं पाहता नवग्रह स्तोत्र हे सूर्यमालेतील नऊ ग्रहांना उद्देशून केलेली प्रार्थना आहे. या श्री नवग्रह स्तोत्रात नऊ ग्रहांना नमन करणारे संस्कृत भाषेतील नऊ तेजस्वी मंत्र आहेत.
दुर्बिणी, अवकाश वेधशाळा, आणि अवकाशयाने यांचा शोध अलीकडील शतकांतला, परंतु आधुनिक विज्ञानातील या गोष्टी अस्तित्त्वात येण्यापूर्वी आपल्या ऋषीमुनींनी ग्रह-नक्षत्रांविषयी केलेल्या अचूक भाकितांवरून आपल्याला प्राचीन भारतीय खगोलशात्राच्या अभ्यास व प्रगतीचा अंदाज येतो.
अनेक धार्मिक विधीच्या वेळी तसेच नियमित सकाळी भाविकांकडून या स्तोत्राचे पठण केले जाते. दररोज हे स्तोत्र म्हटल्यामुळे सर्व प्रकारच्या ग्रहदोषांच्या त्रासांपासून मुक्ती मिळते.
नवग्रह स्तोत्र हे आपल्या जन्मपत्रिकेतील दोषांवर मात करण्यासाठी उपयोगी मानले गेले आहे.
चला तर मग जाणून घेऊयात नवग्रह स्तोत्र व त्याचा मराठी अर्थ (Navagraha Stotra with Marathi meaning).
॥ नवग्रह स्तोत्र ॥ (Navgrah Stotra)
अथ नवग्रह स्तोत्र। श्री गणेशाय नमः।
जपाकुसुम संकाशं काश्यपेयं महदद्युतिम्।
तमोरिंसर्वपापघ्नं प्रणतोSस्मि दिवाकरम्॥१॥
जास्वंदीच्या फुलाप्रमाणे लाल अंगकांती असलेल्या, कश्यप ऋषींच्या वंशांत जन्मलेल्या अत्यंत तेजस्वी, अंधाराचा शत्रू, सर्व प्रकारची पापे नष्ट करणाऱ्या दिवसाच्या राजाला, सूर्याला मी नमस्कार करतो.
दधिशंखतुषाराभं क्षीरोदार्णव संभवम्।
नमामि शशिनं सोमं शंभोर्मुकुट भूषणम्॥२॥
दही आणि शंख यांच्या तुषारांप्रमाणे शोभून दिसणाऱ्या, क्षीरसागरांतून निर्माण झालेल्या, भगवान शंकराच्या मस्तकावर दागिन्यांप्रमाणे शोभणाऱ्या आणि ससा धारण केलेल्या सोमाला (चंद्राला) मी नमस्कार करतो.
धरणीगर्भसंभूतं विद्युत्कांति समप्रभम्।
कुमारं शक्तिहस्तं तं मंगलं प्रणमाम्यहम्॥३॥
धरणीच्या गर्भातून (पोटातून) जन्म घेतलेल्या, विजेसारखी कांती असलेल्या, हातात शक्ती हे शस्त्र धारण केलेल्या, कुमारस्वरूप अशा त्या मंगळाला मी नमस्कार करतो.
प्रियंगुकलिकाश्यामं रुपेणाप्रतिमं बुधम्।
सौम्यं सौम्यगुणोपेतं तं बुधं प्रणमाम्यहम्॥४॥
अशोकाच्या फुलाप्रमाणे श्यामल रंग असलेल्या, अति रूपवान, बुद्धिवंत, सोज्वळ, सरळमार्गी, सुस्वभावी बुधाला मी नमस्कार करतो.
देवानां च ऋषीनां च गुरूं कांचन सन्निभम्।
बुद्धिभूतं त्रिलोकेशं तं नमामि बृहस्पतिम्॥५॥
देवांचा आणि ऋषींचा गुरू, सोन्यासारखी अद्भुत कांती असलेल्या, अति बुद्धिवंत, त्रिलोकांत सर्वश्रेष्ठ अशा त्या बृहस्पतीला (गुरूला) मी नमस्कार करतो.
हिमकुंदमृणालाभं दैत्यानां परमं गुरूम्।
सर्वशास्त्र प्रवक्तारं भार्गवं प्रणमाम्यहम्॥६॥
हिमकमळाच्या देठाप्रमाणे प्रभा असलेल्या, दैत्यांचा गुरू असलेल्या, सर्व शास्त्रांचे ज्ञान असलेल्या, भृगुकुळांत जन्मलेल्या शुक्राला मी नमस्कार करतो.
नीलांजन समाभासं रविपुत्रं यमाग्रजम्।
छायामार्तंड संभूतं तं नमामि शनैश्चरम्॥७॥
निळ्यारंगाची प्रभा असलेल्या, सूर्यपुत्र, यमाचा मोठा भाऊ असलेल्या, छाया व सूर्य यांच्या पोटी जन्मलेल्या त्या शनैश्चराला (शनीला) मी नमस्कार करतो.
अर्धकायं महावीर्यं चंद्रादित्य विमर्दनम्।
सिंहिकागर्भसंभूतं तं राहुं प्रणमाम्यहम्॥८॥
अर्धेच शरीर धारण केलेल्या, वीर्यवान (महाबलवान), चंद्र-सूर्याला छळणाऱ्या, सिंहीकेच्या गर्भातून जन्मलेल्या त्या राहूला मी नमस्कार करतो.
पलाशपुष्पसंकाशं तारकाग्रह मस्तकम्।
रौद्रंरौद्रात्मकं घोरं तं केतुं प्रणमाम्यहम्॥९॥
पळसाच्या फुलाप्रमाणे लाल, तारका आणि ग्रहांमध्ये प्रमुख, भीती निर्माण करणाऱ्या, रुद्राप्रमाणे तापदायक, अशा केतुला मी नमस्कार करतो.
इति श्रीव्यासमुखोग्दीतम् यः पठेत् सुसमाहितः।
दिवा वा यदि वा रात्रौ विघ्न शांतिर्भविष्यति॥१०॥
याप्रमाणे श्रीव्यास ऋषींच्या मुखांतून निघालेले हे नवग्रह स्तोत्र जो कोणी दिवसा आणि रात्री पठण करेल त्याची सर्व विघ्ने नष्ट होतील.
नरनारी नृपाणां च भवेत् दुःस्वप्ननाशनम्।
ऐश्वर्यमतुलं तेषां आरोग्यं पुष्टिवर्धनम्॥११॥
नर-नारी आणि राजा या सर्वांची दुःखे नष्ट होतील. त्यांचे ऐश्वर्य, आरोग्य आणि श्रेष्ठत्व यांची वृद्धी होईल.
ग्रहनक्षत्रजाः पीडास्तस्कराग्निसमुभ्दवाः।
ता सर्वाः प्रशमं यान्ति व्यासोब्रुते न संशयः॥१२॥
ग्रह, नक्षत्र, चोर आणि अग्नी यांपासून होणारा त्रास नष्ट होईल यांत संशय नाही, असे श्रीव्यास ऋषी म्हणतात.
॥इति श्री वेदव्यास विरचितम् आदित्यादी नवग्रह स्तोत्रं संपूर्णं॥
अशारीतीने श्रीवेदव्यास ऋषींनी रचिलेले हे नवग्रह स्तोत्र संपूर्ण झाले.
श्री नवग्रह स्तोत्र पाठाचे फायदे (Benefits of Chanting Navagraha Stotra)
या लेखात आपल्याला नवग्रह स्तोत्राचा मराठी अर्थ तुम्हाला समजला असेल. जर आपण या स्तोत्राचे नियमित पठण केले तर आपल्याला खूप फायदे होतील आणि आपल्या जीवनात आमूलाग्र बदल घडून येताना दिसून येतील.
- श्री नवग्रह स्तोत्राचा जप करणे व्यक्तीच्या सर्वांगीण कल्याणासाठी अत्यंत फायदेशीर आहे.
- नवग्रह स्तोत्राचे नियमित पठण केल्याने तुम्ही तुमच्या कुंडलीतील नऊ ग्रहांचे अशुभ प्रभाव कमी करू शकता.
- तुमच्या जन्मकुंडलीनुसार निवडलेला नवग्रह मंत्र त्या विशिष्ट ग्रहाचा सकारात्मक प्रभाव मजबूत करण्यास आणि नकारात्मक प्रभाव कमी करण्यास मदत करतो.
- हे स्तोत्र नवग्रह दोषांवर मात करण्यास व जीवनात शांती आणि अतीव आनंद प्राप्त करण्यासाठी साहाय्य करते.
- श्री नवग्रह स्तोत्राचे नियमित पठण करणे दुर्दैव दूर ठेवते, तसेच असाध्य रोग आणि आजारांना प्रतिबंधित करते.
- श्री नवग्रह स्तोत्राचा नियमित जप केल्याने वैयक्तिक तसेच व्यावसायिक जीवनाची गुणवत्ता लक्षणीयरीत्या सुधारते असा साधकांचा अनुभव आहे.
नवग्रह स्तोत्राबद्दल नेहमी विचारले जाणारे प्रश्न (FAQs)
नवग्रह स्तोत्र म्हणजे काय?
नवग्रह स्तोत्र हे शक्तिशाली मंत्राचा समूह असणारे स्तोत्र आहे. या स्तोत्राचा नियमित जप केल्याने नऊ ग्रहांचा शुभ आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो व दोष/विघ्ने निवारण होतात अशी साधकांची श्रद्धा आहे.
नवग्रह स्तोत्र हे कधी वाचावे?
इच्छित परिणाम साध्य करण्यासाठी, सकाळी लवकर उठून स्नान केल्यानंतर नवग्रह स्तोत्राचे पठण भगवान नवग्रहाच्या चित्रा समोर बसून करावे.
नवग्रह स्तोत्र किती वेळा पठण करावे?
विविध ग्रह दोषांच्या वाईट प्रभावापासून मुक्त होण्यासाठी नवग्रह स्तोत्राचे दररोज १०८ वेळा पठण करावे. परंतु ते शक्य नसल्यास दिवसातून किमान एकवेळ तरी नवग्रह स्तोत्र पठण करावे.
नवग्रह स्तोत्र कोणी लिहिले?
नवग्रह स्तोत्र हे हिंदू धर्मातील एक स्तोत्र असून ते महाभारतकालीन प्रसिद्ध मुनीवर श्री वेदव्यास ऋषींनी लिहिले आहे. मूळ स्तोत्र संस्कृत भाषेत असल्यामुळे त्यासोबत मराठी अनुवाद या लेखात समाविष्ट केला आहे.
इतर आध्यात्मिक साहित्य आणि स्तोत्रे: