मराठी वाक्प्रचार आणि वाक्यात उपयोग

| |

Marathi Vakprachar Vakyat Upyog

१. अंग चोरून काम करणे – फारच थोडे काम करणे 

आळशी माणूस नेहमीच अंग चोरून काम करतो. 

२. अंगाची लाही लाही होणे – अतिशय संताप येणे 

आपल्यासाठी आणलेले खेळणे भावाने तोडून टाकलेले पाहताच छोट्या शुभमच्या अंगाची लाही लाही झाली. 

३. अंगात वीज संचारणे – अचानक बळ येणे 

हर हर महादेव हे शब्द कानावर पडताच मराठ्यांच्या अंगात वीज संचारते. 

४. अंगवळणी पडणे – सवय होणे 

असं म्हणतात एखादी गोष्ट सतत एकवीस दिवस केल्याने ती अंगवळणी पडते. 

५. उर भरून येणे – गदगदून येणे 

सीमेवरून खूप दिवसांनी आपल्या सैनिक मुलाला घरी आलेला पाहून आईचा उर भरून आला. 

६. कपाळमोक्ष होणे – मृत्यू ओढवणे 

खूप वेगाने गाडी चालवणाऱ्या प्रतिकचा अचानक झालेल्या अपघातामुळे कपाळमोक्ष झाला. 

७. कपाळाला हात लावणे – हताश होणे, निराश होणे 

कमी पावसामुळे शेतीचे झालेले नुकसान पाहून शेतकऱ्याने कपाळाला हात लावला. 

८. काढता पाय घेणे – विरोधी परिस्थिती पाहून निघून जाणे 

आईला दादाला ओरडताना पाहून छोट्या सईने तेथून गुपचूप काढता पाय घेतला. 

९. कानउघडणी करणे – चुकीबद्दल कडक शब्दांत बोलणे 

सतत टीव्ही बघून परीक्षेत नापास झाल्यामुळे बाबांनी राजुची चांगलीच कानउघडणी केली. 

१०. कान उपटणे – कडक शब्दांत समजावणे  

कॉपी करताना पकडलेल्या सिद्धेशचे शिक्षकांनी चांगलेच कान उपटले. 

आणखी वाचा : विरुद्धार्थी शब्द

११. कान टोचणे – खरमरीत शब्दांत चूक लक्षात आणून देणे 

सतत मोबाईलवर खेळत असल्यामुळे राधिकाचे बाबांनी कान टोचले. 

१२. कान फुंकणे – चुगली करणे, चहाडी करणे 

काही लोकांना दुसऱ्यांचे कान फुंकायची सवयच असते. 

१३. कानाला खडा लावणे – एखाद्या गोष्टीच्या अनुभवावरून ती ठरवून टाळणे 

शुभमला खूप वेगाने गाडी चालवताना पाहून त्याच्या बाईकवर बसायचे नाही असा तेजसने कानाला खडा लावला. 

१४. कानावर हात ठेवणे – नाकबूल करणे 

घरातील आरसा कोणी फोडला असे आईने विचारताच आम्ही दोघं भावंडानी कानावर हात ठेवले. 

१५. कानीकपाळी ओरडणे – एकसारखे बजावून सांगणे 

घरात स्वच्छता ठेवण्याबाबत आई नेहमी आमच्या कानीकपाळी ओरडत असते. 

१६. कानावर घालणे – लक्षात आणून देणे 

पबजी च्या नादात आपले अभ्यासाकडे दुर्लक्ष होत आहे ही गोष्ट बाबांनी तुषारच्या कानावर घातली. 

१७. कानोसा घेणे – अंदाज घेणे 

प्रगतीपुस्तक दाखवताना सुप्रियाने अगोदर बाबांच्या मूडचा कानोसा घेतला. 

१८. केसाने गळा कापणे –  घात करणे 

हल्ली पैशांसाठी कोणीही कोणाचाही केसाने गळा कापतो. 

१९. कंठ दाटून येणे – गहिवरून येणे 

स्पर्धा परीक्षांमध्ये अव्वल आलेल्या आपल्या मुलाचे यश पाहून आईचा कंठ दाटून आला. 

२०. कंठस्नान घालणे – ठार करणे 

सीमेवर पहारा देण्याऱ्या सैनिकांनी भारतात घुसखोरी करणाऱ्या अतिरेक्यांना कंठस्नान घातले.

आणखी वाचा: मराठी म्हणी व त्यांचे अर्थ

२१. कंबर कसणे – जिद्दीने तयार होणे 

स्वराज्य स्थापनेसाठी शिवाजी महाराजांसह सर्व मावळ्यांनी कंबर कसली होती. 

२२. कंबर खचणे – धीर सुटणे 

स्पर्धा परीक्षेमध्ये अपयश आल्यामुळे कंबर न खचता सुद्धा पुन्हा तयारीला लागली. 

२३. खांद्याला खांदा भिडवणे – सहकार्य आणि एकजुटीने काम करणे 

आजकाल स्त्रीया प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा भिडवून काम करताना दिसतात. 

२४. गळा काढणे – मोठ्याने रडणे 

दुर्दैवाने आपल्या पतीचा मृत्यू डोळ्यासमोर बघून मालतीने गळा काढला. 

२५. गळ्यात गळा घालणे – खूप मैत्री असणे. 

राम आणि शाम यांच्यामध्ये इतकी घट्ट मैत्री आहे की ते नेहमी गळ्यात गळा घालून फिरत असतात. 

२६. गळ्यातला ताईत होणे – अत्यंत आवडता होणे 

अभ्यासात अत्यंत हुशार असल्यामुळे ओंकार कमी वेळातच शिक्षकांच्या गळ्यातील ताईत झाला. 

२७. चेहरा खुलणे – आनंदित होणे 

आपल्यासाठी आईने बाजारातून छान बाहुली आणल्याचे पाहून छोट्या सईचा चेहरा खुलला. 

२८. चेहरा पडणे – लाज वाटणे 

राजुचे खोटे बोलणे पकडले गेल्यामुळे त्याचा चेहरा पडला. 

२९. छाती दडपणे – घाबरून जाणे 

जंगलातून फिरताना अचानक वाघाची डरकाळी ऐकून समीरची छाती दडपली. 

३०. जिभेला हाड नसणे – वाटेल ते बोलणे 

काही लोकांच्या जीभेला हाड नसते, ते कुठेही काहीही बोलतात. 

आणखी वाचा : समानार्थी शब्द

३१. जीव कि प्राण असणे – अत्यंत प्रिय असणे 

प्रत्येक आईवडिलांसाठी आपले मूल जीव कि प्राण असते. 

३२. डोक्यावर खापर फोडणे – निर्दोष माणसावर दोष टाकणे 

तेजसने चोरी केली परंतु त्याचे खापर संकेतच्या डोक्यावर फोडले. 

३३. डोळा असणे – नजर असणे, पाळत ठेवणे 

दहशतवाद्यांच्या हालचालींवर भारतीय सैनिकांचा बारीक डोळा असतो. 

३४. डोळा लागणे – झोप लागणे 

दिवसभर काम करून थकल्यामुळे बाबांचा रात्री पडल्या पडल्या डोळा लागला. 

३५. डोळे उघडणे – अनुभवाने सावध होणे 

जास्त वेगाने गाडी चालवू नकोस असे सांगूनही न ऐकणाऱ्या प्रदीपचे अपघाताने चांगलेच डोळे उघडले. 

३६. डोळेझाक करणे – दुर्लक्ष करणे 

पालक आपल्या मुलांच्या अनेक लहानमोठ्या चुकांकडे डोळेझाक करतात. 

३७. डोळे निवणे – समाधान होणे 

पांडुरंगाच्या भेटीची ओढ असणाऱ्या वारकऱ्यांचे विठ्ठलाच्या दर्शनाने डोळे निवतात. 

३८. डोळे पांढरे होणे – धक्कादायक प्रसंग निर्माण होणे 

जंगलातून जाताना अचानक समोर भलामोठा साप पाहून साहिलचे डोळे पांढरे झाले. 

३९. डोळ्यात अंजन घालणे – चूक स्पष्टपणे लक्षात आणून देणे. 

चूक असूनही नाकारणाऱ्या प्रज्योतच्या डोळ्यात त्याच्या सहकाऱ्यांनी अंजन घातले. 

४०. डोळ्यात खुपणे – मत्सर करणे 

एखाद्या माणसाची प्रगती काही लोकांच्या डोळ्यात खुपते. 

आणखी वाचा : १ ते १०० अंक आणि त्यांचे मराठी उच्चार

४१. डोळ्यात धूळ फेकणे – खोटे नाटे सांगून फसवणे 

चोरांनी पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकून पोबारा केला. 

४२. डोळ्याला डोळा न लागणे – झोप न लागणे 

पहिल्यांदाच परदेशात गेलेल्या मुलाच्या आठवणीने आईच्या डोळ्याला डोळा लागला नाही. 

४३. डोळ्यांचे पारणे फिटणे – समाधान होणे 

खूप दिवसांपासून पाहण्याची इच्छा असलेला ताजमहाल प्रत्यक्षात पाहून राधिकाच्या डोळ्यांचे पारणे फिटले. 

४४. डोळे विस्फारणे – आश्चर्याने पाहणे 

खूप दिवसांपासून संपर्कात नसलेल्या मित्राला अचानक समोर पाहताच सोहमचे डोळे विस्फारले. 

४५. डोळे मिटणे – मरण पावणे 

आपल्या दोन्ही मुलांना स्वतःच्या आयुष्यात स्थिर स्थावर झालेले पाहून सदा काकांनी आनंदाने डोळे मिटले. 

४६. डोळे वटारणे – रागावणे 

सकाळपासून मोबाईलवर गेम खेळत असलेल्या प्रसादला दोन वेळा सांगूनही ऐकत नसल्याचे पाहून बाबांनी डोळे वटारले. 

४७. तळपायाची आग मस्तकी जाणे – अतिशय संतापणे 

रमेश आणि सुरेश च्या भांडणात रमेशने अपशब्द उच्चरताच सुरेशच्या तळपायाची आग मस्तकी गेली. 

४८. तोंड काळे करणे – कायमचे निघून जाणे 

घरगुती वाद विकोपाला गेल्यामुळे संतोष घर सोडून कायमचे तोंड काळे करून निघून गेला. 

४९. तोंड देणे – सामना करणे 

येणाऱ्या प्रत्येक संकटाला निर्भयपणे तोंड देणे हे यशस्वी माणसाचे लक्षण आहे. 

५०. तोंड भरून बोलणे – मनाचे समाधान होईपर्यंत बोलणे 

मेहनत करून पोलीस अधिकारी बनलेल्या सतिश बद्दल त्याची आई नेहमी तोंडभरून बोलते.

आणखी वाचा : शब्दसमूहाबद्दल एक शब्द

५१. तोंडघशी पडणे – विश्वासघात होणे

सतीशने दुसऱ्याकडून उसने घेऊन मित्राला पैसे दिले परंतु मित्राने ते पैसे वेळेत परत न करून सतीशला तोंडघशी पाडले.

५२. तोंडचे पाणी पळणे – अतिशय घाबरणे

अचानक कुत्रा मागे लागताच सुमनच्या तोंडचे पाणी पळाले.

५३. तोंडाची वाफ दवडणे – वायफळ बडबड करणे

काही लोक उगाच तोंडाची वाफ दवडतात. होत तर त्यांच्याकडून काहीच नाही.

५४. तोंडात बोटे घालणे – आश्चर्यचकित होणे.

सर्कशीतील विदूषकाचा विविध करामती पाहून प्रेक्षकांनी तोंडात बोटे घातली.

५५. तोंडाला कुलूप घालणे – गप्प बसणे

सत्य परिस्थिती माहित असूनही तोंडाला कुलूप घालून राहिल्यामुळे बिचाऱ्या प्रमोदला दोषी ठरवण्यात आले.

५६. तोंडाला तोंड देणे – भांडणे

प्रसादने अपशब्द वापरताच खूप वेळ शांत बसलेल्या समीरनेही त्याच्या तोंडाला तोंड देण्यास सुरुवात केली.

५७. तोंडाला पाणी सुटणे – हवं निर्माण होणे

आईने बिर्याणीचा बेत केलेला पाहून सचिनच्या तोंडाला पाणी सुटले.

५८. दात विचकणे – निर्ल्लजपणे हसणे

शिक्षक ओरडत असताना सुद्धा शेवटच्या बाकावरचा तेजस दात विचकत होता.

५९. दात ओठ खाणे – चीड व्यक्त करणे

गावकऱ्यांसमोर आपला अपमान होत असल्याचा पाहून सरपंच तेथून दात ओठ खात निघून गेले.

६०. नजर चुकवणे – न दिसेल अशी हालचाल करणे

काही मुले वर्गामध्ये शिक्षकांची नजर चुकवून डबा खातात.

आणखी वाचा : समूहदर्शक शब्द

६१. नवल वाटणे – आश्चर्य वाटणे

उनाडपणा करणाऱ्या साहिलने परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळवल्याचे पाहून सर्वानाच नवल वाटले.

६२. नाक कापणे – घोर अपमान करणे

आपल्या कुटुंबातील मुलीने प्रेमविवाह केला म्हणजे आपल्या कुटुंबाचे नाव कापले असा पूर्वीच्या लोकांचा समज होता.

६३. नाक खुपसणे – नको त्या गोष्टीत उगाचच सहभागी होणे

काही लोकांना मको तिथे नाक खुपसण्याची सवयच असते.

६४. नाक घासणे – लाचार होऊन माफी मागणे

सावकाराविरुद्ध वाईट शब्द बोलल्यामुळे सावकाराने पांडबाला सर्व गावासमोर नाक घासायला लावले.

६५. नाक मुरडणे – नापसंती दर्शवणे

आईने आणलेले कपडे पसंत न आल्यामुळे सीताने नाक मुरडले.

६६. नाकी नऊ येणे – फार दगदग होणे

आजच्या धावपळीच्या जीवनात स्वतःच्या आणि कुटुंबाच्या गरजा भागवताना नाकी नऊ येते.

Previous

Road Safety World Series 2021 । अंतिम सामन्यात भारताचा दणदणीत विजय, युवराज आणि युसूफ पठाण जुन्या अवतारात

मराठी उखाणी

Next

Leave a Comment