मराठी बालगीते | Marathi Balgeet Lyrics

| |

बालगीत म्हणजे लहान मुलांसाठी विशिष्ट रूप मध्ये लिहिली गेलेली गाणी. या लेखात आपण अशीच काही मराठी बालगीते (Marathi Balgeet Lyrics) पाहणार आहोत. हि गाणी लहान मुलांच्या मनोरंजनासाठी तसेच मनोरंजनासोबतच काही शैक्षणिक गोष्टी उदा. अंक, अक्षरे रंग, आकार यांच्या संकल्पना शिकण्यास मदत करतात. लहान मुलांना समजायला खूपच सोपे जाईल आणि त्यांना यांची आवड निर्माण होईल अशाप्रकारे या गीतांची (Lahan Mulanchi Marathi Gani Lyrics) रचना केलेली असते. याचे बोल यमक आणि लहान मुलांना लक्षात ठेवायला सोपे असतील असे असतात. 

एकूणच मुलांच्या सांस्कृतिक आणि शैक्षणिक विकासात हि गाणी महत्त्वाची भूमिका बजावतात. हि बालगीते (Marathi Balgeete) सध्या इंटरनेट वर सहज उपलब्ध आहेत. अशाच काही मराठी बालगीतांची (Balgeet in Marathi) यादी या लेखात दिली आहे. 

मराठी बालगीते (Marathi Balgeete) 

१. असावा सुंदर चॉकलेटचा बंगला (Asava Sunder Chocolate cha Bangala Marathi Lyrics)

असावा सुंदर चॉकलेटचा बंगला

चंदेरी सोनेरी चमचमता चांगला

चॉकलेटच्या बंगल्याला टॉफीचं दार

शेपटीच्या झुपक्यानं झाडून जाईल खार

गोल गोल लेमनच्या खिडक्या दोन

“हॅलो, हॅलो !” करायला छोटासा फोन !

बिस्कटांच्या गच्‍चीवर मोर छानदार

पेपरमिंटच्या अंगणात फुलं लाललाल

चांदीच्या झाडामागं चांदोबा रहातो

मोत्यांच्या फुलांतून लपाछपी खेळतो

उंच उंच झोक्याचा खेळ रंगला

मैनेचा पिंजरा वर टांगला

किती किती सुंदर चॉकलेटचा बंगला

चंदेरी सोनेरी चमचमता चांगला

२. चांदोबा चांदोबा भागलास का ? (Chandoba Chandoba Bhaglas Ka Marathi Balgeet)

चांदोबा चांदोबा भागलास का ?

निंबोणीच्या झाडामागे लपलास का ?

निंबोणीचे झाड करवंदी,

मामाचा वाडा चिरेबंदी !

आई-बाबांवर रुसलास का ?

असाच एकटा बसलास का ?

आता तरी परतुनी जाशील का ?

दूध न्‌ शेवया खाशील का ?

आई बिचारी रडत असेल,

बाबांचा पारा चढत असेल !

असाच बसून राहशील का ?

बाबांची बोलणी खाशील का ?

चांदोबा, चांदोबा कुठे रे गेला ?

दिसता दिसता गडप झाला !

हाकेला ‘ओ’ माझ्या देशील का ?

पुन्हा कधी आम्हांला दिसशील का ?

३. कशासाठी पोटासाठी (Kashasathi Potasathi Marathi Balgeet Lyrics)

कशासाठी पोटासाठी

खंडाळ्याच्या घाटासाठी

चला खेळू आगगाडी,

झोका उंच कोण काढी ?

बाळू, नीट कडी धर

झोका चाले खाली वर

ऐका कुकुक्‌ शिट्टी झाली

बोगद्यात गाडी आली

खडखड भकभक

अंधारात लखलख

इंजिनाची पहा खोडी

बोगद्यात धूर सोडी

नका भिऊ थोड्यासाठी

लागे कुत्रे भित्यापाठी

उजेड तो दूर कसा

इवलासा कवडसा

नागफणी डावीकडे

कोकण ते तळी पडे

पाठमोरी आता गाडी

वाट मुंबईची काढी

खोल दरी उल्लासाची

दो डोक्यांचा राजमाची

पडे खळाळत पाणी

फेसाळल्या दुधावाणी

आता जरा वाटे दाटी

थंड वारा वरघाटी

डावलून माथेरान

धावे गाडी सुटे भान

तारखांब हे वेगात

मागे मागे धावतात

तार खाली वर डोले

तिच्यावर दोन होले

झाडी फिरे मंडलात

रूळ संगे धावतात

आली मुंबई या जाऊ

राणीचा तो बाग पाहू

गर्दी झगमग हाटी-

कशासाठी ? पोटासाठी !

४. अग्गोबाई ढग्गोबाई (Aggobai Dhaggobai Balgeet in Marathi)

अग्गोबाई ढग्गोबाई लागली कळ

ढगाला उन्हाची केवढी झळ

थोडी न्‌ थोडकी लागली फार

डोंगराच्या डोळ्याला पाण्याची धार

वारा वारा गरागरा सो सो सूम्‌

ढोल्या ढोल्या ढगात ढुम ढुम ढुम

वीजबाई अशी काही तोर्‍यामधे खडी

आकाशाच्या पाठीवर चमचम छडी

खोलखोल जमिनीचे उघडून दार

बुडबुड बेडकाची बडबड फार

डुंबायला डबक्याचा करूया तलाव

साबु-बिबु नको थोडा चिखल लगाव

५. ए आई मला पावसात जाउ दे (A Aai Mala Pavsat Jau De Balgeet Lyrics)

ए आई मला पावसात जाउ दे

एकदाच ग भिजुनी मला चिंब चिंब होऊ दे

मेघ कसे बघ गडगड करिती

वीजा नभांतुन मला खुणविती

त्यांच्यासंगे अंगणात मज खूप खूप नाचु दे

बदकांचा बघ थवा नाचतो

बेडुकदादा हाक मारतो

पाण्यामधुनी त्यांचा मजला पाठलाग करु दे

धारेखाली उभा राहुनी

पायाने मी उडविन पाणी

ताप, खोकला, शिंका, सर्दी, वाट्टेल्‌ ते होऊ दे

लहान मुलांची मराठी गाणी (Lahan Mulanchi Marathi Gani Lyrics)

६. नाच रे मोरा, अंब्याच्या वनात (Nach Re Mora Marathi Balgeet Lyrics)

नाच रे मोरा, अंब्याच्या वनात

नाच रे मोरा नाच !

ढगांशि वारा झुंजला रे

काळाकाळा कापूस पिंजला रे

आता तुझी पाळी, वीज देते टाळी

फुलव पिसारा नाच !

झरझर धार झरली रे

झाडांचि भिजली इरली रे

पावसात न्हाऊ, काहितरि गाऊ

करुन पुकारा नाच !

थेंबथेंब तळ्यात नाचती रे

टपटप पानांत वाजती रे

पावसाच्या रेघांत, खेळ खेळु दोघांत

निळ्या सौंगड्या नाच !

पावसाचि रिमझिम थांबली रे

तुझिमाझि जोडी जमली रे

आभाळात छान छान, सातरंगी कमान

कमानीखाली त्या नाच !

७. अ आ आई, म म मका (A Aa Aai Balgeet Lyrics in Marathi)

अ आ आई, म म मका

मी तुझा मामा दे मला मुका

प प पतंग आभाळात उडे

ढ ढ ढगांत चांदोमामा दडे

घ घ घड्याळ, थ थ थवा

बाळ जरि खट्याळ, तरि मला हवा

ह ह हम्मा गोड दूध देते

च च चिऊ अंगणात येते

भ भ भटजी, स स ससा

मांडिवर बसा नि खुदकन हसा

क क कमळ पाण्यावर डुले

ब ब बदक तुरुतुरु चाले

ग ग गाडी झुक झुक जाई

बाळ माझे कसे गोड गाणे गाई

८. झुक झुक झुक झुक अगीनगाडी (Zuk Zuk Zuk Zuk Agingadi Lyrics)

झुक झुक झुक झुक अगीनगाडी

धुरांच्या रेघा हवेत काढी

पळती झाडे पाहूया

मामाच्या गावाला जाऊया

मामाचा गाव मोठा

सोन्याचांदीच्या पेठा

शोभा पाहुन घेऊया

मामाची बायको गोरटी

म्हणेल कुठली पोरटी

भाच्यांची नावे सांगूया

मामाची बायको सुगरण

रोज रोज पोळी शिकरण

गुलाबजामुन खाऊया

मामा मोठा तालेवार

रेशीम घेईल हजार वार

कोट विजारी लेऊया

९. छडी लागे छमछम (Chhadi Lage Chham Chham Lyrics)

छम्‌ छम्‌ छम्‌ ….. छम्‌ छम्‌ छम्‌

छडी लागे छमछम, विद्या येई घमघम

छम्‌ छम्‌ छम्‌ ….. छम्‌ छम्‌ छम्‌

मोठ्या मोठ्या मिश्या, डोळे एवढे एवढे लाल

दंतोजींचा पत्ता नाही, खप्पड दोन्ही गाल

शाळेमधल्या पोरांना हा वाटे दुसरा यम

छम्‌ छम्‌ छम्‌

तंबाखूच्या पिचकार्‍यांनी भिंती झाल्या घाण

पचापचा शिव्या देई खाता खाता पान

“मोर्‍या मूर्खा !”, “गोप्या गद्ध्या !”, देती सर्वा दम

छम्‌ छम्‌ छम्‌

तोंडे फिरवा, पुसती गिरवा, बघु नका कोणी

हसू नका, रडू नका, बोलू नका कोणी

म्हणा सारे एकदम, ओ नमा सिद्धम्‌

छम्‌ छम्‌ छम्‌

१०. कोणास ठाऊक कसा ? पण सिनेमात गेला ससा ! (Sinemat Gela Sasa Lyrics)

कोणास ठाऊक कसा ? पण सिनेमात गेला ससा !

सशाने हलविले कान, घेतली सुंदर तान,

सा नि ध प म ग रे सा रे ग म प

दिग्दर्शक म्हणाला, “वाहवा !”, ससा म्हणाला, “चहा हवा !”

कोणास ठाऊक कसा पण सर्कशीत गेला ससा !

सशाने मारली उडी, भरभर चढला शिडी

विदुषक म्हणाला, “छान छान !”, ससा म्हणाला, “काढ पान !”

कोणास ठाऊक कसा पण शाळेत गेला ससा !

सशाने म्हंटले पाढे

बे एकं बे, बे दुणे चार, बे त्रीक सहा, बे चोक आठ आणि घडघड वाचले धडे

गुरुजी म्हणाले, “शाब्बास !”, ससा म्हणाला, “करा पास !”

मराठी बालगीत (Balgeet in Marathi)

११. पप्पा सांगा कुणाचे ? (Pappa Sanga Kunache Marathi Balgeet)

पप्पा सांगा कुणाचे ? पप्पा माझ्या मम्मीचे !

मम्मी सांगा कुणाची ? मम्मी माझ्या पप्पांची !

इवल्या इवल्या घरट्यात, चिमणा चिमणी राहातात

चिमणा-चिमणी अन्‌ भवती, चिमणी पिल्लेही चिवचिवती !

आभाळ पेलते पंखांवरी, पप्पांना घरटे प्रिय भारी

चोचीत चोचीनें घास द्यावा, पिल्लांचा हळूच पापा घ्यावा !

पंखाशी पंख हे जुळताना, चोचीत चोचही मिळताना

हासते नाचते घर सारे, हासते छ्प्पर, भिंती, दारे !

१२. तुझ्या गळा, माझ्या गळा (Tuzya Gala Mazya Gala Lyrics)

“तुझ्या गळा, माझ्या गळा

गुंफू मोत्यांच्या माळा “

“ताई, आणखी कोणाला ?”

“चल रे दादा चहाटळा !”

“तुज कंठी, मज अंगठी !”

“आणखी गोफ कोणाला ?”

“वेड लागले दादाला !”

“मला कुणाचे ? ताईला !”

“तुज पगडी, मज चिरडी !”

“आणखी शेला कोणाला ?”

“दादा, सांगू बाबांला ?”

“सांग तिकडच्या स्वारीला !”

“खुसू खुसू, गालि हसू”

“वरवर अपुले रुसू रुसू “

“चल निघ, येथे नको बसू”

“घर तर माझे तसू तसू.”

“कशी कशी, आज अशी”

“गंमत ताईची खाशी !”

“अता कट्टी फू दादाशी”

“तर मग गट्टी कोणाशी ?”

१३. रविवार माझ्या आवडीचा (Ravivar Mazya Aavdicha Lyrics)

एक नाही दोन नाही, बेरीज-वजाबाकी नाही

तीन नाही चार नाही, भुमितीची सजा नाही

दिवस उद्याचा सवडीचा, रविवार माझ्या आवडीचा

सोमवारचा असतो गणिताचा तास

गणिताच्या तासाला मी नापास

गणित विषय माझ्या नावडीचा

भलताच कठीण तो मंगळवार

डोक्यावर असतो भूगोलाचा भार

भूगोल विषय माझ्या नावडीचा

घेऊन तोफा आणि तलवारी

इतिहास येतो बुधवारी

इतिहास माझा नावडीचा

१४. सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय ? (Sang Sang Bholanath Lyrics)

सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय ?

शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय ?

भोलानाथ दुपारी आई झोपेल काय ?

लाडू हळूच घेताना आवाज होईल काय ?

भोलानाथ भोलानाथ खरं सांग एकदा

आठवड्यातनं रविवार येतील का रे तीनदा ?

भोलानाथ उद्या आहे गणिताचा पेपर

पोटात माझ्या कळ येऊन दुखेल का रे ढोपर ?

१५. शाळा सुटली, पाटी फुटली (Shala Sutali Pati Futali Lyrics)

शाळा सुटली, पाटी फुटली

आई, मला भूक लागली

शाळा सुटता धावत सुटले

ठेच लागुनी मी धडपडले

आई मजला नंतर कळले

नवीन कोरी पाटी फुटली

धम्मक लाडू चापट पोळी

नको देउ मज हवीच गोळी

किंवा दे ग, खमंग चकली

दे ना लवकर, भूक लागली

सायंकाळी जाउ दे मला

पटांगणावर खेळायाला

तिथे सोबती वाट पाहती

दे ना खाऊ, भूक लागली

१६. माझ्या मामाची रंगीत गाडी हो (Mazya Mamachi Rangeet Gadi Lyrics)

माझ्या मामाची रंगीत गाडी हो

तिला खिल्लार्‍या बैलांची जोडी हो

कशी दौडत दौडत येई हो

मला आजोळी घेऊन जाई हो

नाही बिकट घाट,

सारी सपाट वाट,

मऊ गालीचे ठायीठायी हो

शीळ घालून मंजूळवाणी हो

पाजी बैलांना ओहोळ पाणी हो

गळा खुळखुळ घुंगुर माळा हो

गाई किलबील विहंग मेळा हो

बाजरीच्या शेतात,

करी सळसळ वात,

कशी घुमली अंबेराई हो

कोण कानोसा घेऊन पाही हो

कोण लगबग धावून येई हो

गहिवरून धरून पोटी हो

माझे आजोबा चुंबन घेती हो

लेक एकुलती,

नातू एकुलता,

किती कौतुक कौतुक होई हो

वाचकहो तुम्हांला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कंमेंट द्वारे जरूर कळवा. जेणेकरून अशीच नवनवीन माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. आशा करतो ही माहिती तुम्हाला आवडली असेल. आपल्या मित्र मैत्रिणींबरोबर नक्की शेअर करा.

Previous

स्वच्छतेचे महत्व मराठी निबंध | Swachateche Mahatva Marathi Nibandh

मराठी लेखक आणि त्यांची टोपणनावे | Marathi Writers and Their Nicknames

Next

Leave a Comment