महेंद्र सिंह धोनी बायोग्राफी (Mahendra Singh Dhoni Biography)
रांची सारख्या एका छोट्या गावातून येऊन क्रिकेट विश्वात खळबळ माजवणारे आणि भारताचा झेंडा अटकेपार रोवणारे नाव म्हणजे महेंद्र सिंह धोनी.
धोनीचे नाव कोणाला माहित नाही असं होणार नाही.
क्रिकेट विश्वातील आपल्या अतुलनीय कामगिरीने धोनीने फक्त भारतीयच नव्हे तर जगभरातील क्रिकेट प्रेमींच्या हृदयात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे.
जोपर्यंत धोनी मैदानात आहे तोपर्यंत सामना भारताच्या हातात आहे हा विश्वास प्रत्येक क्रिकेट प्रेमींच्या मनात निर्माण करणे ही काही साधी गोष्ट नव्हती.
प्रचंड मेहनत आणि एकाग्रता यांच्या जोरावर धोनीने ही कला आत्मसात केली होती.
कर्णधार म्हणून कठीण परिस्थितीतून मार्ग कसा काढावा, सामन्यातील निर्णायक आणि दबावपूर्ण परिस्थिती कशी हाताळावी, आपल्या सहकाऱ्यांकडून त्यांची उत्कृष्ट कामगिरी कशी काढून घ्यावी यामध्ये धोनी माहीर आहे.
प्रत्येक खेळाडूची मजबूत आणि कमकुवत बाजू ओळखण्यात धोनीचा हातखंडा आहे.
यष्टीरक्षक धोनीचा चित्त्याच्या चपळाईने यष्टी उडवण्यात कोणीही हात धरू शकत नाही.
क्रीज सोडून १ इंचही पुढे आलेल्या फलंदाजाकडून चेंडू मिस झाला तर तो फलंदाज तंबूत परतला म्हणून समजावा.
कर्णधार म्हणून धोनीने भारतीय संघाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले आहे.
मग ते विश्वचषक जिंकणे असो किंवा कसोटीमध्ये पहिल्या क्रमांकावर जाणे असो.
धोनीने भारतीयांच्या माना अभिमानाने उंचावण्यामध्ये कोणतीच कसर बाकी ठेवली नाही.
लहान गावातुन निघुन एक महान क्रिकेटपटु होण्यापर्यंतचा धोनीचा प्रवास खूप संघर्षमय होता.
या संघर्षामधुन निघाल्यानंतरच तो आज या शिखरावर पोहोचला आहे.
जगापुढे त्याने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
महेंद्र सिंह धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती घेतली आहे.
त्याने २००७ ते २०१७ या कालावधीत मर्यादित षटकांच्या सामन्यांत भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे, तर कसोटी सामन्यांमध्ये २००८ ते २०१४ या कालावधीत संघाचे कर्णधारपद भूषवले आहे.
धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने २००७ सालचा आयसीसी टी -२० विश्वचषक, २०१० आणि २०१६ सालचा आशिया चषक, २०११ सालचा एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक आणि २०१३ साली आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे.
असे अनेक कीर्तिमान धोनीच्या नावे आहेत.
मधल्या फळीतील उजव्या हाताच्या या फलंदाजाचे आणि यष्टिरक्षकाचे नाव एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वात जास्त धाव जमावणाऱ्या खेळाडूंच्या यादीत घेतले जाते.
धोनीने एकदिवसीय सामन्यांमध्ये १०००० हुन अधिक धाव केल्या आहेत.
मर्यादित षटकांच्या सामन्यांत धोनी एक प्रभावशाली फिनिशर म्हणून ओळखला जातो.
क्रिकेट इतिहासातील महान यष्टीरक्षक फलंदाज आणि कर्णधारांमध्ये धोनीची गणना केली जाते.
बायोग्राफी | |
पूर्ण नाव | महेंद्रसिंग धोनी |
टोपणनाव | माही, एमएसडी, एमएस, कॅप्टन कूल थाला |
व्यवसाय | क्रिकेटर |
जन्मतारीख | ७ जुलै १९८१ |
वय (जुलै २०२० मध्ये) | ३९वर्षे |
सोशल मीडिया | इंस्टाग्राम – mahi7781 फेसबुक –MS Dhoni ट्विटर _Mahendra Singh Dhoni |
शरीरयष्टी | |
उंची (अंदाजे) | १८०सेंमी १.८० मीटर ५.११ फूट |
डोळ्यांचा रंग | काळा |
केसांचा रंग | काळा |
वैयक्तिक आयुष्य | |
जन्म ठिकाण | रांची, बिहार, भारत |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
मूळ शहर | रांची, बिहार, भारत |
शाळा | जवाहर विद्यालय श्यामली, रांची |
कुटूंब | वडील: पान सिंग आई:देवकी देवी भाऊ: नरेंद्र सिंह धोनी बहीण:जयंती गुप्ता पत्नी: साक्षी धोनी मुलगी: झिवा धोनी |
धर्म | हिंदू |
आवडते खेळ | क्रिकेट, फुटबॉल, बॅडमिंटन |
वैवाहिक स्थिती | विवाहित |
सुरुवातीचे जीवन
महेंद्र सिंह धोनीचा जन्म ७ जुलै १९८१ रोजी रांची, झारखंड येथे एका हिंदू राजपूत कुटुंबात झाला.
त्याचे आईवडील उत्तराखंड येथून रांची येथे स्तलांतरित झाले होते.
धोनीच्या वडिलांचे नाव पान सिंह होते.
त्याच्या बहिणीचे नाव जयंती गुप्ता तर भावाचे नाव नरेंद्र सिंह धोनी आहे.
धोनी ऍडम गिलख्रिस्टचा जबरा फॅन होता.
लहानपणी क्रिकेटर सचिन तेंडुलकर, हिंदी चित्रपट अभिनेते अमिताभ बच्चन आणि भारताच्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर हे महेंद्र सिंह धोनीचे आदर्श होते.
धोनीचे शालेय शिक्षण जवाहर विद्यालय श्यामली, रांची येथे झाले आहे.
लहानपणी त्याला बॅडमिंटन आणि फुटबॉलची प्रचंड आवड होती.
या खेळांमध्ये त्याने जिल्हास्तरापर्यंत बाजी मारली होती.
धोनी त्याच्या फुटबॉल संघामध्ये गोलकीपर होता.
परंतु त्याचे फुटबॉल प्रशिक्षक त्याला क्रिकेट खेळण्याची परवानगी देत असत.
धोनीने आपल्या उत्तम यष्टिरक्षणाच्या कौशल्याने सर्वाना प्रभावित केले आणि १९९५ ते १९९८ या काळात तो कमांडो क्रिकेट क्लबचा (Commando cricket club) नियमित यष्टीरक्षक बनला.
या क्लब क्रिकेटमधील उत्तम कागिरींच्या जोरावर त्याची १९९७/९८ च्या मोसमात झालेल्या १६ वर्षे वयोगटाखालील विनू मंकड चषकासाठी निवड करण्यात आली.
इथेही त्याने आपल्या कामगिरीने सर्वाना प्रभावित केले.
१० वी नंतर धोनीने क्रिकेटकडे आपले लक्ष केंद्रित केले.
धोनी २००१ ते २००३ या काळात खड्गपूर रेल्वे स्टेशनवर प्रवास तिकीट परीक्षक (Travelling Ticket Examiner (TTE)) म्हणून काम करत होता
सरळ साधा आणि प्रामाणिक कर्मचारी म्हणून त्याची ओळख होती.
क्रिकेट करिअरची सुरुवात (M.S. Dhoni’s Cricket Carrier)
१९९८ साली देवल सहाय यांनी सेंट्रल कोल फिल्ड्स लिमिटेड (Central Coal Fields Limited (CCL)) या संघाकडून खेळण्यासाठी धोनीची निवड केली.
१९९८ सालापर्यंत १२ वी मध्ये शिकत असलेला धोनी फक्त शालेय स्तरावर आणि क्लब क्रिकेट खेळला होता.
व्यावसायिक क्रिकेटचा त्याला कसलाही गंध नव्हता.
CCL कडून खेळतानाची त्याची एक आठवण आहे.
शिश महल स्पर्धेच्या सामन्यांदरम्यान देवल सहाय धोनीला त्याने मारलेल्या प्रत्येक षटकारासाठी ५० रुपये बक्षीस देत असत.
या संघाकडून खेळताना त्याला वरच्या फळीत फलंदाजी करण्याची संधी मिळाली.
या संधीचे सोने करत त्याने शतके झळकावली आणि संघाला अ श्रेणी मिळवण्यास मदत केली.
देवल सहाय हे धोनीच्या जोरदार फटकेबाजी आणि समर्पण भावनेने प्रभावित झाले होते.
बिहार क्रिकेट असोसिएशन मधील आपल्या ओळखीचा वापर करून त्यांनी बिहार संघाच्या निवडीसाठी धोनीचे नाव पुढे केले.
बिहार क्रिकेट असोसिएशनचे त्यावेळी माजी उपाध्यक्ष असणाऱ्या देवल सहाय यांनी धोनीला रांची संघ, ज्युनिअर बिहार क्रिकेट संघ आणि त्यानंतर १९९९/२००० या काळात बिहारच्या रणजी संघात खेळण्यासाठी प्रोत्साहन दिले.
एका वर्षाच्या आतच धोनी CCL कडून बिहारच्या रणजी संघात दाखल झाला होता.
१९९८/९९ च्या मोसमात धोनी बिहारच्या १९ वर्षे वयोगटातील संघाचा हिस्सा होता. धोनीच्या या प्रतिभेची दाखल बीसीसीआय च्या टॅलेंट रिसोर्स डेव्हलपमेंट विंगचे ऑफिसर प्रकाश पोद्दार यांनी घेतली.
त्यांनी २००३ साली धोनीला जमशेदपूर येथे झारखंड संघाकडून खेळताना पाहिले आणि नॅशनल क्रिकेट अकॅडमीला त्याचे नाव सुचवले.
इंडिया ए टीम
२००३/०४ साली झिम्बाबे आणि केनिया दौऱ्यावर असलेल्या भारतीय अ संघात धोनीला स्थान देण्यात आले.
झिम्बाबे विरुद्ध हरारे स्पोर्ट्स क्लब येथे झालेल्या सामन्यात आपल्या यष्टिरक्षणाचे कसब दाखवत धोनीने ७ झेल ४ यष्टिचित केले.
केनिया, भारत अ आणि पाकिस्तान अ यामध्ये झालेल्या तिरंगी मालिकेत पाकिस्तान अ संघाविरुद्ध अर्धशतक झळकावून २२३ धावांचा पाठलाग करण्यास भारतीय संघाला मदत केली होती.
यानंतर त्याने याच संघाविरुद्ध सलग दोन शतके झळकावून भारताच्या आंतरराष्ट्रीय संघाचा कर्णधार सौरव गांगुली, रवी शास्त्री आणि अन्य लोकांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले.
आंतरराष्ट्रीय करिअर
२३ डिसेंबर २००४ रोजी धोनीने बांगलादेश विरुद्ध एकदिवसीय सामन्यांत पदार्पण केले.
ही मालिका काही त्याच्यासाठी खास राहिली नाही.
पहिल्याच सामन्यात धोनी एकही धाव न काढता बाद झाला होता.
पहिल्याच मालिकेतील साधारण कामगिरीनंतरही धोनीला पाकिस्तान विरुद्धच्या मालिकेत संघात स्थान देण्यात आले.
या मालिकेतील दुसरा सामना विशाखापट्टणम येथे झाला.
या सामन्यात धोनीने १२३ चेंडूत १४८ धावांची जबरदस्त खेळी करून पाकिस्तानी गोलंदाजांची अक्षरशः धुलाई केली होती.
हा त्याच्या कारकिर्दीतला फक्त पाचवा सामना होता.
ऑक्टोबर २००५ साली श्रीलंकेविरुद्ध झालेल्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये धोनीला फलंदाजी करण्याची जास्त संधी मिळाली नाही.
परंतु तिसऱ्या सामन्यांमध्ये त्याला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची संधी मिळाली.
श्रीलंकेने दिलेल्या २९९ धावांच्या उद्दिष्टाचा पाठलाग करत असताना धोनीने १४५ चेंडूत १८३ धावा चोपल्या आणि संघाला एकहाती विजय मिळवून दिला.
२ डिसेंबर २००५ रोजी धोनीने श्रीलंकेविरुद्ध कसोटी सामन्यांत पदार्पण केले.
श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय सामन्यांमध्ये केलेल्या प्रभावशाली कामगिरीमुळे त्याला ही संधी मिळाली होती.
धोनी भारताच्या पहिल्या वहिल्या आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्याचा भाग होता. १ डिसेंबर २००६ रोजी त्याने टी-२० सामन्यांमध्ये पदार्पण केले.
भारतीय संघाच्या कर्णधारपदी निवड
सप्टेंबर २००७ मध्ये पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेल्या आयसीसी टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघाचा कर्णधार म्हणून महेंद्र सिंह धोनीची निवड करण्यात आली.
अतिशय रंगतदार झालेल्या अंतिम सामन्यात पाकिस्तानला हरवून धोनीने भारताला विश्वचषक जिंकवून दिला आणि भारतीयांच्या माना अभिमानाने उंचावल्या.
यानंतर धोनीला लगेचच ऑस्ट्रेलियाविरुद्ध २००७ सालीच एकदिवसीय सामन्यांचे कर्णधारपद देण्यात आले.
नोव्हेंबर २००८ साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध चवथ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात त्याला कसोटी संघाचे कर्णधार पदही देण्यात आले. तोपर्यंत धोनी भारतीय संघाचा उपकर्णधार होता.
एकदिवसीय कारकीर्द
- धोनी ने खेळलेले एकदिवसीय सामने: ३५०
- एकुण खेळलेले सामने: २९७
- एकदिवसीय सामन्यांमधील एकूण धावा: १०७७३
- एकदिवसीय सामन्यांमधे मारलेले एकूण चौकार : ८२६
- एकदिवसीय सामन्यांमधे मारलेले एकूण षट्कार: २२९
- एकदिवसीय सामन्यामधे बनविलेले एकूण शतक: १०
- एकदिवसीय सामन्यांमधे बनविलेले व्दिशतक: ०
- एकदिवसीय सामन्यांमधे बनविलेले एकूण अर्धशतक: ७३
- एकदिवसीय सामन्यांमधील सरासरी धावा: ५०.५८
- एकदिवसीय सामन्यांमधील सर्वोच्च धावसंख्या: १८३
कसोटी कारकीर्द
- एकुण खेळलेले कसोटी सामने: ९०
- एकुण खेळलेल्या इनिंग: १४४
- कसोटी सामन्यातील एकूण धावा: ४८७६
- कसोटी सामन्यांमधे मारलेले एकूण चौकार: ५४४
- कसोटी सामन्यांमधे मारलेले एकूण षटकार: ७८
- कसोटी सामन्यांमधील शतकं: ६
- कसोटी सामन्यांमधे पुर्ण केलेले व्दिशतक: १
- कसोटी सामन्यांमधे बनविलेले अर्ध शतक: ३३
- कसोटी सामन्यातील सरासरी धावा: ३८.०९
- कसोटी सामन्यातील सर्वोच्च धावसंख्या: २२४
टी-२० मधील कामगिरी
- एकुण खेळलेले टी-२० सामने: ९८
- एकुण खेळलेल्या इनिंग: ८५
- टी-२० सामन्यातील एकूण धावा: १६१७
- टी-२० सामन्यांमधे मारलेले एकूण चौकार: ११६
- टी-२० सामन्यांमधे मारलेले एकूण षटकार: ५२
- टी-२० सामन्यांमधील शतकं: ०
- टी-२० सामन्यांमधे पुर्ण केलेले व्दिशतक: ०
- टी-२० सामन्यांमधे बनविलेले अर्ध शतक: २
- टी-२० सामन्यातील सरासरी धावा: ३७.६
- टी-२० सामन्यातील सर्वोच्च धावसंख्या: ५६
आयपीएल मधील कामगिरी २०२० पर्यंत
- एकुण खेळलेले सामने: २०४
- एकुण खेळलेल्या इनिंग: १८२
- सामन्यातील एकूण धावा: ४६३२
- सामन्यांमधे मारलेले एकूण चौकार: ३१३
- सामन्यांमधे मारलेले एकूण षटकार: २१६
- सामन्यांमधील शतकं: ०
- सामन्यांमधे बनविलेले अर्ध शतक: २३
- सामन्यातील सरासरी धावा: ४०.९९
- सामन्यातील सर्वोच्च धावसंख्या: ८४
महेंद्र सिंह धोनीच्या आयुष्यातील काही विशेष गोष्टी
१) २००७ साली राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार
२) २००८ आणि २००९ साली आयसीसी प्लेअर ऑफ द ईअर अवॉर्ड
३) सलग दोन वर्षे हा अवॉर्ड जिंकणारा पहिला खेळाडू
४) २००९ साली पद्मश्री हा भारताचा चवथा सर्वोच्च नागरी पुरस्कार
५) २०१८ साली पद्म भूषण हा भारताचा तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार
६) २००९, २०१० आणि २०१३ साली आयसीसीच्या वर्ल्ड टेस्ट इलेव्हन संघाचा कर्णधार म्हणून निवड
७) आयसीसीच्या वर्ल्ड इलेव्हन एकदिवसीय संघात सर्वाधिक ८ वेळा निवड तसेच सर्वाधिक ५ वेळा कर्णधार म्हणून निवड होण्याचा विक्रम
८) २०११ साली भारतीय सैन्याकडून लेफ्टनंट कर्नल ही पदवी बहाल
९) कपिल देव नंतर हा सन्मान मिळवणारा दुसरा भारतीय क्रिकेटपटू
१०) सर्वाधिक एकदिवसीय आणि टी-२० सामने जिंकणारा भारतीय कर्णधार
११) २००९ साली धोनीच्या कर्णधारपदी भारतीय संघ आयसीसी टेस्ट रँकिंग मध्ये अव्वल स्थानी पोचला
१२) २०१३ साली धोनीच्या कर्णधारपदी भारतीय संघ कसोटी मालिकेत ४० वर्षानंतर ऑस्ट्रेलियाला व्हाईटवॉश देणारा पहिला संघ ठरला
१३) आयपीएल मध्ये कर्णधार म्हणून चेन्नई सुपर किंग्स ला २०१०, २०११ आणि २०१८ साली चषक जिंकून दिला तर २०१० आणि २०१४ साली चॅम्पियन्स लीग टी-२० जिंकली
वैवाहिक आयुष्य
२००८ साली धोनी आपल्या संघासोबत हॉटेल मध्ये राहत असताना त्याची आणि साक्षीची पहिल्यांदा भेट झाली. साक्षी त्या हॉटेल मध्ये काम करत होती.
संयोगाने दोघेही एकमेकांना लहानपणापासून ओळखत होते.
त्या दोघांनीही एकाच शाळेतून शिक्षण घेतले आहे.
धोनी आणि साक्षी यांनी नंतर एकमेकांशी विवाह करण्याचा निर्णय घेतला आणि ४ जुलै २०१० रोजी ते विवाहबद्ध झाले.
६ फेब्रुवारी २०१५ रोजी त्यांना कन्यारत्नाची प्राप्ती झाली.
आपल्या गोड़ मुलीचे नाव त्यांनी झिवा असे ठेवले.
धोनीच्या आयुष्यावर एक हिंदी चित्रपट देखील बनवण्यात आला आहे.
दिग्दर्शक नीरज पांडे यांनी धोनीच्या आयुष्यातील चढउतार आणि त्याने संपादन केलेले यश यांवर आधारीत “धोनी: द अनटोल्ड स्टोरी” हा जीवनपट बनवला.
३० सप्टेंबर २०१६ रोजी हा जीवनपट प्रदर्शित करण्यात आला.