विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने इंग्लंड विरुद्ध चौथ्या कसोटीत एक डाव आणि २५ धावांनी विजय मिळवला.
भारतीय संघाने ही मालिका ३-१ अशी आपल्या नावावर केली.
या विजयासोबतच भारताने आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रवेश मिळवला आहे. (India Qualify for ICC World Test Championship 2021 Final)
जुन २०२१ मध्ये ऐतिहासिक लॉर्ड्सच्या मैदानावर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात हा अंतिम सामना रंगणार आहे.
रंगतदार मालिका
दरम्यान कसोटी क्रमवारीतील पहिल्या ९ संघांमध्ये आयोजित केलेल्या या मालिकेमध्ये खूपच रंगात पाहण्यास मिळाली.
न्यूझीलंडने आधीच अंतिम सामन्यात प्रवेश केल्यामुळे दुसऱ्या स्थानासाठी भारत, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चढाओढ होती.
परंतु ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून माघार घेतली. त्यांना त्याचे भारी नुकसान सहन करावे लागले.
अंतिम सामन्याचे तिकीट मिळवण्यासाठी ऑस्ट्रेलियाला भारत- इंग्लंड मालिकेच्या निकालावर अवलंबून अवलंबून राहावे लागणार होते.
परंतु इंग्लंडला नामोहरम करत भारताने थाटात अंतिम सामन्यात प्रवेश केला.
चौथ्या कसोटीत भारत विजयी
अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियम वर झालेल्या चौथ्या कसोटीत इंग्लंडने प्रथम फलंदाजी करत बेन स्टोक्स ५५ (१२१) आणि लॉरेन्स ४६ (७४) यांच्या खेळीच्या जोरावर २०५ धाव बनवल्या.
भारतीय संघाने पहिल्या डावात रिषभ पंत १०१ (११८) आणि वॉशिंग्टन सुंदर ९६ (१७४) यांच्या दमदार खेळीने ३६५ धावांपर्यंत मजल मारली.
यानंतर दुसऱ्या डावात फलंदाजी करण्यासाठी आलेला इंग्लंड संघ काही खास कामगिरी करू शकला नाही.संपूर्ण संघ अवघ्या १३५ धावांत तंबूत परतला.
अशाप्रकारे भारतीय संघाने हा सामना एक डाव आणि २५ धावांनी जिंकला.
भारतातर्फे अक्षर पटेल आणि रविचंद्रन अश्विन यांनी चमकदार कामगिरी केली.
अक्षर पटेल याने पहिल्या डावात ४ तर दुसऱ्या डावात ५ बळी मिळवले तर अश्विनने पहिल्या डावात ३ तर दुसऱ्या डावात ५ गडी बाद केले.