भारतीय संस्कृतीमध्ये वर्षभर अनेक सण साजरे केले जातात. दिवाळी, दसरा, पाडवा यांसारख्या अनेक सणांची जणू रेलचेलच असते.
प्रत्येक सणाला त्याचं स्वतःचं असं महत्व आहे.
प्रत्येकाच्या मागे काही ना काही कारण आध्यात्मिक महत्व जोडलेले आहे.
असाच आध्यात्मिक महत्व लाभलेला आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा केला जाणारा सण म्हणजे “महाशिवरात्री.”
महाशिवरात्र म्हणजे आदिदेव शंकराची रात्र.
प्रत्येक महिन्यातल्या कृष्ण पक्षातील चतुर्दशीला शिवरात्र असते.
परंतु माघ महिन्यातील चतुर्दशीच्या महिमा मोठा आहे.
माघ महिन्यातील हिच कृष्ण पक्षातील चतुर्दशी महाशिवरात्री म्हणून ओळखली जाते.
हिंदू बांधवांमध्ये हा सण खूप पवित्र मानला जातो.
हिंदू बांधव मोठ्या भक्तिभावाने हा सण साजरा करतात.
माघ या मराठी महिन्यात येणारी महाशिवरात्री ही इंग्रजी महिन्याप्रमाणे साधारणतः फेब्रुवारी किंवा मार्च मध्ये येते.
या दिवसाशी निगडित पुराणात काही कथा आहेत.
महाशिवरात्रीबाबत पुराणकथा
ज्यावेळी असुर आणि देव यांच्या मध्ये समुद्र मंथन झाले त्यावेळी या सृष्टीशी संबंधित असणाऱ्या अनेक चांगल्या वाईट गोष्टींची निर्मिती झाली.
त्यातीलच एक म्हणजे हलाहल विष होय.
हे विष इतके शक्तिशाली होते कि या विषामध्ये संपूर्ण ब्रह्माण्डाला नष्ट करण्याची ताकद होती.
अशा या विषाला नष्ट करण्याची ताकद फक्त भगवान शिवांकडेच होती.
त्यांनी ते विष प्राशन करून संपूर्ण ब्रह्माण्डाचे रक्षण केले.
विषामुळे त्यांचा कंठ निळा झाला म्हणून त्यांना निळकंठ असेही म्हटले जाते.
विष प्राशन केल्यामुळे त्यांच्या देहाचा प्रचंड दाह व्हायला सुरुवात झाली.
वैद्यांनी भगवान शंकरांना संपूर्ण रात्र जागून काढण्याचा उपाय सांगितला.
प्रचंड दाह होत असल्यामुळे शंभू भोलेनाथांनी या दिवशी तांडव नृत्य केल्याचेही म्हटले जाते.
सर्व देवांनी भगवान शंकरांना बरे वाटावे म्हणून नृत्य आणि गायनाची व्यवस्था केली होती.
दुसऱ्या दिवशी भोलेनाथानी प्रसन्न होऊन सर्वाना आशीर्वाद दिले.
हे सर्व माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला झाले म्हणून हा दिवस महाशिवरात्री म्हणून साजरा केला जातो.
शिवपुराणातील कथा
शिवपुराणामध्ये महाशिवरात्रीची महती सांगणारी एक कथा सांगण्यात आली आहे.
एक शिकारी होता. तो शिकार करून आपला चरितार्थ चालवत असे.
एक दिवस तो शिकार करण्यासाठी जंगलात गेला.
सापळा रचून तो एका झाडावर लपून बसला.
योगायोगाने ते झाड बेलाचे होते आणि त्या झाडाखाली एक शिवलिंग होते.
झाडावरून त्याला शिकार व्यवस्थित दिसत नव्हती म्हणून त्याने काही पाने तोडून खाली टाकली.
ती पाने खाली असलेल्या शिवलिंगावर येऊन पडली.
तेवढ्यात एक हरणाचा कळप तेथे आला.
शिकारी त्यांची शिकार करणार इतक्यात त्यातील एक हरीण पुढे येऊन म्हणाले ” तू आमची शिकार करणार हे निश्चित आहे, परंतु मला एकदा माझ्या कुटुंबाला भेटू दे.
त्यांना शेवटचे डोळे भरून पाहू दे.
तू फक्त माझी शिकार कर, माझ्या कुटुंबाला सोडून दे. माझे कर्तव्य मला पार पाडू दे.
इतक्यात हरणी पुढे आली आणि म्हणाली “तुम्ही माझी शिकार करा. मला माझ्या पत्नीधर्माचे पालन करायचे आहे.”
त्वरित हरणाची पिल्ले पुढे आली आणि म्हणाली “आईची नको आमची शिकार कर, आम्हाला आमच्या पुत्रधर्माचे पालन करायचे आहे.”
हे पाहून शिकाऱ्याला गहिवरून आले.
त्याच्या मनात विचार आला हे प्राणीमात्र असून त्यांची कर्त्यव्यनिष्ठा ते विसरत नाही आहेत, आणि मी मात्र माणूस असूनही दयाधर्म विसरतो आहे.
त्याने त्या सर्वांना जीवनदान दिले.
त्यादिवशी शिकाऱ्याला उपाशीच राहावे लागले.
पहिल्यांदा शिवलिंगावर बेलाची पाने वाहिली जाणे आणि खायला काहीही न मिळाल्यामुळे उपवास होणे अशाप्रकारे नकळत शिकाऱ्याकडून भगवान शंकराची पूजा केली गेली.
त्यामुळे प्रसन्न होऊन शंकरानी शिकारी आणि हरिण दोघांनाही आशीर्वाद दिला.
हरिणाला मृग नक्षत्र म्हणून तर शिकाऱ्याला व्याघ्र नक्षत्र म्हणून आकाशात कायमचे स्थान दिले. हे सर्व घडले ती रात्र महाशिवरात्रीची होती.
कश्या प्रकारे साजरी केली जाते? (Mahashivratri Sadhana)
महाशिवरात्रीच्या दिवशी भाविक संपूर्ण दिवस उपवास करतात.
शंकराच्या मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी दिसून येते.
खासकरून ज्या ज्या ठिकाणी बारा ज्योतिर्लिंग आहेत त्या ठिकाणी लाखोंच्या संख्येने भाविक उपस्थित असतात.
शिवाचे तिर्थक्षेत्र असलेल्या ठिकाणी मोठमोठ्या यात्रांचे आयोजन केले जाते.
उपवास, पूजा आणि जागरण अशी या व्रताची तीन अंगे आहेत.
महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास करून शंकराच्या पिंडीची पूजा केली जाते.
शंकराला प्रिय असलेली बेलाची पाने वाहून आराधना केली जाते. याशिवाय पांढरी फुले, रुद्राक्षाच्या माळाही शिवलिंगावर अर्पण केल्या जातात. काही ठिकाणी नदीमध्ये स्नान करून ओल्या अंगाने शंकराचे दर्शन घेण्याची प्रथा आहे.
शिवपूजेची वैशिष्ट्ये
- शिवपूजेसाठी हळद कुंकू वापरले जात नाही, मात्र भस्म वापरतात.
- शिवलिंगाला थंड पाणी, दूध आणि पंचामृत यांनी स्नान घातले जाते.
- शिवपूजेसाठी पांढऱ्या अक्षता वापरल्या जातात.
- पूजेमध्ये बेलाची पाने, तांदूळ आणि फक्त पांढरी फुले वाहिली जातात.
- शिवपिंडीला अर्धचंद्राकृती प्रदक्षिणा घातली जाते.
- ‘ॐ नम: शिवाय’ या मंत्राचा जास्तीतजास्त जप करण्यात येतो.