डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम निबंध (Dr. A. P. J Abdul Kalam Essay In Marathi)
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम (Dr. A. P. J Abdul Kalam) हे नाव कोणा भारतीयाच्या परिचयाचे नसेल असे होणे शक्य नाहीं.
आपल्या कर्तृत्वाने भारताच्या प्रगतीमध्ये मोलाचे योगदान डॉ. अब्दुल कलाम यांनी दिले आहे.
एक महान शात्रज्ञ, तितकेच महान शिक्षक म्हणून जगभरात त्यांची ओळख आहे.
भारताच्या अवकाश संशोधन कार्यात त्यांचे योगदान अतुलनीय आहे.
भारताच्या अवकाश संशोधनाचा पाया डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम यानीच मजबूत केला आहे.
भारताने क्षेपणास्त्र तंत्रज्ञानामध्ये केलेली लक्षणीय प्रगती ही डॉ. कलाम सर यांचीच देण आहे.
त्यांनीच भारतामध्ये अवकाश संशोधनाची मुहूर्तमेढ रोवली.
त्यामुळेच भारत आज अमेरिका, चीन, रशिया यासारख्या बलाढ्य देशांना अवकाश संशोधन क्षेत्रात टक्कर देत आहे. किंबहुना वरचढ कामगिरी करत आहे.
भारताचे ११ वे राष्ट्रपती असलेल्या डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम यांनी भारताच्या अग्नी-१, अग्नी-२ आणि अग्नी-३ या प्रक्षेपण अस्त्रांची निर्मिती केली.
त्यामुळे त्यांना ‘मिसाईल मॅन’ (Missile Man – Dr. Abdul Kalam) या नावाने सुद्धा ओळखले जाते.
भारताच्या प्रगतीमध्ये मोलाचे योगदान देणाऱ्या या महान वैज्ञानिकाला भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘भारतरत्न’ देऊन सन्मानित करण्यात आले होते.
सुरुवातीचे जीवन (Dr. A. P. J Abdul Kalam Information in Marathi)
१५ ऑक्टोबर १९३१ हाच तो दिवस. याच दिवशी भारताचे मिसाईल मॅन डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम यांचा जन्म झाला.
डॉ. कलाम यांचे पूर्ण नाव (Dr. A. P. J. Abdul Kalam Full Name) अबुल पाकिर जैनुलाब्दीन अब्दुल कलाम असे होते.
त्यांचा जन्म तामिळनाडु मधील रामेश्वरम येथील एका गरीब कुटुंबात झाला.
त्यांच्या वडिलांचे नाव जैनुलाब्दीन तर आईचे नाव आशियम्मा असे होते.
डॉ. कलाम यांच्या कुटुंबामध्ये त्यांच्या व्यतिरिक्त अजुन तीन भाऊ आणि एक बहिण होती.
डॉ. कलाम भावंडांमध्ये सर्वात लहान होते.
त्यांचे वडील होड़ी चालवण्याचे काम करत असत.
ते रामेश्वरला येणाऱ्या यात्रेकरुना होडीतून धनुष्कोडीला नेण्या आणण्याचे काम करत.
डॉ. कलाम यांची आई गृहिणी होती.
कुटुंबातील कमालीच्या गरिबीमुळे डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम यांनी लहान वयातच वर्तमानपत्रे विकायला सुरुवात केली आणि कुटुंबाला आर्थिक सहाय्य करू लागले.
त्यांनी आपले शालेय शिक्षण रामनाथपुरम येथील स्वर्ट्ज़ उच्च माध्यमिक शाळेतून पूर्ण केले.
शालेय जीवनात डॉ. कलाम साधारण गुण मिळवायचे परंतु अत्यंत जिज्ञासु आणि मेहनती मुलगा म्हणून त्यांची ओळख होती.
शिक्षणाची त्यांना प्रचंड आवड होती.
खासकरुन गणित विषय त्यांना अत्यंत प्रिय होता.
ते तासंतास गणिते सोडवत बसायचे.
यानंतर महाविद्यालयीन शिक्षणासाठी त्यांनी तिरुचिरापल्ली येथील सेंट जोसेफ कॉलेज मध्ये बी. एस. सी साठी प्रवेश घेतला.
१९५४ साली भौतिकशास्त्र या विषयातून त्यांनी बी. एस. सी ही पदवी संपादन केली.
एरोस्पेस तंत्रज्ञानाबद्दल त्यांना प्रचंड आवड होती.
ऐरोनॉटिक्स चा डिप्लोमा करण्यासाठी ते चेन्नई येथे आले.
परंतु हे शिक्षण घेण्या इतके पैसे त्यांच्याजवळ नव्हते.
त्यावेळी त्यांच्या बहिणीने स्वतःचे दागिने गहाण ठेवून त्यांना शिक्षणासाठी पैसे दिले.
करिअर (Abdul Kalam Career)
१९६० साली मद्रास इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी मधून एरोनॉटिकल इंजीनियरिंगची पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांनी अमेरिकेतील ‘नासा’ या अवकाश संशोधन संस्थेत चार महिने एरोस्पेस टेक्नोलॉजीचे प्रशिक्षण घेतले.
यानंतर त्यांनी संरक्षण संशोधन व विकास संस्था (DRDO) याठिकाणी काम केले.
१९६९ साली डॉ. कलाम यांना भारतीय अवकाश संशोधन संस्था (ISRO) याठिकाणी ट्रांसफर करण्यात आले.
याठिकाणी १९८० साली ‘रोहिणी’ उपग्रहाला पृथ्वीच्या कक्षेत यशस्वीपणे पोहोचवणाऱ्या भारताच्या पहिल्या उपग्रह प्रक्षेपण वाहनाचे (SLV III) ते प्रोजेक्ट डिरेक्टर होते.
१९७० ते १९९० दरम्यान डॉ. अब्दुल कलाम यांनी पोलर सॅटेलाईट लाँच व्हेईकल (PSLV)आणि सॅटेलाईट लाँच व्हेईकल SLV III या दोन्ही प्रोजेक्टसना विकसित करण्यास विशेष प्रयत्न केले आणि ते यशस्वीही केले.
क्षेपणास्त्र विकास कार्यामधील अग्नी क्षेपणास्त्राचे ते जनक होते.
अग्नी-१, अग्नी-२ आणि अग्नी-३ या क्षेपणास्त्रांची निर्मिती त्यांनी केली.
अग्नी क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीमुळे जगभरातून त्यांचे कौतुक केले गेले.
DRDO चे प्रमुख राहिलेल्या डॉ. कलाम यांनी अर्जुन या मेन बॅटल टॅंक (Arjun MBT) आणि लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्ट (LCA) यांच्या निर्मितीत महत्वाची भूमिका पार पाडली.
या क्षेत्रातील त्यांच्या महान कार्याबद्दल लिहावे तेवढे थोडेच आहे.
भारताचे ११ वे राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम
१० जून २००२ रोजी नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्स (NDA) ने राष्ट्रपती पदासाठी डॉ. कलाम यांच्या नावाची घोषणा केली आणि दोन्ही ‘समाजवादी पार्टी’ आणि ‘नॅशनल काँग्रेस पार्टी’ यांनी आपले उमेदवार मागे घेतले.
समाजवादी पार्टीने डॉ. कलाम यांना आपला पाठिंबा जाहीर केला.
२५ जुलै २००२ साली डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम हे भारताचे ११ वे राष्ट्रपती (11th President of India – Dr. A. P. J. Abdul Kalam) झाले.
२५ जुलै २००२ ते २५ जुलै २००७ या काळात त्यांनी भारताचे राष्ट्रपती पद भूषवले.
राष्ट्रपती होण्याआधी भारतरत्न या भारताच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित केले जाणारे डॉ. कलाम हे तिसरे राष्ट्रपती होते.
त्याआधी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन (१९५४) आणि डॉ. झाकीर हुसेन (१९६३) यांना भारतरत्न देण्यात आला होता आणि नंतर ते राष्ट्रपती झाले होते.
राष्ट्रपती पदाच्या काळात डॉ. कलाम हे जनतेचे राष्ट्रपती म्हणून लोकप्रिय होते.
२००७ साली राष्ट्रपती पदाचा कार्यभार संपल्या नंतर डॉ. कलाम यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट शिलॉंग, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अहमदाबाद, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट इंदोर या ठिकाणी व्हिजिटिंग प्रोफेसर म्हणून काम पाहिले.
तसेच त्यांनी अण्णा युनिव्हर्सिटी मध्येही एरोस्पेस इंजिनीरिंग चे प्रोफेसर म्हणून काम पाहिले आहे.
डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम यांना मिळालेले पुरस्कार
- १९८१ – पद्म भूषण – भारत सरकार
- १९९० – पद्म विभूषण – भारत सरकार
- १९९७ – भारतरत्न – भारत सरकार
- १९९८ – वीर सावरकर पुरस्कार – भारत सरकार
- २००० – रामानुजन पुरस्कार – अलवर्स रिसर्च सेंटर चेन्नई
- ४० विद्यापीठांकडून ७ प्रतिष्ठित डॉक्टरेट पुरस्कार
डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम यांनी लिहिलेली पुस्तके (ग्रंथसंपदा)
- विंग्ज ऑफ फायर (आत्मचरित्र). मराठीत अग्निपंख नावाने अनुवाद, अनुवादक- माधुरी शानभाग.
- अदम्य जिद्द (मराठी अनुवाद- सुप्रिया वकील)
- इग्नायटेड माइंड्स: अनलीशिंग द पॉवर विदिन इंडिया (’प्रज्वलित मने’ या नावाचा मराठी अनुवाद, अनुवादक- चंद्रशेखर मुरगुडकर)
- ‘इंडिया २०२०- ए व्हिजन फॉर द न्यू मिलेनियम’ (इंग्रजी, सहलेखक अब्दुल कलाम आणि वाय.एस. राजन); ‘भारत २०२०: नव्या सहस्रकाचा भविष्यवेध’ या नावाने मराठी अनुवाद- अभय सदावर्ते)
- उन्नयन (ट्रान्सेन्डन्सचा मराठी अनुवाद, सकाळ प्रकाशन)
- इंडिया – माय-ड्रीम
- एनव्हिजनिंग ॲन एम्पॉवर्ड नेशन
- फॉर सोसायटल ट्रान्सफॉरमेशन
- सायंटिस्ट टू प्रेसिडेंट (आत्मकथन)
- टर्निंग पॉइंट्स (याच नावाचा मराठी अनुवाद- अंजनी नरवणे)
- ट्रान्सेन्डन्स: माय स्पिरिचुअल एक्सपिरिअन्सेस विथ प्रमुखस्वामीजी (सहलेखक – अरुण तिवारी)
- दीपस्तंभ (सहलेखक- अरुण तिवारी; मराठी अनुवाद- कमलेश वालावलकर)
- परिवर्तनाचा जाहीरनामा (मूळ इंग्रजी-अ मॅनिफेस्टो फॉर चेंज) सहलेखक- व्ही. पोतराज, मराठी अनुवाद – अशोक पाध्ये)
- ए.पी.जे. अब्दुल कलाम: संपूर्ण जीवन (अरुण तिवारी).
- टार्गेट ३ मिलियन (सहलेखक- सृजनपालसिंग)
- बियॉंण्ड २०१०: अ व्हिजन फॉर टुमॉरोज इंडिया (सहलेखक- वाय.एस. राजन, मराठी अनुवाद-सकाळ प्रकाशन)
- महानतेच्या दिशेने: एकत्र येऊ या बदल घडवू या (मॅजेस्टिक प्रकाशन)
- स्क्वेअरिंग द सर्कल सेवन स्टेप्स टू इंडियन रेनेसांस ( सहलेखक- अरुण तिवारी. मराठी अनुवाद- सेवन स्टेप्स टू इंडियन रेनेसांस
निधन
२७ जुलै २०१५ रोजी डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम भारतीय शास्त्र व्यवस्थापन शिलॉंग येथे ‘पृथ्वी नावाचा एक जिवंत ग्रह तयार करणे’ या विषयावर व्याख्यान देण्यासाठी गेले होते.
सायंकाळी साडे सहाच्या सुमारास व्याख्यान देत असताना त्यांना मंचावरच हृदयविकाराचा झटका आला आणि ते तिथेच कोसळले.
दवाखान्यात नेईपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली होती.
अशाप्रकारे एका महान वैज्ञानिकाचा आणि एका महान व्यक्तिमत्वाच्या कार्यकालाचा अस्त झाला.