महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव | राज्यसरकार मोठे निर्णय घेण्याची शक्यता

| | ,

राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता येत्या काही दिवसांत राज्य सरकार काही मोठे निर्णय घेऊ शकते, त्यासाठी जनतेने तयारीत राहायला हवे असा इशारा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे. (Deputy CM Ajit Pawar Warns to Take Big Decisions on Sudden Spike Covid-19 Cases in Maharashtra)

ते औरंगाबाद येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. ‘लोकं बेजबाबदारपणे वागत आहेत, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दीच्या ठिकाणी मास्क घालणे, सॅनिटायझरचा वापर करणे यांसारख्या घालून दिलेल्या सुरक्षा नियमांचे पालन केले जात नाही आहे. ही अत्यंत गंभीर बाब आहे. याची आपल्याला मोठी किंमत चुकवावी लागेल.’ असे संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी दिले.

मुख्यमंत्र्यांना भेटून याबाबत चर्चा करणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये खास करून अमरावती,नागपूर, नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांत कोरोनाच्या नव्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याची दिसून आली आहे.

या वाढत्या रुग्ण संख्येवर पत्रकारांसोबत बोलताना त्यांनी जनतेच्या निष्काळजी वागण्यावर नाराजी व्यक्त केली.

जनता सुरक्षा नियमांचे पालन करत नाही याची आपल्याला मोठी किंमत चुकवावी लागेल.

त्यामुळे राज्यसरकारला काही मोठे निर्णय घ्यावे लागतील त्यादृष्टीने तयारीत राहण्याचा इशारा त्यांनी जनतेला दिला आहे.

राजकारण न करण्याचा सल्ला

तसेच कोरोनावर कोणीही राजकारण करू नये असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.

यावेळी शिवजयंती साधेपणाने साजरी करण्याच्या आमच्या निर्णयावर काही जणांनी शिवजयंतीला बंधन का आणता? असा प्रश्न उपस्थित करून राजकारण करायला सुरुवात केली.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे हा निर्णय घ्यावा लागला. त्यामुळे या विषयावर राजकारण करून लोकांना भावनिक करू नये असंही ते यावेळी म्हणाले.

उपमुख्यमंत्री अजित पवार आज मुंबईत मुख्यामंत्री उद्धव ठाकरे यांना भेटणार असून याविषयावर चर्चा करणार आहेत.

त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.

या बैठकीत कोरोना संदर्भात जनतेच्या हितासाठी काही मोठे निर्णय घेण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Previous

नवी उमेद!

दीपिका पदुकोण बायोग्राफी

Next

Leave a Comment