भारतीय संघातील ३६ वर्षीय जलदगती गोलंदाज अशोक डिंडा (Ashok Dinda) याने मंगळवारी क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर केली. (Ashok Dinda announces his retirement from all form of cricket).
बीसीसीआयचे मानले आभार…
मी आज क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्त होत आहे अशी माहिती डिंडाने ट्विटर हॅन्डल द्वारे आपल्या चाहत्यांना दिली.
त्याने या संदर्भातला मेल डिंडाने बीसीसीआय (BCCI) आणि गोवा क्रिकेट असोसिएशन (Goa Cricket Association)ला पाठवला आहे.
भारताकडून खेळण्याचे तर सर्वांचेच स्वप्न असते. मी बंगालकडून खेळलो आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. ही संधी दिल्याबद्दल बीसीसीआयचे मनापासून धन्यवाद असं त्याने आपल्या मेल मध्ये नमूद केलं आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधील कामगिरी (Ashok Dinda’s International Cricket Career)
डिंडाने भारताकडून खेळताना १३ वनडे आणि ९ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.
२५ मार्च १९८४ साली मेदिनीपूर येथे जन्मलेल्या डिंडाने ९ डिसेंबर २००९ रोजी श्रीलंकेविरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय टी २० सामना खेळला.
२८ मे २०१० रोजी त्याला झिम्बाबे दौऱ्यावर एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली.
अशोक डिंडाने १३ एकदिवसीय सामन्यांमध्ये ५१ च्या सरासरीने १२ बळी तर, ९ टी २० सामन्यांमध्ये १४.४१ च्या सरासरीने १७ बळी मिळवले.
त्यासोबतच डिंडाने ११६ प्रथम श्रेणी सामन्यात ४२० बळी मिळवले. २६ वेळा डावात ५ बळी मिळवण्याची कामगिरीही त्याने केली आहे.
आयपीएल मधील कामगिरी (Ashok Dinda’s IPL Cricket Career)
२००८ च्या मोसमात रॉयल चॅलेंजर्स बंगलोर या संघाकडून डिंडाने आपल्या आयपीएल करिअरची सुरुवात केली.
त्याचबरोबर त्याने वेगवेगळ्या मोसमात दिल्ली डेअरडेव्हिल्स, कोलकाता नाइट रायडर्स, पुणे वॉरियर्स, रायजिंग पुणे सुपरजायट्स या संघांचेही प्रतिनिधित्त्व केले आहे.
त्याने ७८ सामन्यांमध्ये ३० च्या सरासरीने ६९ बळी मिळवले.