सध्या महाराष्ट्रामध्ये कोरोनाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे.
महाराष्ट्रातील विदर्भ अमरावती नागपूर याठिकाणी गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ दिसून आली.
यामुळे सरकारने त्यादृष्टीने पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे.
ठिकठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम, तसेच अन्य गर्दीच्या ठिकाणांवर एकत्र येण्यावर बंदी घालण्यात आली आहे.
अमरावती जिल्ह्यात आठ दिवसाचा कडकडीत लॉकडाऊन (Amravati Covid Lockdown)
त्याचाच एक भाग म्हणून अमरावती जिल्ह्यात आठ दिवसाचा कडकडीत लॉकडाऊन करण्यात आलं आहे. (Amravati Covid Lockdown. Please Cooperate, Cops Warn People in Amravati).
कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता सरकारने जनतेच्या हिताच्या दृष्टीने हे पाऊल उचलले आहे.
हा लॉकडाऊन १ मार्च संध्याकाळी ६ वाजेपर्यंत असेल.
यावेळी फक्त दैनंदिन जीवनासाठी आवश्यक वस्तूंची दुकाने सकाळी आठ ते दुपारी तीन वाजेपर्यंत सुरु असतील.
पोलिसांचे जनतेला आवाहन
हा लॉकडाऊन यशस्वी करण्यासाठी अमरावती शहरी पोलीस आणि अन्य सुरक्षा दलांचे एकूण २००० सुरक्षाकर्मी तैनात करण्यात आले आहेत.
शहराच्या सर्व सीमा बंद करण्यात आल्या आहेत.
तसेच शहरातील सर्व प्रमुख चौकांवर सुरक्षा रक्षकांचे २४ तास लक्ष असेल असे अमरावतीच्या पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी म्हटले आहे.
यासोबतच घरी राहून पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. विनाकारण बाहेर पडल्यास कडक कारवाई करण्यात येईल अशी तंबी त्यांनी जनतेला दिली आहे.
दरम्यान लॉकडाऊनमुळे अमरावती शहरातील रस्ते सुनसान झाल्याचे चित्र दिसत आहे. काही तुरळक व्यक्तींची ये जा रस्त्यांवरून होत आहे.
महाराष्ट्रातील अमरावती सोबतच अकोला आणि यवतमाळ या जिल्ह्यातही कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होताना दिसून येत आहे.
कोविड टास्क फोर्स महाराष्ट्राचे डॉ. शशांक जोशी यांनी दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे की अमरावती येथील चार लोकांमध्ये अतिसंसर्गजन्य (वेगाने प्रसार होणाऱ्या) कोरोना विषाणूचा प्रकार आढळून आला आहे.
हा प्रकार यु. के, ब्राझील याठिकाणी आढळलेल्या वेगाने प्रसार होणाऱ्या कोरोना विषाणू सारखा आहे, असेही त्यांनी यावेळी म्हटले.
या वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच जनतेला कडक नियमांसाठी मानसिकदृष्ट्या तयार राहण्याचे आवाहन केले होते.
महाराष्ट्रामध्ये पुन्हा लॉकडाऊन करण्यासंबंधी येत्या आठ दिवसांत निर्णय घेण्यात येईल असं मुखमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.